☆ मनमंजुषेतून ☆ दोन जीव वाचले ☆ श्रीमती सुधा भोगले ☆
अलिबाग, रायगड जिल्ह्यातील, तालुक्याचे गाव! अलिबाग पासून सुमारे तीन मैलावर थळ हे लहानसे खेडं!आगर भागात ब्राम्ह्णाची पन्नास, शंभर घरे, थळ बाजाराकडे कोळी, आगरी, यांची वस्ती! आता आर. सी. एफ. या रासायनिक खत प्रकल्पामुळे, थळ–वायशेत हे जोडनाव आता प्रसिद्ध झाले.
आशा या गावात, मोरुकाका सुंकले एक नामदार व्यक्ती होत्या. शेतीवाडी, असलेले, गणपतीकार, आयुर्वेदिक वनस्पती, औषधींची जाण असणारे गावच्या जत्रेत, हलवाई होऊन दुकान मांडणारे, थोडीफार भिक्षुकी करणारे, असे, बहुआयामी व्यक्तीमत्व! गोरेपान, उंच, धोतर आणि वर लांब बाह्याचा पांढरा शर्ट, डोक्याला टक्कल, कानात बिगबाळी अशी त्यांची मूर्ती दिसे. ओटीवर त्यांचेकडे अनेकांची दिवसभर ये जा असे.
त्यावेळी तो चैत्र महिना होता. घरात, आगोटीची (पावसाळ्या पूर्वीची) कामे चालू होती. त्यांची लाडकी लेक सुभद्रा, सुभाताई, पहिलटकरीण, बाळंतपणाला आली होती.
आगारात असलेली, त्यांची शेतीवाडी संपन्नतेत होती. अलीकडे देशाला स्वातंत्र मिळाल्यावर, काही झळाही त्या घराला बसल्या होत्या. त्यात दहा बारा मुले, गाई–गुरे, शेती-वाडी करत, कालक्रमणा चालु होती.
सुभाताई, त्यांची लेक, गोरीपान, धारदार नाक, लांब केस, बांधेसूद, देखणी होती. बायला काही कमी पडू द्यायचे नाही असे त्या प्रेमळ पित्याला वाटे. आता तिचे दिवस भरत आले होते. त्या दिवशी दुपारपासून पोह्याचे पापड करायला शेजारपाजारच्या बायका आल्या होत्या. उखळात डांगर कुटायला, कांडपीणींची लगबग चालु होती. आणखीन काहीजणी भात कांडत होत्या.
सुभाताई पापड लाटायला बसली होती. हळूहळू, संध्याकाळ होऊ लागल्याने, कामे आवरती घ्यायला सुरवात झाली. इतक्यात, सुभाताई आपल्या पोटाचा भार सावरत उठली. हातात दोर बांधलेला पोहरा आणि काखेत कळशी घेऊन, “मी पलीकडल्या, वाडीतले गोड ढोऱ्याचे पाणी घेऊन येते”!, असे म्हणत, ती चालायला लागली. सगळ्या म्हणाल्या, “अग, सुभाताई, तू पोटुशी कशाला जातेस इतक्या तिन्हीसांजा. ”पण ती ते ऐकायला ती थांबलीच नाही. आणि ती लांब अर्धाकीलोमीटर असलेल्या वाडीत गेली सुध्दा. तेथे पोहचेपर्यंत तशा तिन्हीसांजेच्या सावल्या पडू लागल्याच होत्या. ताईंने पोहरा विहिरीत सोडला त्या शांत वातावरणात, बुडूबुडू आवाज येत पोहरा आडवा होऊन पाणी भरून आत गेला. मग दोर ओढत ताईने कळशी भरून घेतली. पोहरा व दोरगुंडाळून घेतले. कळशी
घ्यायला वाकली, तर गर्भभाराने जड झालेला देह सावरता सावरता, तिचा पाय घसरला. ती त्या ढोऱ्यात घरंगळत गेली तिलाच कळले नाही. दोन गटांगळया खाल्ल्यावर तिच्या लक्षात आलं पोटाकडे हाताने पाणी ओढले की आपण तरंगू शकू. तिने प्रयत्न केला आणि ती काठाला आली. तिने काठाला वरून आलेल्या वेलींचा ताणा घट्ट पकडला. ती वर येण्याचा प्रयत्न करू लागली. एवढ्यात, वाळलेल्या झाडाच्या पाल्याचा चुरूचुरू आवाज ऐकू आला. कोणीतरी येत आहे ह्याची चाहूल लागली. तिने हाकारले, “कोण आहे? इकडे या”! मी या विहिरीत पडले आहे!” आवाज ऐकून तो गुरे चरायला घेऊन गेलेला कातकऱ्याचा मुलगा विहिरीत डोकावला. त्याने तिला हाताला धरुन वर काढले. विहिरी बाहेर पडलेली सुभा, जराही घाबरली नाही, तिने धीर एकवटून आपली कळशी कंबरेवर घेतली. पोहरा उचलला आणी निघाली घराच्या दिशेने! तो मुलगा आवाक होत पहात राहिला, व तिच्या मागे चालू लागला.
घर जवळ आलं, पायरीवरून अलगद् चढत, ताईने कळशी उतरवली. इतक्यात घरातले सर्व बाहेर पडवीत आले. आगो, ताई, ”हे काय? एवढी कशी भिजलीस!”
कातकऱ्याच्या मुलाने सर्व हकिकत सांगितली. सर्वजण स्तब्द होऊन पाहात राहिले. आण्णा, म्हणाले, ”अग, बायो, काही झाले असते तर केवढा आपेश आला असता आमच्यावर!”, पण, देवाचीच कृपा दोन जीव वाचले.”
ह्या घटनेनंतर काही प्रश्न अनुत्तरीत राहिले. ताईला कोणीच कसे अडवले नाही. की कामाच्या धांदलीत तितकेसे लक्षात आले नाही.
© श्रीमती सुधा भोगले
९७६४५३९३४९ / ९३०९८९८९१९
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈