सुश्री मंजुषा सुनीत मुळे

☆ मनमंजुषेतून ☆ रावण दहन… ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ 

दसऱ्याला टीव्हीवर अनेक ठिकाणचा ‘ रावण- दहन’ सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा होतांना पाहिला आणि अचानक मनात विचारांची गर्दी झाली. ‘रावण वध’ हे सुष्ट वृत्तीने दुष्ट वृत्तीवर विजय मिळवल्याचे ठळक उदाहरण  असे वर्षानुवर्षे मानले जाते. रावण राक्षसी वृत्तीचा होता- स्वतःच्या बहिणीच्या अपमानाचा बदला म्हणून त्याने सीतेला पळवले- आणि म्हणून  रामाने युद्ध करून त्याचा वध केला …. एवढेच वर्षानुवर्षे लक्षात ठेवले गेले आहे. पण या  दोन घटनांच्या मधल्या सत्याकडे मात्र कुणीच लक्ष दिले नाही याचे आश्चर्य, आज समाजात घडणाऱ्या घटना पहाता प्रकर्षाने वाटते. आज इतर बातम्यांइतक्याच आवर्जून येणाऱ्या बातम्या असतात त्या स्त्रियांचे अपहरण, बलात्कार, शारीरिक- मानसिक छल …यांच्या, ज्यामध्ये कामवासना – पूर्ती हाच उद्देश बहुतांशी असलेला दिसतो. सामूहिक बलात्कार हा त्याहूनही भयानक प्रकार. मग कायद्याच्या कचाट्यात अडकू नये म्हणून तिला मारूनच टाकायचे हेही तितकेच सहजसोपे वाटते. एखाद्या मुलीने आपल्याला नकार दिला तर, तिचा जो चेहेरा आवडत असतो तोच एसिड टाकून विद्रूप करणे, तिला आयुष्यातून उठवणे हाही भावनांच्या – विचारांच्या विद्रूपतेचा कळसच. असे असंख्य अत्याचार अनेक प्रकारे सतत होतच असतात. पण बरेचदा लोकलज्जेखातर आणि भीतीने ती त्याचारित स्त्रीच ते समाजापासून लपवून ठेवते हे तिच्याइतकेच पूर्ण समाजाचेही दुर्दैव आहे. अशा-काही घटना व्हाट्यावर येतातही. त्यांचा बभ्रा होतो. कोर्टकचेऱ्याही होतात. आरोपींना शिक्षाही ठोठावली जाते …… पण शिक्षेची अंमलबजावणी? …. ती जास्तीत जास्त लांबणीवर कशी पडेल , माफी मागण्याचे नाटक करून ती रद्दच कशी करता येईल, याचेच जोरदार प्रयत्न सुरू होतात, ज्यात समाजाचे प्रतिनिधीसुद्धा स्वतःचे ‘वजन’ वापरतांना दिसतात. हे पाहून कुणाही संवेदनशील असणाऱ्याचा तात्पुरता संताप होतोच. पण नंतर ती अत्याचारित स्त्री बाजूलाच रहाते, आणि खमंग चर्चा रंगत रहातात त्या फक्त खटल्याच्या……..

हे सगळे चित्रच अतिशय विकृत आहे.. आणि ते पहातांना खरोखरच प्रश्न पडतो की रावणाने सीतेला पळवण्याची मोठीच चूक केली होती, पण आत्ताची परिस्थिती पाहता तो इतका गंभीर गुन्हा म्हणता येईल का, की आज इतकी युगे लोटल्यानंतरही त्याचे आवर्जून प्रतीकात्मक दहन करावे ? समाजाने याचा नक्कीच विचार करायला हवा. आणि तो का ? या प्रश्नाला समर्पक अशी बरीच उत्तरे आहेत ……….

बहिणीच्या अपमानाचा बदला घेणे एव्हढाच तेव्हा रावणाचा हेतू होता, जो भावनेच्या भरात घाईघाईने पूर्ण करण्याची घोडचूक त्याने केली होती. पण सीतेवर कुठलाही अत्याचार करण्याचा विचारही त्याच्या मनात आला नव्हता, हे नंतरच्या त्याच्या वागण्यातून स्पष्ट दिसून येते. तो तिला कुठल्याही अज्ञातस्थळी घेऊन गेला नाही. त्याने तिला पहिल्यापासूनच अतिशय आदराने वागवले. इतक्या आदराने, की जो आदर आजही स्त्रीला सामान्यपणे दिला जात नाही.  अशोकवनासारख्या निसर्गरम्य जागी त्याने तिची रहाण्याची व्यवस्था केली. तिच्यासाठी आवर्जून स्त्री – सेविकांचीच नेमणूक केली. तिला उत्तम भोजन मिळण्याची व्यवस्था केली. तिथे तिच्या केसालाही धक्का लागणार नाही याची पूर्ण काळजी घेतली. त्या काळात स्त्रीने परक्या घरी राहणे पाप मानले जायचे. हा नियम आणि स्वतःची चूक लक्षात घेऊन, केवळ माणुसकी म्हणून सीतेशी औपचारिक लग्न  करण्याची तयारीही त्याने दाखवली होती. आत्तासारखा एसिड फेकून , बलात्कार करून सूड घेण्याचा विचार त्याच्या मनात येणेही अशक्य होते हे यावरून नक्कीच सिद्ध होते. रामाने युद्धाआधी पूजा करायचे ठरवले, आणि ती सांगायला , ‘ व्युत्पन्न ब्राह्मण‘ म्हणून रावणालाच बोलावले. आणि रामाचा मान राखत रावणही गेला. असे सगळे घडणे आज अशक्याच्याही पलीकडचे आहे. विशेष म्हणजे मरण्यापूर्वी त्याने रामाची माफी मागितली. आता हा सगळा रावणाचा ‘शुद्ध मूर्खपणा‘ समजला जाईल. पण त्याच्या मनाची शुद्धता, मोठेपणा याचा विचारही कुणी करणार नाही,  जो सगळ्यांनीच करणे  फार आवश्यक आहे. म्हणूनच आज आवर्जून असे म्हणावेसे वाटते की रावण- दहन करणे कायमचे थांबवून, आता प्रत्येकानेच स्वतःच्या मनातल्या राक्षसी वृत्तीचे , दुष्ट आणि घातक विचारांचे आणि दुष्ट वासनांचे जाणीवपूर्वक वेळोवेळी दहन करत राहण्याची फार जास्त गरज आहे. आणि  त्यासाठी  ” दसरा” उजाडण्याची गरजच नाही. कारण अशी प्रत्येक वेळ सोने वाटण्यासारखीच असेल………

 

©  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Prabha Sonawane

वेगळा विचार मांडणारा सुंदर लेख!