सुश्री सुनीला वैशंपायन 

? मनमंजुषेतून ?

☆ अस्तित्व आणि अधिकारासाठी दिलेला लढा… ☆ सुश्री सुनीला वैशंपायन 

8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन . स्त्रीचे अस्तित्व आणि अधिकार यासाठी दिलेल्या लढ्याचे स्मरण म्हणून जगभर साजरा केला जाणारा दिवस. Clara Zenth या जर्मन स्त्रीच्या पुढाकाराने हा जगभर पसरला आणि यशस्वी झाला..याची सुरुवात १९१० मध्ये झाली.

असं म्हणतात भरपूर वेळ घेऊन ईश्वराने निर्माण केलेली एक नितांत सुंदर, भावपूर्ण, प्रेमळ, प्रसंगी कणखर अशी कलाकृती म्हणजे स्त्री. “जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती या जगाते उध्दारी “, “क्षणाची पत्नी अनंत काळाची माता ”, “ देवी, राक्षसांचा, दुर्जनांचा संहार करणारी “ वगैरे भारदस्त विधानं जरी तिच्याबद्दल केली गेली असली,  तरी समाजात तिला सहसा कायमच दुय्यम स्थान मिळालेले आपण पाहतो.

एक निर्बल भोगवस्तू म्हणून तिच्यावर अधिकार गाजवण्यासाठी झालेल्या लढाया आणि त्यात  तिने केलेले  आत्मदहन, जोहार हे जसे सर्वश्रुत आहे, तसेच एकीकडे हेही सर्वश्रुत आहे की इतिहासात अनेक शूर स्त्रिया होऊन गेल्या. स्वातंत्र्यलढ्यात अनेक स्त्रियांचे योगदान आहे. आणि आता स्त्रियांच्याच प्रयत्नांनी स्त्रियांना  स्वातंत्र्य आणि समानता मिळत आहे हेही महत्वाचे आहे. अशा सगळ्याच स्त्रियांची आठवण म्हणून हा महिला दिन. 

फक्त अतिशय समजूतदारपणा, प्रेमळपणा, सहनशीलता हे सहज दिसणारे गुणविशेषच नाहीत, तर बुद्धी, कल्पकता, चातुर्य, साहस ,जिद्द, हेही गुणविशेष  पुरुषांइतकेच तिच्यामध्येही आहेत हे स्त्रीने आता वेळोवेळी आणि अनेक क्षेत्रात सिद्ध केले आहे. मी तर म्हणेन की ती multi taskerआहे, आणि हा विशेष गुण पुरुषांमध्ये बराचसा अभावानेच आढळतो हेही आता उघड सत्य ठरले आहे.  म्हणूनच जगाला आवर्जून स्त्रियांची जाहीर दखल घ्यावीशी वाटते. कारण समाजात स्त्रीचे अस्तित्व पुरुषांइतकेच महत्त्वाचे आहे हे सत्य आता विवाद्य राहिलेले नाही. स्त्रीच्या अस्तित्वासाठी आणि अधिकारासाठी सुरु झालेल्या लढ्याचं पहिलं पाऊल आता जणू एक मैलाचा दगड म्हणून इतिहासात कायमचं नोंदलं गेलं आहे. 

मुळातच स्त्री ही पुरुषापेक्षा शक्तीने कमी असते हा निसर्ग नियम आहे. पण काही स्त्रिया यावरही मात करतांना आता वरचेवर दिसून येते. थोडक्यात काय, तर लिंगभेद, रिप्रॉडक्टिव्ह राईट, व्हायलेन्स अब्युज या विरुद्ध तिला द्यावी लागणारी लढाई आता खूपच मिळमिळीत झाली आहे असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरणार नाही. 

विविध संशोधन क्षेत्रे, राजकारण ,सायन्स, मेडिसिन,अर्थ ,खेळ, सैन्यदल, यामध्ये तर ती आता सर्रास आहेच. शिवाय वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्येही तिचा दमदार सहभाग आहे. पोलीसदल, रिक्षा किंवा चारचाकी वाहनचालक, शिक्षणक्षेत्रात लक्षवेधी वाटचाल अशा विविध प्रांतात, आणि अध्यात्मासारख्या सहजसाध्य नसलेल्या प्रांतातही ती यशस्वीपणे मिळवत असलेले ज्ञान…..सगळंच अतिशय कौतुकास्पद. खरंतर आता असे एकही महत्वपूर्ण क्षेत्र उरलेले नाही, जिथे स्त्रीने आपले कर्तृत्व सिद्ध केलेले नाही.  अगदी अवकाशातही भरारी घेण्यात, त्यासाठीच्या अतिशय गुंतागुंतीच्या महत्वपूर्ण संशोधनात  पुरुषांच्या बरोबरीने तिचा सहभाग आहे…. स्त्री आता खरोखरच ‘ स्वयंसिद्धा ‘ ठरलेली आहे. सिंगल मदर म्हणून एकटीने मुलांचे उत्तम संगोपन करण्यात देखील ती यशस्वी झालेली आहे – होते आहे. 

इथे एक गोष्ट आवर्जून सांगायला हवी. शहरवासीयांसाठी अनेक मार्ग खुले असतात. पण विपरीत परिस्थितीतून, आडगावातून पुढे आलेल्या अशाही स्त्रिया आहेत, ज्या “पद्मश्री” पुरस्काराच्या मानकरी आहेत. अशा स्त्रियांबद्दल मला विशेष आदर वाटतो. असे पुरस्कार मिळवणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यातील काही जणींचा उल्लेख करायचा तर —

१) मध्यप्रदेशातील काटक्या गोळा करणारी दगडफोड करणारी दुधीयाबाई– एक चित्रकार– पद्मश्री मानकरी

२) कलकत्ता येथील प्रीती कोना–कांथा वर्क

३) छत्तीसगडची कलाकार उषा बारले– नाच

४) झाबुवा ,मध्य प्रदेश, मधील दाम्पत्य शांती आणि रमेश पवार— आदिवासी गुडिया

५) हिमोफेलियावर संशोधन करणाऱ्या डॉक्टर नलिनी पार्थसारथी

६) गणित प्रेमी सुजाता— अनेक पुरस्कार आणि पद्मश्री. 

अर्थात या सगळ्याच्या जोडीने एक वेदनादायक सत्य अजूनही काही ठिकाणी आपले नकोसे अस्तित्व दाखवून देत असते. ठराविक पद्धतीनेच आयुष्य व्यक्तीत केले पाहिजे हा विचार अडाणी अशिक्षित वर्गातच फक्त नसतो, तर तो शिक्षित उच्चभ्रू समाजात देखील दिसतो हेही असेच एक सत्य. छत्तीसगडच्या आदिवासी समाजात जन्मलेली एक लहानशी मुलगी… तिला नाचाची अत्यंत आवड… पण नाच म्हणजे समाजात मान खाली घालायला लावणारी कला… म्हणून बापाने त्या मुलीला विहिरीत फेकून मारण्याचा प्रयत्न केला आणि कोणीही त्याला प्रतिकार केला नाही.  पण ही मुलगी केवळ स्वतःच्या मनोबलावर जिद्दीने त्या परिस्थितीतून आपला मार्ग शोधते आणि स्वतःला सिद्ध करते हे आवर्जून लक्षात घेण्यासारखे. अशा अनेक स्त्रिया. अगदी सुधा मूर्ती यांच्यासारख्या प्रचंड बुद्धिवान स्त्रीला देखील जेंडर डिस्क्रिमिनेशनला तोंड द्यावं लागलं. पण त्यांनी खंबीरपणे आणि चिकाटीने सगळ्या अडथळ्यांना यशस्वीरीत्या पार केले आणि   आपली योग्यता सिद्ध करून दाखवली. आज ‘ सुधा मूर्ती ‘ हे नाव कुणाला माहित नाही ? अशी वेगवेगळ्या क्षेत्रात उत्तम कर्तबगारी दाखवणाऱ्या किती जणींची नावं घ्यावीत … ज्या सगळ्या पद्म पुरस्कारांच्या मानकरी आहेत …. सर्वांच्या मनात आदराचे स्थान मिळवलेल्या आहेत . 

अर्थात जसे यशस्वी पुरुषामागे स्त्री असते म्हणतात, तसेच यशस्वी स्त्रीच्या मागेही पुरुष असतो हे तर खरेच. पण ही गोष्टही स्त्री जास्त दिलखुलासपणे मान्य करते हेही तितकेच खरे.  

८ मार्च प्रमाणेच १३ फेब्रुवारी हा दिवसही श्रीमती सरोजिनी नायडूंच्या स्मरणार्थ ‘ नॅशनल वूमन्स डे ‘ म्हणून साजरा केला जातो. देशबांधणीत हातभार लावलेल्या स्त्रियांचा हा गौरव दिन असतो. कदाचित याची माहिती फारशी सर्वश्रुत नसेल म्हणून इथे आवर्जून या गोष्टीचा उल्लेख करायलाच हवा. 

या सगळ्या ज्ञात-अज्ञात स्त्रियांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या लढ्याला… कार्याला आणि… त्यांनी मिळवलेल्या गौरवास्पद यशाला माझं मनःपूर्वक अभिवादन…

संग्राहिका : सुश्री सुनीला वैशंपायन

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_printPrint
3 2 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments