सौ. उज्ज्वला केळकर
मनमंजुषेतून
☆ संवादु- अनुवादु– उमा आणि मी- भाग २ ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆
(मागील भागात आपण पाहिले – अनेक पुरस्कार त्यांना मिळत गेले. आता इथून पुढे)
उमाताईंच्या विशेष आवडत्या कादंबर्यांमध्ये ‘पर्व’ चा आवर्जून उल्लेख करायला हवा. ‘पर्व’ ही भैरप्पांची कादंबरी. याच्या अनुवादाच्या संदर्भात उमाताईंनी आठवण लिहिलीय, ‘माराठीत व्यासपर्व, युगांत, मृत्युंजय यासारखी चांगली पुस्तके असताना महाभारतावरील कथेचा आणखी एक अनुवाद कशाला करायचा?’, असं त्यांना वाटत होतं, पण विरुपाक्ष त्यांना ही कादंबरी जसजशी वाचून दाखवू लागले, तसतसं त्यांचं मत बदलत गेलं आणि कृष्णावरचा भाग त्यांनी वाचून दाखवल्यावर, त्यांनी या कादंबरीचा अनुवाद करायचा असा निश्चयच केला आणि त्याचा त्यांनी अनुवाद केला. मराठीत तो चांगलाच गाजला. त्याच्या पाच-सहा आवृत्या निघाल्या. पुढे या कादंबरीला १९९९ साली स. ह. मोडक पुरस्कारही मिळाला. मला हे सगळं वाचताना गम्मत वाटली, ती अशासाठी की मलाही सुरूवातीला वाटलं होतं की महाभारतावर मराठीत इतकं लिहिलय आणि आपण वाचलय की त्यावर आता आणखी काय वाचायचं? पण प्रा. अ. रा. तोरो यांच्या आग्रहामुळे मी ती वाचली आणि मला ती इतकी आवडली की पुढे मी अनेक वाचनप्रेमींना ही कादंबरी वाचायला आवर्जून सांगत राहिले. ही कादंबरी वाचल्यावर मला प्रकर्षाने उमाताईंची ओळख करून घ्याविशी वाटली. काय होतं या कादंबरीचं वेगळेपण? या कादंबरीला समाजशास्त्राचा पाया होता. महाभारत काळात समाजातील रीती-रिवाज, प्रथा-परंपरा, विचार-संस्कार यात बदल होऊ लागले होते. या परिवर्तनाच्या काळातील समाजावर यातील कथानकाची मांडणी केली आहे. ‘मन्वंतर’ असा शब्द उमाताईंनी वापरला आहे. स्थीर झालेल्या समाजापेक्षा आशा परिवर्तन कालावर कथानक रचणे अवघड आहे, असे उमाताई म्हणतात. काळामुळे घटना-प्रसंगांवर चढलेली, चमत्कार, शाप-वारदानाची पुटे भैरप्पांनी यात काढून टाकली आहेत. उमाताईंची ही अतिशय आवडती कादंबरी आहे.
उमाताईंनी केवळ अनुवादाचंच काम केलं असं नाही. त्यांनी सभा-संमेलनातून, चर्चा-परिसंवादातून भाग घेतला. व्याख्याने दिली. ड्रॉइंग आणि पेंटिंग विषय घेऊन एम. ए. केलं. भारतीय मंदिर-शिल्पशास्त्रातील द्रविड शैलीची उत्क्रांती विकास आणि तिची कलात्मक वैशिष्ट्ये’ या विषयावर पीएच. डी. केली. त्या निमिताने भरपूर प्रवास केला. प्रवासाचा आणि मंदिराच्या शिल्पसौंदर्याचा आनंद घेतला. त्यांना फोटोग्राफीचाही छंद आहे. जीवनात जमेल तिथून जमेल तितका आनंद त्या घेत राहिल्या.
उमाताईंनी ’केतकर वाहिनी’ ही स्वतंत्र कादंबरी लिहिली. त्यांची मैत्रीण शकुंतला पुंडे यांच्या आईच्या जीवनावर आधारलेली ही कादंबरी. या कादंबरीवर आधारित पुढे आकाशवाणीसाठी ९ भागांची श्राव्य मालिका त्यांनी लिहिली. त्याही पूर्वी ‘वंशवृक्ष’वर आधारित १४ भागांची मालिका त्यांनी लिहिली होती. त्यानंतर ‘ई’ टी.व्ही. साठी कन्नडमधील ‘मूडलमने’ या मालिकेवर आधारित ‘सोनियाचा उंबरा’ ही ४०० भागांची मालिका लिहिली. या निमित्ताने त्यांनी माध्यमांतर करताना करावा लागणारा अनुवाद, त्यातील, तडजोडी, त्या प्रकारच्या अनुवादाची वैशिष्ट्ये या बाबतचे आपले अनुभव आणि चिंतन मांडलं आहे. हे सारे करताना त्यांना खूप परिश्रम करावे लागले असणार, पण आपल्या आवडीचे काम करताना होणार्या परिश्रमातूनही आनंद मिळतोच ना!
‘संवादु- अनुवादु’ हे शीर्षक त्यांनी का दिलं असावं बरं? मला प्रश्न पडला. या आत्मकथनातून त्यांनी अनुवादाबाबत वाचकांशी संवाद साधला आहे. असंही म्हणता येईल की कलाकृतीशी ( पुस्तकाशी आणि त्याच्या लेखकाशी) संवाद साधत त्यांनी अनुवाद केला आहे? त्यांना विचारलं, तर त्या म्हणाल्या, ‘मी इतका काही शीर्षकाचा विचार केला नाही. स्वत:शीच संवाद साधत मी अनुवाद केला, म्हणून ‘संवादु- अनुवादु’.
‘संवादु- अनुवादु’च्या निमित्ताने गतजीवनाचा आढावा घेताना त्या या बिंदूवर नक्कीच म्हणत असणार, ‘तृप्त मी… कृतार्थ मी.’ एका सुखी, समाधानी, यशस्वी व्यक्तीचं आयुष्य आपण जवळून बघतो आहोत, असंच वाटतं हे पुस्तक वाचताना. अडचणी, मनाला त्रास देणार्या घटना आयुष्यात घडल्या असतीलच, पण त्याचा बाऊ न करता त्या पुढे चालत राहिल्या. पुस्तकाच्या ब्लर्बमध्ये अंजली जोशी लिहितात, ‘या आत्मकथनात तक्रारीचा सूर नाही. ठुसठुसणार्या जखमा नाहीत. माझे तेच खरे, असा दुराग्रह नाही. तर शांत नितळ समजुतीने जीवनाला भिडण्याची ताकद त्याच्या पानापानात आहे.’ त्या मागे एकदा फोनवर म्हणाल्या होत्या, ‘ जे आयुष्य वाट्याला आलं, ते पंचामृताचा प्रसाद म्हणून आम्ही स्वीकारलं.’
‘संवादु- अनुवादु’ वाचताना मनात आलं, उमाताईंना फोनवर म्हणावं, ‘तुमची थोडीशी ऊर्जा पाठवून द्या ना माझ्याकडे आणि हो ते समाधानसुद्धा….’ या पुस्तकाच्या निमित्ताने मी उमाताईंना अधून मधून फोन करत होते. त्यातून मध्यंतरीच्या काळात प्रत्यक्ष भेटी न झाल्यामुळे दुरावत गेलेले मैत्रीचे बंध पुन्हा जुळत गेले आहेत. आता मोबाईलसारख्या आधुनिक माध्यमातून हे बंध पुन्हा दृढ होत राहतील. प्रत्यक्ष भेटी होतील, न होतील, पण मैत्री अतूट राहील. मग मीच मला म्हणते, ‘आमेन!’
– समाप्त –
© उज्ज्वला केळकर
संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170 ईमेल – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈