श्री उदय गोपीनाथ पोवळे
☆ पन्नासावे मॅरेथॉन मेडल… भाग १ ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆
२०२२ च्या ऑक्टोबर महिन्याच्या सुरवातीलाच लिखाण बंद करून मॅरेथॉनसाठी धावायचा सराव चालू केला. एक महिन्यापूर्वीच डेंगू आजारातून बाहेर आल्याने धावतांना जरा अशक्तपणा जाणवत होता. सुरवातीला खूपच कठीण वाटत होते. लिखाणासाठी रात्रीचे जागरण करायची सवय झाल्याने पहाटे पाच वाजता उठून धावायला जाणे जरा कठीणच जात होते, धावायला सुरवात केल्यावर जरा २०० मिटर ते ३०० मिटर धावल्यावर दमायला होत होते. पहिला आठवडा जरा तणावातच गेला. १६ फेब्रुवारी २०२० ला ठाण्यामध्ये ठाणे हिरानंदानी ही शेवटची २१.०२ किलोमीटर ची मॅरेथॉन धावलो होतो, त्यांनतर मार्चपासून लॉकडाऊन चालू झाले आणि आणि पुढची अडीच वर्षे म्हणजेच नोव्हेंबर २०२२ पर्यंत एकही मॅरेथॉन झाली नाही आणि मॅरेथॉन नसल्याने धावायची सवयही गेली होती. ह्या लॉकडाऊन काळात खूप लिखाणआणि चालणे झाले, तरी धावणे मात्र बंद झाले होते.
ऑक्टोबर महिन्याच्या सुरवातीला, २० नोव्हेंबर २०२२ ला नेव्ही मॅरेथॉन मुंबईचा मेसेज आला आणि डोक्यात परत मॅरेथॉन धावायचे चक्र चालू झाले. मनात मॅरेथॉन धावायचे येणे आणि प्रत्यक्षात मॅरेथॉन धावणे ह्यातले अंतर कितीतरी कोसाचे आहे. तरीही दुसऱ्याच दिवशी पहाटे ५ वाजता उठून साडेपाचला धावण्याच्या सरावाला सुरवात केली. वाटले होते तेवढे सोप्पे नव्हते. जरा धावलो तरी थकायला होत होते. धावायचा सराव नसल्याने सगळेच अवघड वाटत होते. सुरवातीचा आठवडा असाच, नुसते सकाळच्या चालण्यातच गेला.
रोज डोळ्यासमोर आधी मिळालेली मॅरेथॉन मेडल्स दिसत होती. वयाच्या ५४ व्या वर्षी धावायला सुरवात करून डिसेंबर २०१४ ला गोव्याला १० किलोमीटर धाऊन मिळालेले माझे पहिले मॅरेथॉन मेडल मला खुणावत होते. त्याच्या बाजूला असलेले जानेवारी २०१५ ला स्टॅंडर्ड चार्टर्ड २१ किलोमीटर धावलेले मेडल मला स्फूर्ती देत होते. गेली दोन वर्षे मॅरेथॉन स्पर्धा झाल्या नसल्यातरी ऑक्टोबर २०२२ पर्यंत मिळालेली सगळी मिळून ४६ मेडल्स आणि दोन ट्रॉफी ह्यांचे प्रत्येकाचे एक स्वतःचे वजन होते, स्वतःचा संघर्ष होता, स्वतःची अशी एक गोष्ट होती. त्या प्रत्येक मेडल्सनी त्यांच्यासाठी मी घेतलेली मेहनत जवळून नुसती बघितली नव्हती तर त्यांनी माझ्या बरोबर ती अनुभवली होती आणि माझ्या प्रत्येक सेलिब्रेशनला माझ्या गळ्यात राहून मला साथ दिली होती. ती मेडल्स मला जोशात सांगत होती, “थांबू नकोस, हार मानू नकोस अजून ४ मेडल्ससाठी मेहनत घे म्हणजे आमचा ५० चा अर्ध शतकाचा टप्पा गाठल्याचे आम्हांला समाधान मिळेल.”
मोठ्या उत्साहाने दुसऱ्या दिवशी धावायला निघालो पण गती काही मिळत नव्हती. एखादे किलोमीटर धावलो तरी थकायला होत होते. ऑक्टोबर २०२२ महिन्याच्या मध्यावर आलो तरी मनासारखे धावणे होत नव्हते. २० नोव्हेंबरला आता एकच महिना उरला होता. २१ किलोमीटर मॅरेथॉन न करता १० किलोमीटर धावावे आणि एक मेडल घेऊन यावे असे मनात आले होते पण त्याच वेळी एकदा का १० किलोमीटर धाऊन खालच्या पायरीवर आलो तर परत २१ किलोमीटर धावणे कधीच जमणार नाही ह्याची भीती होती आणि… आणि शक्य होईल का नाही ह्याचा काहीही विचार न करता, जो वेड्यासारखा विचार, वयाच्या ५४ व्या वर्षी २०१४ ला केला होता त्याचेच पुन्हा अनुकरण करून नेव्ही मॅरेथॉन २१ किमी धावण्यासाठी रजिस्ट्रेशन केले. आता काहीही झाले तरी २१ किलोमीटर धावयाचेच असे मनाशी पक्के केले आणि दुसऱ्या दिवशीपासून जोमाने सरावाला सुरवात केली.
२०१४ ला धावणे जसे चालू केले होते तसेच म्हणजे हळूहळू दर दोन दिवसांनी, एक तर किलोमीटरमध्ये एक एक किलोमीटरची वाढ करायची किंवा किलोमीटर सारखे ठेवून, कमी वेळेत ते पार करायचे. असे करत पुढच्या १५ दिवसांत मी १० किलोमीटर पर्यंत पोचलो आणि माझा २१ कि मी धावण्याचा हरवलेला आत्मविश्वास मला परत मिळाला. पहिल्यासारखे जलद धावणे जमत नसले तरी २१ कि मी मॅरेथॉन मी पुरी करू शकतो ह्याची मला खात्री आली.
२० नोव्हेंबरला २०२२ नेव्ही मॅरेथॉन मुंबई, मी २१ कि मी धावायला सुरवात केली. सुरुवातीचे काही कि.मी. मी जोरात न पळता मध्यम गतीने धावत होतो. शक्तीचा जोर लाऊन धावायचे मी टाळत होतो. १५ किलोमीटर पर्यंत मला कसलाही त्रास नव्हता. थकायला झाले होते पण जिद्दीने मी स्वतःला पुढे नेत होतो पण १६ व्या कि मी नंतर अंगातली शक्ती गेली आणि पुढचा ५ कि मी चा रस्ता मला खुप कठीण गेला. कसे बसे मी २१ किलोमीटरची अंतिम रेषा गाठली तेव्हा वेळ नोंदवली गेली, २ तास ५५ मिनिट्स. आत्तापर्यंतच्या माझ्या मॅरेथॉन धाऊन नोंदविलेल्या वेळेचा तो नीचांक होता. माझे ४७ वे मॅरेथॉन मेडल माझ्या गळ्यात घातले गेले. ह्या ४७ व्या मेडलचे महत्व माझ्यासाठी, माझ्या २०१४ च्या पहिल्या मेडल सारखेच होते, फरक फक्त वयाचा होता आणि वयानुसार मिळालेल्या टायमिंगचा होता. माझे पहिले २१ कि मी मॅरेथॉन मी २ तास १४ मिनिटात पुरे केले होते. मॅरेथॉन स्पर्धेमध्ये आपण कसे धावतो ह्याला महत्व नसते तर तेथे जायचे, धावायचे आणि आपल्याला लक्ष असलेले अंतर धाऊन पुरे करून अंतिम रेषा गाठणे हेच खरे असते.
– क्रमशः भाग पहिला
© श्री उदय गोपीनाथ पोवळे
ठाणे
मोबा. ९८९२९५७००५
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈