सौ राधिका भांडारकर

??

☆ “केवळ तुम्ही आहात म्हणून…” ☆ सौ राधिका भांडारकर

“Thank God! मी हा निर्णय घेतला-‘

‘बापरे! थोडा जरी उशीर झाला असता तर..?’

“देवा! या वेळेस साथ दे —’

‘कसे अगदी वेळेवर आलात!’

‘तरी मला वाटलंच होतं!—’

‘काय करावे समजत नाही, नक्की कुठे जावं कळत नाही. कोणती दिशा पकडू? हा दिवा मालवू की तो?’

“खरं सांगू? केवळ तुम्ही आहात म्हणूनच मी हे करू शकले.’

हे आणि असे सहज उमटलेले,  अंतरंगाच्या क्षितिजावर आलेले सहजोद्गार असतात.  कधी ते ओठावर येतात तर कधी पोटातच वास करतात.  पण भावनांची ही प्रतिक्षिप्त क्रिया आहे.  ती ओढून ताणून येत नाही.  ठरवूनही येत नाही.  भावनांच्या वादळात, व्यक्ती जेव्हा द्विधा मनस्थितीत असते तेव्हां त्यातून बाहेर पडताना, एखाद्या जलभाराने फुटलेल्या ढगासारखे, हे शब्दतरंग झरतात.

“तुम्ही आहात म्हणून”  या तीन शब्दात खूप काही दडलेलं आहे.  हे तीन शब्द जितके आधारभूत आहेत तितकेच ते कृतज्ञता दर्शक ही आहेत.  तसेच ते स्थितीदर्शक आहेत.  अंधारातून प्रकाशाची वाट सापडलेल्या, भेलकांडलेल्या, तावून सुलाखून बाहेर पडलेल्या,  श्वास कोंडला असता  प्राणवायू मिळालेल्या, भरकटलेल्या, गोंधळलेल्या, जीवात्म्याला दिशा सापडल्यानंतर, त्याच्या अंतरंगातून उलगडलेली ही शब्दांची लड आहे.  आता प्रश्न येतो तो हा की “तुम्ही आहात म्हणून..” या वाक्यातले “तुम्ही” नक्की कोण?  ज्यांचा त्याक्षणी आधार वाटला, ज्यांनी खरा हात दिला, ऐनवेळी सकारात्मक मदत केली म्हणून हे घोडं गंगेत नहालं!

हे “तुम्ही”  खरोखरच विविध आहेत.  वेगवेगळ्या टप्प्यांवर भेटलेले सहस्त्र हातांचे हे “तुम्ही”  आहेत.  ते एकरंगी नसून विविध रंगी आहेत.  कधी ते सगुण  तर कधी ते निर्गुण आहेत.  कधी ते ज्ञात आहेत तर कधी ते अज्ञात आहेत.  दूर आहेत, निकटही आहेत.  सावली देणारे आहेत उन्हाचा तडका ही जाणवणारे आहेत.  रानातल्या चकव्यासारखे आहेत तर “भिऊ नको! मी तुझ्या पाठीशी आहे.” म्हणणारेही आहेत.  कणा  मोडलेल्या पाठीवर हात ठेवून, “लढ.” म्हणणारेही आहेत. सॉक्रेटिसच्या विषाच्या पेल्यात हे “तुम्ही” आहेत. कृष्णाच्या बासरीत  ते आहेत.  आकाशातल्या ग्रहताऱ्यात , झऱ्यात , नदीत , पर्वतातही आहेत,  अर्जुनाच्या बाणात , भीमाच्या बाहुबलात,  युधिष्ठिराच्या सत्यप्रियतेत, युगंधराच्या गीतेत,  संतांच्या वचनात,   गांधारीच्या डोळ्यावरच्या पट्टीत,  कुंतीच्या  वेदनेतही आहेत.

“राऊळाच्या कळसाला लोटा कधी म्हणू नये”  या काव्यपंक्तीत आहेत. सुरात, लयीत,  प्रेमात,  रागात,  रंगात आहेत.  दृश्य आणि अदृश्य स्वरूपातले हे “तुम्ही”  अनंत अथांग आहेत.  आणि कधीतरी अवचित ते आपल्यासमोर असल्याचे जाणवते आणि मग आपण म्हणतो,

“केवळ तुम्ही आहात म्हणून…”

आपण साधे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवासास निघतो तेव्हा आपली केवढी धांदल उडालेली असते ! प्रवासात  लागणाऱ्या अनेक संभाव्य साहित्याची आपण विचारपूर्वक जमवाजमव  करतो.  शेवटच्या क्षणापर्यंत, आपण आपला प्रवास सुखकर व्हावा म्हणून प्रवासी बॅकपॅक मध्ये काही ना काही कोंबतच असतो. आणि सुरक्षित, सुखद वाटचालीची खात्री बाळगतो. 

मग जीवन ही तर लांबलचक सहलच आहे. कुठले विराम, कुठली  स्थानकं, कुठला मार्ग याविषयी आपण तसे अनभिज्ञच असतो नाही का?  मग या प्रवासासाठी लागणारे साहित्य नेमकं कुठलं  आणि कसं घ्यायला हवं? 

या प्रवासी पेटीत अनेक कप्पे आहेत, खण आहेत. काही गुप्त जागाही आहेत. काही उघडे आहेत, काही बंद आहेत.  आतही आहेत, बाहेरही आहेत. ज्या ब्रम्हांडापासून जीवनाच्या प्रवासाची सुरुवात होते,  तेव्हा काही कप्पे भरलेले असतातच. त्यात काही नातीगोती असतात काही गुणदोष असतात.स्थल, कालदर्शक असं बरंच काही असतं. पण बाकीच्या अनेक रिकाम्या जागा या सहलीच्या दरम्यान, कधी कळत नकळत तर कधी जाणीवपूर्वक भराव्या  लागतात.  वाटेत   खूप सिग्नल्स असणार आहेतच. कधी लाल, हिरवे,  तर पिवळे ही. 

मला इथे सहज एक आठवलं म्हणून उदाहरणादाखल सांगते—

एखादी, पदार्थ बनवण्याची स्पर्धा असते. स्पर्धेपूर्वी कुणी कुठला पदार्थ बनवायचा, हे ठरलेले असते.  बाजूच्या टेबलवर अनेकविध पाकक्रियेचे साहित्य ठेवलेले असते.  आणि त्यातून आपल्याला जे हवे ते नेमके उचलायचे असते.  वाटते तितके हे सोप्पे नसते बरं का?  स्पर्धक काहीतरी विसरतोच.  आणि मग ठरलेला पदार्थ बनवताना त्याची प्रचंड धावपळ होते. 

जगण्याच्या स्पर्धेतही नेमके हेच घडते.  ब्रह्मदेवाने आपल्यासमोर अफाट पसरून ठेवलेले आहे.  आणि नेमके त्यातलेच आपल्यासाठी योग्य असलेले ” वेचायचे आहे.  या प्रवासात “तुम्ही” ही  एक संज्ञा आहे.  त्याची अनंत रूपे आहेत. रंग,रस आहेत. तुम्हाला कुठली रूपं हवी आहेत ते तुम्हीच ठरवा.  पंचमहाभूते आहेत, षड्रिपू आहेत.  ध्येय, चिकाटी, जिद्द, स्वाभिमान ,स्वावलंबन, परिश्रम, सत्य, नीती, चातुर्य, बुद्धी असे सहस्त्र गुणही आहेत.  हे सारेच तुमच्या मार्गातले “तुम्ही” आहेत.  एकदा त्यांची निवड तुम्ही केलीत की ती योग्य आहे की अयोग्य, हे तुमच्या मुखातून प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे उमटणाऱ्या,

” तुम्ही आहात म्हणून”  या कृतज्ञतापूर्वक उद्गारातूनच ठरेल.  म्हणूनच हे “तुम्ही” तुमचे तुम्हीच निवडा. आणि जीवनाची सफर, सफल  संपूर्ण करा.

धन्यवाद !

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments