☆ मनमंजुषेतून ☆ स्पेस ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆
असचं एकदा काही कारणानं मला मुंबईला जावं लागलं होतं.माझी एक जुनी शाळासखी इथं राहते. काम झाल्यानंतर मुद्दाम वेळ काढून मी तिच्याकडं गेले. अर्थातच फोन करुन तिला इंटिमेट केलं होतंच. मनात मात्र बालमैत्रीणीला भेटण्यासाठी आजकाल हा जो शिष्टाचार पाळावा लागतो याविषयी थोडी नाराजी होतीच.
बेल वाजवून दारात ऊभी राहिले. दार ऊघडताच गळाभेटीसाठी हात पसरणार इतक्यात.. हाय रे.. कामवालीनं दार उघडलं. मला बाहेरच थांबायला सांगून ती आत गेली. थोड्या वेळानं येऊन तिनं मला हॉलमध्ये नेलं. तो ऐसपैस, किंमती वस्तूंनी सजलेला दिवाणखाना मालकिणीच्या सधनतेची जाणीव करुन देत होता. काही मिनिटांनी मॅडम बाहेर आल्या. गळाभेट झाली. दोघीही गहिवरलो. ती मला तिच्या खोलीत घेऊन गेली. तिच्या मिस्टरांची कर्तृत्वगाथा समजली. मुलांची चौकशी करुन झाली. तसं सगळं छान होतं. पण कुठंतरी काहीतरी खटकत होतं. भेटीनंतर शाळेत असताना मिळणारा आनंद, गवसणारं समाधान … छे.. छे.. मान झटकून मी मनाला आवरलं. घरी नसतील कुणी.. त्यामुळं कदाचित भेटले नाहीत आपल्याला.. पण.. गप्पांच्या ओघात समजलं, सगळे घरीच होते. शेड्यूल ठरलं होतं. मला भेटायला त्यांच्या जवळ वेळ नव्हता. मी सकाळी कळवलं होतं ना. त्यांचे प्रोग्राम्स पूर्वीच ठरले होते.
घरी परतल्यावर मी माझ्या मुलाशी बोलत होते.मैत्रिणीच्या घराच वर्णन, पण मनातील खदखद जास्त. तेव्हढ्यात माझ्या नवर्यानं माझा मोबाइल घेतला.” अगं, ते ICICI बॅंकेचं स्टेटमेंट बघायचंय. तुझ्या कडं मेसेज आला असेल.”माझा लेक तिथंच डायनिंग टेबलवर पेपर पसरुन वाचत बसला होता.मी नुकत्याच भाजून ठेवलेल्या शेंगदाण्याच्या बुट्टीत हात घालत तो म्हणाला,” आई, याला स्पेस जपणं म्हणतात. हाय सोसायटीतला हा एक शिष्टाचार आहे. सगळे आपआपापल्या खोल्यात बंद. आत्ता आपण बसलोय ना तसं बसायचं नाही एकत्र. परवागनी घेऊन, दारावर टकटक करुनच एकमेकांच्या खोलीत जायचं. बाबांनी आत्ता तुझा मोबाइल घेतला ना; तुला न विचारता ; तसा नाही घ्यायचा. आजकाल असं वागणं म्हणजे स्पेस देणं.कळलं ?”
माझा वेडा प्रश्न,” म्हणजे, एकत्र बसून जेवायचं नाही का? सासवा- सुनांनी, मायलेकींनी हसत खेळत गप्पा मारत घरकाम, स्वयंपाक करायचा नाही ?”
“अं हं. आणि तसंही आजकाल स्वयंपाकाला वेळ असतोच कुणाला? आणि दहा- बारा तास ऑनलाइन काम. ते जास्त महत्त्वाचं नाही का ?”
तो ऊठून आपल्या कामाला गेला. माझे हात काम करत होते. पण मन भूतकाळात गेलं होतं. रोज रात्री एकत्र गप्पा मारत जेवणं हा एक दंडकच होता म्हणा ना. त्यामुळं कोणाचा दिवस कसा गेला हे कळत असे.दूसर्या दिवशीचं सगळ्यांच वेळापत्रक समजे.बाबांचे ऑफिस ऑफिशिअल नसे. आईच्या शाळेतील विविध कार्यक्रम, स्पर्धा यांचं वेळापत्रक आम्हांला देखील ठाऊक असे. माझ्या भावांच्या मित्रांची मी खास ताई होते. माझे मित्र मैत्रिणी सगळ्यांचे, घरातले झाले होते. आई तर चेष्टेनं म्हणत असे, की माझ्या न पाहिलेल्या कॉलेजातील शिक्षकांनाही ती रस्यावर सुद्धा ओळखेल. मी तेव्हढी बडबड रोज करतच होते घरात.
भाजी निवडणार्या आईला मुलंही हातभार लावत. भुईमुगाच्या शेंगा फोडणार्या आजोबांच्या भोवती नातवंडांचं कोंडाळं असे. पेपर मधील बातम्या,” बरं का गं… ” असं म्हणत बाबा मोठ्यानं वाचून दाखवत. सकाळच्या धावपळीत पेपर हातात न घेताही आईला, आजीला महत्त्वाच्या घडामोडी कळत. स्वयंपाकघरातल्या कोपर्यात दोन पायांवर बसून आजोबा ताक करत तेंव्हा घरातलं एखादं लहान नातवंड नाचणार्या रवी बरोबर खिदळत असे. हलकेच लोण्याचा गोळा त्याच्या जिभेवर ठेवला जाई.
मागच्या पिढीनं स्पेस जपली असती तर सुदृढ भावबंध असलेली नाती कशी तयार झाली असती? तेंव्हाच्या आई बाबांची ऑफिसं कशी बरं बिनधास्त झाली असती? मध्यमवर्गीय संसार कसे बरं बिनघोर झाले असते? पण छे:, न्युक्लियर फॅमिली ची ही कॅप्सूल समाजात आली, लोकप्रिय झाली. पाळणाघरांची गरज निर्माण झाली. एकमेकांना वेळ देणं एकमेकांच्या वस्तू शेअर करणंही जिथं दुरापास्त होऊ लागलयं, तिथं मी खुळी नात्याला भावबंधांचे रेशमी पदर असावेत असल्या अपेक्षा करत बसलेय.
अचानक माझ्या गळ्यात मऊ लडिवाळ हात पडले. माझी सहा वर्षांची नात मला लाडीगोडी लावत होती. “आजी चल ना गं. बागेत झाडांना पाणी घालूया. फुलं काढूया. काल तू प्रॉमिस केलं होतसं शाळेत जाताना गजरा करुन देईन. माझ्या मॅमना द्यायचाय गं मला.” मी तिचा गालगुच्चा घेतला. तिचा हात धरून बागेकडं निघाले. ती माझ्या हाताला झोके देत चालत होती. प्रत्येक झोका मला माझ्या कुटुंबातील सगळ्यांना बांधून ठेवतोय, समाधानाचं हसू माझ्या घरकुलात पसरतयं याची सुखद जाणीव करुन देत होता. मी मनात म्हणत होते,’ बरं गं बाई, मी महानगरातल्या हायफाय सोसायटीत रहात नाही.’
© सौ. दीपा नारायण पुजारी
फोन.नं ९६६५६६९१४८
email :[email protected]
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈