सौ.ज्योत्स्ना तानवडे
☆ स्फूर्ती देवता – भाग – 2 ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆
(सार्वजनिक वाचनालय कल्याण तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त निबंध।
निबंधाचा विषय – माझे प्रेरणास्थान — “स्फूर्ती देवता“)
(वडिलांनी व्यवहारज्ञान दिले, अभ्यासातली कौशल्य शिकवली. तर आईने संसार सुखाचा होण्याची गुपितं शिकवली.) इथून पुढे —
त्यांनी आम्हा भावंडांना अतिशय डोळसपणे खूप चांगले घडवले. वडील कधी पुण्या मुंबईला गेले की तिथून उपयोगी अशा नव्या वस्तू, पुस्तके, गावात जे मिळायचे नाही ते आवर्जून आणायचे. आपण खेड्यात राहतो म्हणून मुले नवीन गोष्टींपासून वंचित राहू नयेत हा दृष्टिकोनच खूप मोठा होता.
आईवडील अतिशय धोरणी होते. आम्ही कॉलेजला जायच्या वेळेस त्यांनी पुण्यात घर घेतले होते .आम्ही चार भावंडे तिथेच राहू शिकलो. आम्ही दोघी बहिणी घरी स्वयंपाक करायचो. त्यासाठी आई माळशिरसहून सतत मसाले, चटण्या, पीठे, फराळाचे पाठवायची. या प्रात्यक्षिकामुळे लग्नापूर्वीच आम्ही बहिणी तयार झालो होतो.
आई-वडिलांचे सहजीवन अतिशय आदर्श होते. दोघांनीही एकमेकांना मान देत कायम योग्य आदर केला. त्यांच्यातही मतभेद असतीलच पण ते कधी उघडपणे सर्वांसमोर आले नाहीत. अगदी आमच्या सुद्धा. कधीच टोकाची भूमिका नसायची. जे करायचं ते एकमेकांच्या साथीनंच. तो काळ एकमेकाबद्दलच्या भावनाज बोलून दाखवण्याचा नव्हताच. पण न बोलताच दोघेही एकमेकांच्या आवडीनिवडी जपत, कौतुक करीत. आईला जेवायला थोडा जास्त वेळ लागायचा तर स्वतःचं जेवण झाल्यावरही वडील तिच्यासोबत गप्पा मारत बसायचे. ती भाजी निवडत असेल तर ते पण निवडू लागत. ह्या गोष्टी जरी लहान असल्या तरी त्यांचं प्रेम यातून दिसून येतं. त्यामुळंच त्यांचं नातं घट्ट होत गेलं. त्या काळात घरातल्या बायकांना नुसतं गृहित धरलं जायचं. त्यांचं मत कुणी विचारायचं नाही तर निर्णय सांगितले जायचे. पण वडील प्रत्येक गोष्ट आईला सांगत असत आणि ती पण त्यांना योग्य साथ देई. ते कुठे गेले तरी तिला बरोबर नेत आणि ती पण त्यांच्या प्रतिष्ठेला शोभेल अशी टापटिपीत असायची. दोघेही आनंदाचे, सुखाचे सहजीवन जगले. सुखी संसारासाठी हा आमच्यासाठी वस्तूपाठच आहे.
जिथे जाऊ तिथे आनंद द्यायचा हे धोरण असल्याने आई कधी कुणाकडे मोकळ्या हाताने गेली नाहीच पण तिथे गेल्यावर कामाला हातभार लावायची. हेही अंगीकारण्या सारखेच आहे. आईवडील दोघेही गावातील सार्वजनिक जीवनात एकत्र हिरीरीने भाग घेत असत. गावातल्या असंख्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन त्यांनी केले. त्यामुळे दोघेही लोकांमध्ये तितकेच लाडके, हवेहवेसे होते. यानिमित्ताने अनेक नामवंत साहित्यिक, वक्ते, नेते आमच्या घरी आलेले होते.
दुर्दैवाने वडील अचानकपणे ६६ व्या वर्षी गेले त्यांच्या माघारी २३ वर्षे आईने दोघांचीही भूमिका उत्तम निभावली. सगळी कर्तव्यं पार पाडली. आई एवढी कर्तबगार हिंडती फिरती, आनंदी पण शेवटी तिचे हाल झाले. पडल्यामुळे ऑपरेशन झाले. त्यावेळी एक गुडघा आखडल्याने पुढे ती चालू शकली नाही. बरीच वर्षे एका जागेवरच आली. हे परावलंबित्व स्वीकारणे सुरवातीला खूप जड गेले.पण शेवटी या वास्तवाशी तिने जुळवून घेतलं. कोणते भोग वाट्याला यावेत हे आपल्या हातात नसतं हेच खरं.
आपले आईवडील तर प्रत्येकालाच प्रिय असतात. शिवाय त्याकाळी बऱ्याच अशा कर्तबगार बायका होत्या. मग आईत विशेष काय ? तर तिच्यात अनेक चांगले गुण एकवटलेले होते. तिने ते जाणीवपूर्वक जोपासले होते. ती आदर्श गृहिणी, चांगली कलाकार, हाडाची शिक्षिका, सामाजिक कार्यकर्ती होती. त्यामुळे तिची शिकवणच होती जे काम करायचे ते चांगलंच, सुबक, आखीवरेखीव, परिपूर्ण करायचं.
आजकाल व्यक्तिमत्त्व विकासाचे अनेक मार्ग, अनेक साधने उपलब्ध आहेत .पण आई-वडिलांच्या काळाचा विचार करता ही गोष्ट सोपी नव्हती. त्यामुळेच त्यांनी जीवनात अनेक गोष्टींमध्ये एक विशिष्ट आदर्श पातळी गाठली होती ही कौतुकाची गोष्ट आहे. एकेका क्षेत्रात उत्तुंग यश मिळवणारे असंख्य असतात. पण सर्वच क्षेत्रात अशी आदर्श पातळी गाठणारे फार कमी असतात. अशाच लोकांपैकी माझे आई वडील होते हे विशेष आहे.
हिऱ्याला जितके जास्त पैलू तितके त्याचे मोल जास्ती. त्याप्रमाणे व्यक्तिमत्त्वाला शक्य तितके विकसित करावे. त्यासाठी अनेक कला आत्मसात करणे, अनेक गोष्टींचे ज्ञान मिळवणे, सतत नवनवीन गोष्टींचा ध्यास घेऊन त्यांचा अभ्यास करणे, जीवनाच्या सर्व अंगांचा आस्वाद घेणे अशी त्यांची शिकवण होती. त्यांनी स्वतः ती अंमलात आणलीच पण आम्हालाही ते बाळकडू दिले. आज कोणतीही नवीन गोष्ट करताना त्यांच्या विचारांनी नवीन उभारी मिळते. त्यांची शिकवण आचरणात आणण्याचा मी नेहमीच प्रयत्न करते आणि काही अंशी त्यात यशस्वी झाले आहे ही समाधानाची बाब आहे.
आईवडीलां पैकी फक्त एकाचेच स्वतंत्र कर्तृत्व सांगता येणार नाही. त्यात दुसरा सहभागी असायचाच इतके त्यांचे जीवन एकमेकांत मिसळून गेलेले होते. याचा नुकताच आम्ही अनुभव घेतला. २०२२ साली वडिलांची जन्मशताब्दी होती. त्या निमित्ताने आम्ही त्यांच्या स्मृतींचे पुस्तक काढले. तर नातेवाईक, स्नेही यांच्या लेखांचा वर्षाव झाला. वडिलांना जाऊन ३४ वर्षे तर आईला जाऊन ११ वर्षे झालीत. पण अजूनही लोक त्यांना विसरलेले नाहीत. त्यांच्या आठवणींचे, सहवासाचे वर्णन वाचून मन भरून आले. सर्वांनीच दोघांबद्दल अगदी भरभरून लिहिले आहे. संत कबीरजींचा एक दोहा आहे,
कबीरा जब हम पैदा हुए
जग हॅंसे हम रोये
ऐसी करनी कर चलो
हम हॅंसे जग रोये |
या उक्तीप्रमाणे आईवडील जगले आणि आमच्यासाठी मोठा आदर्श घालून दिला आहे.
आज समाजात कुटुंब व्यवस्थेला हादरे बसत आहेत. अशावेळी आई-वडिलांच्या शिकवणीची गरज अधोरेखित होते. म्हणूनच हे स्मरण.
प्रत्येक व्यक्तीमधे अधिक-उणे असतेच. पण ज्यांच्या व्यक्तिमत्वात अधिकांची बेरीज जास्ती तेच आदर्श होतात. म्हणूनच माझी आई माझ्या आयुष्यावर प्रभाव टाकणारी प्रेरणादायी व्यक्ती आहे.
माहेरच्या पायरीला
टेकविला माथा
जिने जीवनविद्येची
शिकविली गाथा ||
— समाप्त —
© सौ.ज्योत्स्ना तानवडे
वारजे, पुणे.५८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈