सुश्री प्रभा हर्षे

??

☆ फक्त चौकट काढा…अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे

“साहेब गाडीची डिलिव्हरी घ्यायला किती वाजता  येणार?”

“मॅडम येतील. त्यांचा नंबर फॉरवर्ड करतो. त्यांच्या वेळेबद्दल त्यांच्याशी बोलून घ्या.”

“पण साहेब गाडी मोठी आहे.”

“मग काय झालं? घेऊन येतील त्या. तुम्ही बोला त्यांच्याशी”

नवी कोरी गाडी घरी आणण्यासाठी विश्वासाने (बायकांच्या गाडी चालवण्याबद्दल अनेक पोस्ट , अनेक जोक्स  सोशल मीडियावर फिरत असतात) नवऱ्याने माझा नंबर डीलरला दिला …त्यादिवशीच खरं माझा महिला दिन साजरा झाला.

**************

इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्यासाठी दुकानात गेलेल्या दिरांनी सेल्समनला माझा नंबर लावून दिला आणि प्रॉडक्ट विषयी माहिती द्यायला सांगितले.

“या सगळ्या माहितीवरून तुच ठरव बाई कुठलं घ्यायचं ते आम्हाला त्यातलं काही कळत नाही.”

माझा त्या क्षेत्रातील शिक्षणाचा असाही सन्मान झाला…. त्याच वेळी खरं तर माझा महिला दिन साजरा झाला

****************

एका कार्यक्रमासाठी नातेवाईक घरी जमले होते. खूप प्रयत्न करूनही ऑफिसच्या कामामुळे घरी जायला उशीर झालाच. सचिंत मनाने घरी पोहोचले आणि पटकन आवरायला घेतलं.

बाहेरून सासूबाईंचा आवाज ऐकू आला

“मनु आईला हा एवढा चहा नेऊन दे. दमून आलीये ती. खूप काम असतं आताशा तिला ऑफिसमध्ये.”

सगळ्या नातेवाईकांसमोर जेव्हा एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीच्या कर्तुत्वाचा आदर केला… त्याच दिवशी माझा महिला दिन साजरा झाला.

****************

“काही अडचण आली ना तर तुझ्याशी बोललं की बरं वाटतं. आपोआप सोल्युशन्स मिळत जातात आणि सगळे प्रॉब्लेम चुटकीसरशी सुटतात.” जेव्हा  बहिणी, मित्र-मैत्रिणी अशी सुरुवात करून त्यांचा प्रॉब्लेम विश्वासाने सांगतात आणि माझ्यावर अवलंबून राहतात …त्याच दिवशी खरं तर माझा महिला दिन साजरा झाला

****************

लेकीच्या कॉलेजमधील माझ्या आयुष्यातील हिरो या विषयावरील भाषण स्पर्धेत  हिरो म्हणून तिने माझं नाव घेतलं आणि सगळ्या प्रेक्षकांनी टाळ्यांनी सभागृह दणाणून सोडलं…

 खरंच सांगते त्या दिवशी माझा महिला दिन साजरा झाला

****************

“तुम्ही नक्की करू शकता हे काम. काहीच अवघड नाही. Pl. Go ahead. We believe in your capabilities” पुरुषांच्या बरोबरीने कामाची जबाबदारीही तितक्याच आश्वस्तपणे बॉसने खांद्यावर टाकली, आणि सफलेतही भागीदारी दिली.. त्याच दिवशी माझा महिला दिन साजरा झाला.

****************

“मुली आहेत म्हणून काय झालं? माझ्या मुली माझा आधार आहेत.. अभिमान आहेत” असं म्हणत वडिलांनी पुढे प्रॉपर्टीबरोबरच खांदा आणि अग्नी देण्याचा अधिकारही आम्हाला बहाल केला. त्यांचं हे मानस ऐकलं… आणि खरं सांगते त्याच दिवशी माझा महिला दिन साजरा झाला.

*****************

नेहमीप्रमाणे नवऱ्याने ऑफिसला जाताना जवळ घेऊन आज Love you न म्हणता ‘ आम्हाला तुझा अभिमान आहे ‘ असं म्हटलं आणि सकाळी सकाळीच खरं सांगते माझा महिला दिन साजरा झाला.

महिलादिन म्हणजे महिलांसाठी विविध कार्यक्रम… कुठेतरी सवलतीच्या दरात काहीतरी उपलब्ध करून देणे किंवा  वेगवेगळ्या  पुरस्कारांची लयलूट करणे नाही.   इतक्या क्षुल्लक गोष्टींतून कोणी स्त्रीच्या आयुष्यात आनंद आणू शकत नाही…

महिलांच्या सबलीकरणावर आतापर्यंत बऱ्याच महिलांनी तसेच त्यांच्या बरोबर काम करणाऱ्या पुरुष सहकार्यांनी सुद्धा  विविध स्तरांवर अवलोकन केले आहे.

डॉ. शुभांगी कुलकर्णी यांची एक अतिशय सुंदर कविता वाचनात आली होती. 

“ती स्त्री आरशाला विचारते–  

कसा आहेस?

आरसा म्हणतो ठीकाय..

फक्त ती चौकट तेवढी काढून टाक.. गुदमरायला होतंय.

तिने चौकट काढली आणि तेव्हापासून तिचा उत्फुल्ल चेहरा आरशात कधी मावलाच नाही…”

 

लेखक : अज्ञात

संग्राहिका –  सुश्री प्रभा हर्षे 

पुणे, भ्रमणध्वनी:-  9860006595

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments