सौ.ज्योत्स्ना तानवडे
☆ स्फूर्ती देवता – भाग – 1 ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆
(सार्वजनिक वाचनालय कल्याण तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त निबंध।
निबंधाचा विषय – माझे प्रेरणास्थान — “स्फूर्ती देवता“)
“माझ्या आयुष्यातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वा”चा विचार करीत असताना “घरात हसरे तारे असता पाहू कशाला नभाकडे” या प्रसिद्ध भावगीताप्रमाणे माझी अवस्था झाली. माझ्या आयुष्यावर प्रभाव टाकणारे व्यक्तिमत्व घरातच असताना का शोधाशोध करायची ? या व्यक्तिमत्त्वाने माझ्या जन्मापासून माझे संपूर्ण आयुष्य व्यापून टाकलेले आहे. “जिच्यामुळे माझे अस्तित्व ते प्रभावी व्यक्तित्व” म्हणजे माझी आई माझी. माझी आई ती. मालतीबाई बाळकृष्ण देव ही सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस मधील सुप्रसिद्ध वकील श्री. आप्पासाहेब देव यांची पत्नी. आई म्हणजे एक अतिशय कणखर, प्रभावी, हुशार, आदर्श व्यक्तिमत्व होतं. गोरी, उंचीपूरी, लांबसडक केसांचा अंबाडा, त्यावर गजरा किंवा वेणी, चापून चोपून नेसलेली नऊवारी साडी आणि मोजके ठसठशीत दागिने घातलेली आई एकदम भारदस्त, रूबाबदार दिसायची.
आईचं माहेर दहिवडी. सातारा जिल्ह्यातील नामवंत वकील श्री. बापूराव कुबेर यांची ती सर्वात धाकटी कन्या मुक्ताबाई. ती खूप लहान असतानाच मातृसुखाला वंचित झाली. पण आजोबांनी अतिशय डोळसपणे तिला वाढवले. ‘हिंगणे स्त्री शिक्षण संस्थे’त आईचे शिक्षण झाले. गाण्याच्या तीन परिक्षा झाल्या. उत्तम हार्मोनियम वाजवायला शिकली. वस्तीगृहातील कामांमुळे अनेक कौशल्यं शिकत स्वावलंबी बनली.
लग्नानंतर आई वाईला आली. तिथून दीड-दोन वर्षात १९४८ साली माळशिरसला बिऱ्हाड केले. आई माहेरी अगदी लाडाकोडात वाढलेली. तिथे खूप सुबत्ता पण होती. तरीही माहेरचं ऐश्वर्य सोडून ती आपल्या संसारात मनापासून रमली. सुरुवातीच्या काळातली दगदग, त्रास, कष्ट तिने आनंदाने सोसले. आनंदी सहजीवनाची ही पायाभरणी होती. हळूहळू संसाराची घडी बसत गेली. गावाजवळच्या शेतात घरही झाले. पण तिथे लाईट यायला मात्र १९७० साल उजाडावे लागले. तोपर्यंत कंदीलाची सोबत होती. सर्व कामे घरातच करावी लागत. आजच्यासारखे तयार काहीच मिळायचे नाही. जात्यावर दळायचे, चुलीवर स्वयंपाक. दिवसा कामाच्या व्यापातून सवड नाही मिळाली तर रात्री जागून फराळाचे करायचे. आई अतिशय सुगरण. सर्व फराळाचे पदार्थ, रोजचा स्वयंपाक अतिशय उत्तम करायची.
खरंतर आई अतिशय कलासक्त होती. अनेक गोष्टींमध्ये ती पारंगत होती. प्रत्येक गोष्ट ती अगदी मनापासून करायची. तिला फुलांची खूप आवड होती. गजरा, वेण्या करून सर्वांना देण्याची भारी हौस. स्वतः अंबाड्यावर वेणी घातल्याशिवाय ती कधी बाहेर जायची नाही. आई आणि फुलाचा गजरा हे समीकरण अजूनही सर्वांना आठवते. घरी रवा पिठी काढून उत्तम शेवया करायची. चिरोटे तर अगदी अलवार व्हायचे. क्रोशाचे विणकाम, मण्याची तोरणं, वायरच्या पिशव्या बनवायची. त्या त्या काळातल्या प्रचलित गोष्टी ती शिकत, करत गेली. पण कोणतीही गोष्ट आखीव रेखीव करण्यात तिचा हातखंडा होता. स्वयंपाक करताना अगदी कोशिंबीर असो, भाजी असो, पोळ्या भाकरी असो नाहीतर पक्वान्न ते अगदी पद्धतशीर निगुतीनेच झाले पाहिजे असा तिचा कटाक्ष असायचा. घाई गडबडीने गोष्टी ‘उरकणे ‘हे तिला मान्यच नव्हते. त्यामुळे स्वयंपाकाची नेहमी पूर्वतयारी सज्ज असायची.
कोणतीही नवीन गोष्ट शिकण्याची भारी हौस. वयाच्या ७०व्या वर्षी क्राॅसस्टिचचे विणकाम तर ७५ व्या वर्षी पोतीच्या मण्यांचे दागिने करायला शिकली. अनेक स्पर्धांमध्ये बक्षीस मिळवली. शेवटपर्यंत तिच्या मनातलं हे उस्फुर्तपण जागं होतं.
शिस्त हा तिच्या जगण्याचा अविभाज्य भाग होता. कसलाही कंटाळा न करता वेळच्यावेळी कामे करी. कोणतीही लहान मोठी गोष्ट गरजेला ऐनवेळी हातात हजर असे. आई कधीच दुर्मुखलेली किंवा अव्यवस्थित नसायची. नेहमी नीटनेटके आवरून उत्साही, आनंदी असायची. सर्व कामे चटाचट उरकून पोथी वाचे, आवडीचे काम करत असे. वर्तमान पत्र वाचून राजकीय, सामाजिक गोष्टींबाबत सजग असायची.
आपल्या बोलक्या स्वभावामुळे तिने खूप माणसे जोडली होती. स्मरणशक्ती चांगली त्यामुळे नावे, इतर संदर्भ लक्षात राही. त्यामुळेच ती वैयक्तिक संवाद छान साधू शके. त्यातूनच जिव्हाळ्याचे संबंध जोडले गेले होते. कुणाच्याही आनंदात ती चटकन सामील व्हायची आणि दुःखात मदतीला जायची. त्यामुळे लोकंही तिला खूप मानत असत. माणसं जोडण्याची आईची ही कला शिकण्यासारखी आहे.
संसारात तिलाही अडचणी, संकटं आली.पण ती कधी खचली नाही. कायम वडिलांच्या साथीला खंबीरपणे उभी राहिली. वडील सोलापूर जिल्ह्यातले निष्णात वकील होते. पण सुरुवातीचे दिवस खूप दगदगीचे होते. वकिली व्यवसाय वाढवण्यासाठी आईने खूप मदत केली. एसटीची सोय नसल्याने खेडेगावातून आलेले पक्षकार रात्री मुक्कामाला रहात. त्यांना स्वतः बनवून जेवण देई. दिवसाही कुणी ना कुणी पंगतीला असेच. यातूनच अनेकांशी कायमचे ऋणानुबंध जुळले.
आई वडील श्रद्धाळू, भाविक होते. खूप गोष्टींवरची त्यांची श्रद्धा डोळस होती. गावातल्या मारुतीरायाला अनेकदा तिने दिवे लावण्याचा नेम केला होता. याचे नक्की फळ तिला काय मिळाले हे सांगता येणार नाही. पण तिला मानसिक बळ नक्की मिळायचे. त्यासाठी गावात चालत जाणे, वेळ पाळणे आवश्यक होते. चालण्याने व्यायाम व्हायचा. यामागे काहीतरी नेम केला की हातून देवाची सेवा नियमितपणे होते हे विचार सूत्र होते. यातून मन प्रसन्न राहायचे हे मात्र खरे.
आई वडीलांची पांडुरंगावर खूप श्रद्धा होती. दोघांनाही वारीची आवड होती. आईने ३०-३२ वर्षे तर वडिलांनी १७ – १८ वर्षे वारी केली. वारीला जाऊन आल्यावर आपला दृष्टिकोन बदलतो. गरजा कमी होतात हे आई वडिलांच्या वागण्यातून जाणवायचे. आईने सुरवातीला ओढगस्त सोसली तशीच अगदी भरभराट पण उपभोगली. पण कसला हव्यास नव्हता. आहे त्यात आनंद मानायची समाधानी वृत्ती होती.
मला गाण्याची आवड लागली ती आई वडीलांमुळेच. दोघांचेही आवाज छान होते. आईच्या तर परीक्षा झालेल्या होत्या. घरी पेटी, तबला, मृदुंग होता. दर गुरुवारी भजन होत असे. दारापुढच्या ओट्यावर रात्री जेवणानंतर आमच्या सगळ्यांच्या गाण्यांनी रंगलेल्या खूप चांदरात्री आठवतात.
यातूनच माझी शब्दांशी, सुरांशी मैत्री झाली. वडीलांना मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत सर्व भाषा उत्तम अवगत होत्या. प्रचंड पाठांतर होते. त्यांचे वक्तृत्व ओघवते आणि लिखाणात शारदेचा वरदहस्त लाभलेला होता. हीच शब्दांची ओढ, लिखाणाचे थोडे कसब मला त्यांच्याकडून लाभले हे माझे मोठे भाग्य आहे. वडिलांनी व्यवहारज्ञान दिले, अभ्यासातली कौशल्य शिकवली. तर आईने संसार सुखाचा होण्याची गुपितं शिकवली.
क्रमशः भाग पहिला
© सौ.ज्योत्स्ना तानवडे
वारजे, पुणे.५८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈