☆ “माझ्या आर्मी लाईफची एक झलक” भाग – 1 – लेखिका – सुश्री संध्या बेडेकर ☆ प्रस्तुती – सुश्री कालिंदी नवाथे ☆
“हा लेख सेनेच्या सर्व Lady Wives ना समर्पित करते.”
“Proud To Be A Wife Of Indian Soldier.”
आज आम्ही सर्व बहिणी एकत्र जमलो होतो .आमचे स्पेशल गेटटूगेदर होते . ताईच्या घरी नुकतेच renovation झाल्यामुळे घर मस्त दिसत होते. आता त्यांनी वयाच्या व सवयींच्या अनुरूप घरात चेंजेस केले होते.
ताई म्हणाली,
अग !! तीस वर्षे झाली. लग्नानंतर काही वर्षांनी आम्ही या घरात रहायला आलो. तेच ते बघून बघून कंटाळा आला होता . मुलांची शिक्षण ,लग्न सर्व याच घरात झाली .••••
मी हसले, … तर ताई म्हणाली,… का ग ? कशाला हसलीस ?? …
मी म्हटलं,… अगं!! या तीस वर्षांत तर मी अक्षरशः अर्ध्या भारतभर फिरले . या अवधीत किती घर बदलली ???व मुलांच्या किती शाळा बदलल्या ??? मोजावेच लागेल मला.
आता मात्र सर्वांची उत्सुकता वाढली.
‘आर्मी लाईफ’ वेगळेच असते. त्याबद्दल जाणून घ्यायची उत्सुकताही असते. काही समज गैरसमज ही असतात .आज सर्वांनी आग्रह केला , म्हणून मी त्यांना माझ्या तीस वर्षांहून जास्त आर्मी लाईफचा अनुभव सांगायला सुरुवात केली.
मी म्हटलं,
लग्नानंतर सामान्यतः एका स्त्रीचे आयुष्य म्हणजे तिचा नवरा त्याची नोकरी, मुले त्यांचे शिक्षण, घर सांभाळणे. प्रामुख्याने हेच तिचे विश्व असते . नवऱ्याच्या नोकरीवर तिचे आयुष्य अवलंबून असते . दोघांनी मिळून घराकडे लक्ष द्यायचे. हा एक साधारण अलिखित करार असतो.
परंतु ‘आर्मी ऑफिसर’ बरोबर लग्न झाल्यावर हे समीकरण थोडं बदलत. कारण,
“An Army man is on duty for 24 hours.”
येथे ‘No ‘ शब्द चालतच नाही. It is always ‘YES ‘ and only ‘YES.’
नोकरी बरोबर मधून मधून कोर्सेसही असतात. युद्ध व्हाव अस कधीच कोणाला वाटत नाही. पण झालंच तर तुमची तयारी असावी. म्हणून “जीत का मंत्र ” द्यायला,
“लक्ष की ओर हमेशा अग्रसर’ रहायला ‘physically mentally toughness’ जागृत ठेवायला , वेगवेगळे कोर्सेस होत राहतात. कोणत्याही वेळेस युद्ध जिंकायला तयार असणे. याची तयारी होत असते.
“Actually, any army personnel is paid for this day only.”
“आधी देशाचे काम मग घरचे.” हा साधा सरळ हिशोब असतो.
हे सर्व नोकरीत रुजू व्हायच्या आधी माहीत असतंच. ही नोकरी करणे तुमचा ‘choice’ असतो. तुम्हीच ठरविलेले असते. आर्मी ऑफिसर शी लग्न झाल्यावर का?? कशाला?? मीच का?? असे प्रश्न उद्भवतच नाही.
म्हणून बायकोची जबाबदारी वाढते.
आता थोडं माझ्याबद्दल म्हणजे जनरल ‘army wives’ बद्दल सांगायचे झाले तर थोडयाफार फरकाने सर्वांची स्टोरी मिळतीजुळतीच असते.
रिटायरमेंट नंतर, सध्या ज्या घरात मी पर्मनंट राहते आहे , ते माझ्या आयुष्यातले ‘विसावे’ घर आहे. म्हणजे आजपर्यंत मी वेगवेगळ्या शहरात वेगवेगळया घरात राहिले. कधी दहा खोल्यांच्या जुन्या ब्रिटिशकालीन बंगल्यात, तर कधी अगदी दोन खोल्यांचे घर.
प्रत्येक ‘Posting’ मधे अशीच तयारी करायची की, कुठेही सहज राहता येईल, स्वयंपाक करता येईल . म्हणजे प्रत्येक Posting मधे ‘mini ‘ संसाराच्या चार पेट्या तयार करायच्या, व वेळ निभावून घ्यायची. “स्वयंपाक ,शाळा, अभ्यास “या तीन गोष्टींना प्राथमिकता द्यायची व नवीन जागी लवकरात लवकर ‘ adjust ‘ व्हायचा प्रयत्न करायचा . आमच्या ‘Comfort’ ची व्याख्या खूप सीमीत होती.
प्रत्येक ‘Posting ‘ मधे दोन तीन पेट्या वाढायच्याच. असं म्हणतात, पेटयांचा टोटल नंबर मोजून आर्मी ऑफिसरची ‘Rank’ व एकंदर किती ‘Postings’ झाल्या ते कळत. आम्ही रिटायर्ड झालो, तेव्हा ‘सत्तर’ पेटया होत्या. म्हणजे नोकरीच्या पस्तीस वर्षाचा आमचा संसार त्या जीवाभावाच्या पेट्यांमधे होता.
तुमचे विचार खूप स्पष्ट असले , तर तुम्ही तुमचे आयुष्य छान प्लान करू शकता. आम्हाला या नोकरीचे प्लस मायनस points माहीत होते. म्हणून आम्ही आधीच ठरवले की व्यवस्थित रहायचे. मग पेटयांचा नंबर वाढणारच. त्या टिपिकल काळया लाकडी पेट्या खूप कामाच्या होत्या. त्यांनी आयुष्यभर खूप इमानदारीने आमची साथ दिली. कधी पलंग, तर कधी पेटी. आवश्यकतेनुसार त्यात सामान ठेवून वेळोवेळी काळया पेटयांची मदत झाली.
आता मुलींच्या शिक्षणाबद्दल सांगायचे झाले तर, माझ्या मुलीने बारावी पास होईपर्यंत बारा शाळांमधून शिक्षण घेतले. म्हणजे साधारण प्रत्येक वर्षी… नवीन शाळा, शिक्षक, मित्र मैत्रिणी बदलायच्या. प्रत्येक नवीन जागी स्वतःला प्रूव्ह करायचे. बरं, हे सर्व वर्ष सुरू होण्यापूर्वीच होईल असे नाही. एकदा तर ‘ half yearly ‘ परीक्षेच्या एक दिवस आधी अॅडमिशन घेतली . दुसऱ्या दिवशीपासून सुरू होणाऱ्या परीक्षेचे सिलेबस व रोल नंबर घेऊन घरी आलो . ‘उधमपूर ‘ ‘जम्मू काश्मीर’ मधील ही नवीन जागा, ती पण पहाडी , शाळेत एडमिशन साठी जाताना एक मुलगी रडली व येताना दुसरी . व त्यात आणखी भर म्हणजे त्यांचे बाबा आमच्याबरोबर नवीन जागी नव्हते . वेळेवर काही कारणाने त्यांना थांबावे लागले. मी मुलींना घेऊन उधमपूरला पोचले होते. मला तो दिवस चांगला आठवतो . त्यादिवशी दोघींनी दहा बारा तास अभ्यास करून दुसऱ्या दिवशीच्या परीक्षेची तयारी केली होती .कारण सिलेबस वेगळा होता.
आर्मीमध्ये नेहमी नवऱ्याबरोबर राहता येईलच, असे नसते, ‘Field posting’ मधे फॅमिलीला बरोबर राहता येत नाही . म्हणून अशा तडजोडी करण्याशिवाय दुसरा पर्याय नसतोच . यात एकच खंत वाटते की अगदी लहानपणापासूनचे बरोबर शिकलेले मित्र मैत्रिणी माझ्या मुलींना नाहीत .
यातही एक सकारात्मक विचार असा की… प्रत्येक नवीन स्टेशनवर ,नवीन मुलांमध्ये , पहिल्या ‘पाच ‘ मधे तुम्ही आपली पोझिशन मेन्टेन ठेवली, तर आयुष्यात पुढे द्याव्या लागणाऱ्या ‘competitive ‘ परीक्षेची तयारी आपोआपच होत जाते. मुलेही टफ लाईफला सामोरे जायला हळूहळू शिकतात . हे सर्व खूप सोप्प नक्कीच नव्हतं, पण दुसरा पर्यायही नव्हता. बरे असो, याचा प्रभावी परिणाम आता दिसतोय. सर्वांना कुठेही सहज एडजस्ट होता येतंय.
– क्रमशः भाग पहिला.
लेखिका : सुश्री संध्या बेडेकर
प्रस्तुती : सुश्री कालिंदी नवाथे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈