? मनमंजुषेतून ?

☆ अशक्य ते शक्य करिता सायास… श्री सुहास कुलकर्णी ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

शिवथरघळची ट्रिप एकंदरीत छान झाली असे म्हणत घरी आलो आणि वेगळीच गोष्ट लक्षात आली. घरी आल्यावर चेहरा धुताना माझ्या पत्नीला ( सौ. मीना ला) जाणवले कि, गळ्यातील लहान मंगळसूत्र गायब आहे. दिवसभरात अनेक ठिकाणी गेलो होतो. कुठे पडले असेल अंदाज बांधणे कठीण. अनेक शक्यतांपैकी एक शक्यता म्हणजे आम्ही वापरलेल्या रेंटल कार मध्ये असू शकते. ड्रायवरशी लगेच संपर्क साधला पण काहीही मिळाले नाही.

निदान कुठे पडले समजले तर काहीतरी करता येईल या विचाराने आमच्यातील डिटेक्टिव्ह जागृत झाला. ट्रिप चे सर्व फोटो झूम करून पाहिले तेव्हा असे लक्षात आले कि शिवथरघळ च्या अलिकडे एका टपरीवर आम्ही चहा भजी खाल्ली तेव्हा मंगळसूत्र होते आणि त्या नंतरच्या फोटोत म्हणजे शिवथरघळ च्या पायर्‍या चढण्यापूर्वी पायथ्याशी काढलेल्या फोटोत मंगळसूत्र नव्हते. याचाच अर्थ एकतर ते गाडीत पडले किंवा पायथ्याशी असलेल्या पार्किंग एरियात पडले. ट्रिप ला बरोबर आलेला मित्र प्रकाश महाजन याच्या कानावर सदर घटना घातली. त्यांनी पण ड्रायवरला पुन्हा शोध घेण्यासाठी सांगितले तसेच दुसर्‍या दिवशी शिवथरघळ च्या ट्रस्टींना फोन करून घटना कानावर घातली.   

दोन चार दिवस फोनाफोनी व पाठपुरावा केल्यानंतर सत्य स्विकारून जीवन चालू होते. त्यानंतर सुमारे तीन महिन्यांनी अचानक फोन आला. सौ. मीनाने तो घेतला.

” हॅलो, आपण मीना कुलकर्णी ना?”

”  हो, आपण कोण ” 

“. मी PNG मधून स्मिता घाटपांडे बोलतीय. आपले मंगळसूत्र हरवले आहे का?” 

” हो ” 

” कुठे हरवले होते? “

” शिवथरघळला” 

” आमच्या सरांबरोबर बोलता का प्लिज?” 

” ओके” 

” नमस्कार मी प्रफुल्ल वाघ. 

आपले मंगळसूत्र कधी हरवले? 

गळसूत्राचा एखादा फोटो आहे का? 

मंगळसूत्राची पावती आहे का?

महाडच्या एका कुटुंबाला आपले मंगळसूत्र सापडले आहे. ते त्यांना द्यायचे आहे. त्यांची फक्त एकच विनंती आहे. आपण त्या मंगळसूत्राचे मालक असल्याची खात्री पटवावी. मग आम्ही तुम्हाला त्यांचा फोन नंबर देऊ. “

तर, हे  कुटुंब कोणते व या स्टोरीत PNG कुठून आले? हा किस्सा जाणून घेणे रोचक आहे.

शिवथरघळहून तीस किलोमीटर अंतरावर महाड येथे पाथरे कुटुंब राहते. त्यांच्याकडे आलेल्या पाहुण्यांसह ते सर्वजण त्याच दिवशी शिवथरघळला आले होते. त्या कुटुंबातील आजींना ते मंगळसूत्र सापडले. त्याचवेळी तेथे असलेल्या माकडांनी  आजींची पर्स ओढण्याचा प्रयत्न केला. त्या गडबडीत मंगळसूत्राबद्दल कोणाला सांगायचे राहून गेले. त्या नंतर आजींचे आजारपण झाले. त्यानंतर मात्र आजींनी याबद्दल चर्चा केली. आजींचा आणि कुटुंबाचा मानस पक्का होता. मूळ मालक शोधायचा व मंगळसूत्र त्यालाच द्यायचे. 

काम थोडे अवघड होते. शिवाय मंगळसूत्र खोटे असेल तर खटाटोप कशाला असा विचार करून त्यांनी ते मंगळसूत्र ‘ रत्नदीप ज्युवेलर्स ‘ या स्थानिक सोनारास दाखवले. त्यांनी ते खरे असल्याची ग्वाही दिली आणि ते PNG ( पुणे ) यांचेकडून केलेले असल्याचे निदर्शनास आणले. तसेच प्रत्येक दागिन्यावर एक नंबर असतो ज्या आधारे पावती व मालक शोधणे शक्य असते असेही सांगितले. इतकेच नाही तर PNG च्या काही ब्रांचेसला दागिन्यावरील नंबर सांगून माहिती मिळवण्याचा  प्रयत्नही केला पण उपयोग झाला नाही. मग रत्नदीप ज्युवेलर्सने असा सल्ला दिला की पुण्यात सिंहगड रोडवर अभिरुची माॅलमध्ये PNG चे कार्पोरेट आॅफिस आहे तेथे सर्व ब्रांचेसचा एकत्र डेटा असतो त्यामुळे मंगळसूत्राच्या मालकाचा शोध लागू शकतो. 

या घटनेनंतर सुमारे महिनाभराने पाथरे कुटुंबियांस पुण्यातील आजारी नातेवाईकांस भेटावयाचे होते. त्याचवेळी ते PNG च्या कॉर्पोरेट आॅफिसमध्ये मंगळसूत्र घेऊन गेले. मंगळसूत्राची पावती संगणकावर सापडली. मालकाचे नाव कळले  पण त्यावर पत्ता अपूर्ण होता व मोबाईल नंबर चा एक अंक चुकला होता. शोधकार्याच्या अगदी जवळ जाऊन सुद्धा काही साध्य झाले नाही. पाथरे कुटुंबीय नाईलाजाने मंगळसूत्र घेऊन घरी गेले. PNG ने शोधकार्य चालूच ठेवले.  नावावरून जुन्या पावत्या शोधल्या त्यात त्यांना मोबाईल नंबरचा अंदाज आला आणि अखेर 14 फेब्रुवारीला आम्ही त्यांना सापडलो.

आम्ही what’s app वर मंगळसूत्राची पावती पाठवली. मंगळसूत्राचा फोटो नव्हता म्हणून ज्या फोटोत मंगळसूत्र गळ्यात आहे असे ट्रिपचे. ग्रुप फोटो त्यांना पाठवले. पावतीमुळे गाडगीळांची खात्री पटली आणि ग्रुप फोटो पाहून पाथरे कुटुंबियांची. त्यांनी आम्हाला लगेच ओळखले कारण ते आणि आम्ही एकाच दिवशी एकाच वेळी शिवथरघळला होतो.

हे सर्व घडण्यासाठी कष्ट घेणार्‍या पाथरे कुटुंबातील व्यक्ती म्हणजे श्रीयुत महेश व सौ. श्रुती पाथरे. आमचा शोध लागावा म्हणून पाथरे आजी रोज देवाला साकडे घालत होत्या. जर आमची त्यांची भेट झाली नसती तर मंगळसूत्र गंगार्पण करायचे आजींनी ठरवले होते. प्रामाणिकपणाच्या जोडीला प्रामाणिक प्रयत्न केले तर काय घडू शकते याचा हा प्रसंग वस्तुपाठ आहे.

खरंतर पाथरे कुटुंबियांच्या नावाला कुठेही प्रसिद्धी देऊ नये अशी श्रुती पाथरे यांनी विनंती केली होती पण अशी माणसं आजही असतात हे नव्या पिढीला कळणे आवश्यक आहे.

पाथरे कुटुंबियांची प्रामाणिक तळमळ गाडगीळांच्या लक्षात आली असावी. रविवर्मा यांच्या चित्राची एक फ्रेम पाथरे यांना देण्यासाठी आमच्या घरी आणून दिली. आम्ही पण त्यांना अल्प भेटवस्तू दिल्या. यावर त्यांनी आम्हाला प्रत्येकाला काही ना काही रिटर्न गिफ्ट म्हणून दिले. महाडच्या ज्या रत्नदीप ज्युवेलर्सने या विषयात मदत केली त्यांची आमची भेट पाथरे यांनी घालून दिली.

आज आम्हाला मंगळसूत्राच्या जोडीला बरेच काही मिळाले. 

मनाने श्रीमंत माणसांचा लाभलेला सहवास

निर्मळ प्रामाणिकपणा

मनापासुन केलेले आदरातिथ्य

प्रसिद्धीपासून दूर स्वभाव

भरभरून देण्याची वृत्ती 

PNG च्या माणसांनी सचोटीने केलेला पाठपुरावा

रत्नदीप सोनारांनी out of the way जाऊन केलेली मदत. 

सर्वच विचारापलिकडचे .

खरोखर हा प्रसंग धन्यतेचा अनुभव देणारा होता.

मंगळसूत्र मिळाल्यावर आम्ही पुन्हा शिवथरघळला गेलो. दर्शन घेतले. समर्थ कृपेनेच हा अद्भुत चमत्कार घडून आला असेच म्हणावे लागेल.

अशी ही साठा उत्तरी कहाणी पाचा उत्तरी सुफल संपूर्ण.

लेखक : श्री सुहास कुलकर्णी

कोथरूड पुणे.

प्रस्तुती : बिल्वा अकोलकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments