डॉ अभिजीत सोनवणे
© doctorforbeggars
☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ तुझी माझी जोडी…!!! ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆
माझ्या या कामामध्ये खूप वेळा हृदय पिळवटणाऱ्या घटना घडतात, भावनांचा कस लागेल, अशा गोष्टी हाताळाव्या लागतात… अश्रू बर्फ होतील की काय असं वाटायला लागतं…. !
गाण्यातले सूर हरवले की ते गाणं बेसूर होतं….
परंतु जीवनातलं मन हरवलं की अख्ख आयुष्य भेसूर होतं…
असे भेसूर प्रसंग डोळ्यांनी पहावे लागतात… अनुभवावे लागतात…. मन सुन्न होतं… असंही काही असतं यावर विश्वास बसत नाही.,. या परिस्थितीत नेमकं काय करावं बऱ्याच वेळा कळत नाही…!
असे अनेक करुण प्रसंग पुस्तक रूपानं शब्दबद्ध करून ठेवले आहेत….! माझ्या पुस्तकातल्या पानात हे प्रसंग बंदिस्त झाले आहेत… पिंपळाच पान ठेवावं तसे … ! या पानाच्या आता जाळ्या झाल्या आहेत… पण हरकत नाही ! … ही सुंदर नक्षीदार जाळी, मला माझ्या म्हाताऱ्या झालेल्या याचकांच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांची दरवेळी आठवण करून देते… !
…. आणि मीच रचलेल्या या जाळ्यात दरवेळी अडकायला मलाच खूप आवडतं….!
मात्र संपूर्ण दिवसात एक तरी प्रसंग असा घडतो जिथं पोट धरून हसावं…. एक तरी सुखद प्रसंग असा घडतो की तो अनुभवताना वाटतं, धन्य झालो… या प्रसंगाचा साक्षीदार होण्यासाठी निसर्गाने मला जिवंत ठेवलं… ! … संपूर्ण आयुष्य जगून झालं, तरीही सुख आणि समाधान म्हणजे काय हे अनेकांना कळत नाही, अशावेळी रस्त्यात बसलेला माझा एखादा याचक, चार ओळींमध्ये जगण्याचं सार सांगून जातो….!
हे प्रसंग आणि आशावादी चित्र, मला सुद्धा जगायचं बळ देतं…. उद्या उठून परत तिथेच जाण्यासाठी प्रवृत्त करतं…. हे आशावादी चित्र म्हणजे माझ्या कामाचं टॉनिक आहे..!
हे सर्व प्रसंग नंतर आठवून शब्दबद्ध करता येतात, परंतु दरवेळी कॅमेऱ्यात ते टिपता येत नाहीत…
पण, असं एक क्षणचित्र चुकून का होईना, पण कॅमेऱ्यात काल शनिवारी २५ मार्च रोजी बंदिस्त करता आलं.
वरवर गमतीचा वाटावा, असा हा प्रसंग. परंतू खूप काही शिकवून गेला. भेगाळलेल्या मातीवर पावसाचा टिपूस पडावा, तेव्हा त्या मातीला काय वाटत असेल ….? नेमकं तेच मला या प्रसंगातून वाटलं…!
तोच हा प्रसंग…
… एक आजी, वय वर्षे साधारण ७५….तिला माझ्याकडून काही वैद्यकीय साधने हवी होती, पण त्यावेळी ती साधने माझ्याकडे नव्हती. आजी माझ्या प्रेमाचीच, परंतू त्यावेळी मात्र ती चिडली, मला उलट सुलट बोलायला लागली. आमच्यात मग रस्त्यावरच्या रणांगणावर, “शाब्दिक घनघोर युद्ध” झाले…!
… जुनं खोड हे … म्हातारी काय बोलायला ऐकते का मला ? प्रश्नावर प्रतिप्रश्न …. उत्तरावर प्रतिउत्तर… !
…. पट्टीच्या पैलवानाला दहा मिनिटात रिंगणात आसमान दाखवावं, तसं म्हातारीने दहा मिनिटात, मेरे जैसे छोटे बच्चे की बोलून बोलून जान ले ली राव …!
एक दिन मैं पानी में “शिरा” फिर “पोहा”…. अशा टाईपचे माझं हिंदी….
“गाडी के नीचे कुत्रा बसलाय…” हे सुद्धा अस्मादिकांचेच वाक्य आहे …. !
वरील दोन्ही हिंदी वाक्यांचा मूर्ख (सॉरी, “मुख्य” म्हणायचं होतं….) निर्माता मीच आहे… !
तरीही मी खूप आनंदी आहे, कारण नवनिर्मिती महत्त्वाची !
असो….
तर यानंतर, मी पराभूत होऊन, तिला शरण गेलो, मान खाली घातली…! तरीही म्हातारीचा जिंकण्याचा आवेश अजून उतरला नव्हता….तिने उठून उभे राहत, अक्षरशः कसलेल्या पैलवानागत शड्डू ठोकत, मला कुस्ती खेळण्यासाठी आव्हान दिले…! .. आभाळाकडे दोन्ही हात नेऊन आभाळाला गुदगुल्या कराव्या तशी बोटांची ती हालचाल करत होती… मध्येच एका पायावर उभे राहण्याची कसरत करत, शड्डू ठोकत, मला चिडवत, डिवचायची…’.ये की रं… घाबरलास का ? खेळ माझ्यासंगं कुस्ती…ये…!’
…. इकडे माझ्यावर इतका “भीषण प्रसंग” उद्भवला होता आणि आजूबाजूची मंडळी पोट धरधरून हसत होती… तेवढ्यात एक जण माझ्या कानाशी येऊन, जोरात हसत म्हणाला, ‘ खेळा डॉक्टर म्हातारीशी कुस्ती….!’
…. चिडलेल्या म्हातारीने नेमके हे ऐकले आणि ती आणखी चवताळली… या मूर्खाला जोरातच बोलायचे होते, तर कानाशी का बरं हा आला असेल ? मूर्ख लेकाचा….पण आता हे बोलून त्याने काळ ओढवून घेतला होता…! ‘ ये मुडद्या तू बी ये, कुस्ती खेळायला….’, म्हातारीने कुस्ती खेळण्याचे आवाहन शड्डू ठोकत त्याला सुद्धा दिले. म्हातारीचा आवेश काही केल्या उतरेना…!
…. मेलेल्या उंदराला शेपटीला धरून बाहेर फेकावं, तसं म्हातारी आता माझ्या ॲप्रनला चिमटीत धरून, मला हवेत गरागरा फिरवून, चितपट करणार… हे स्पष्ट होते. … “सर सलामत तो पगडी पचास” असा शहाणा विचार करून मी तिच्यापुढे पुन्हा शरणागती पत्करली. “बचेंगे तो और लढेंगे” असा प्रेरणादायी विचार मनात घोळवत… ‘ म्हातारे, मी हरलो ‘ असं जाहीरपणे कबूल केलं. कोंबडीनं मान टाकावी, तशी मान टाकून पराभूत योद्धाप्रमाणे मी तिथून निघालो.
लटपटत का होईना… परंतु शूर योद्धाप्रमाणे म्हातारी पुन्हा माझ्यासमोर आली . चेहऱ्यावरच्या प्रत्येक सुरकुतीमधून विजयाचा आनंद ओसंडून वाहत होता…! …. “आयुष्यभर परिस्थितीशी कुस्ती करून, कायम पराभूत झालेली ही म्हातारी, आमच्या या कुस्तीत मात्र जिंकली होती”
पण, योग्य वेळी हार मानून आपल्या माणसांना जिंकताना पाहणं यातही वेगळाच आनंद असतो….!
तर… उंदराला मारलं, तरी मांजर काही वेळ त्याच्याशी खेळत राहतं, त्याप्रमाणे म्हातारी मला पुन्हा डिवचत म्हणाली, ‘का रं… हरलास ना ?’ म्हातारीला तिचा विजय माझ्या तोंडून पुन्हा वदवून घ्यायचा होता….!
इंजेक्शन टोचल्यागत, कळवळून मी तिला, ‘ म्हातारे, तुच जीतलीस ‘ म्हणालो..!
माझा पराभूत चेहरा आणि पडलेले खांदे पाहून म्हातारीला आता माझी दया आली असावी….
मला म्हणाली, ‘ चिडलास व्हय लेकरा…? आरं म्या गंमत केली तुजी… जितायची जितं खात्री आस्ती, मानुस तितंच कुस्ती खेळाया जातू…. तू मलाच जितवणार हे मला म्हाईत हुतं ल्येकरा….!’ … आजीच्या डोळ्यात आता पाणी होतं…! ‘ आरं कसली आलीया हार आणि कसली आलीया जीत ल्येकरा ??? बुद्धिबळाचा डाव संपल्यावर राजा,वजीर, हत्ती, घोडे आणि प्यादी एकाच डब्यात गप गुमान बसून असत्यात बग…! ‘
… वरवर अडाणी वाटणाऱ्या आजीने, या गमतीशीर प्रसंगातून, अख्ख्या आयुष्याचं सार सांगितलं….!!!
आजीच हे वाक्य ऐकून खरं तर मी अंतर्बाह्य हलून गेलो होतो….खरंच किती सत्य होतं हे ?
तरीही, आजीची आणखी थोडी गंमत करावी, म्हणून मग मी अजून थोडा “रुसून” बसलो… तिच्यापासून बाजूला सरकून बसलो….
….. “आंतर चालण्यात असावं बाबा…. बोलण्यात आणि नात्यात ठेवू न्हायी” असं समजुतीने म्हणत, माझ्या जवळ येत, छोट्या नातवाचा रुसवा काढावा, तशी ती माझ्याजवळ आली… म्हणाली, ‘ बाळा, ज्याला कुटं, कंदी, काय हरायचं त्ये कळतं…त्योच खरा जिततो…’
यानंतर, माझे दोन्ही हात हातात घेऊन, झोपाळ्यागत हलवत ठेक्यात ती गाणं गाऊ लागली….
तुजी माजी जोडी…
झालास का रं येडी…
चल जाऊ शिनीमाला…
आणू का रं गाडी…?
…. आता इतक्या मायेने आजी जर नातवाला विनवत असेल…. तर कुठल्या नातवाचा राग पळून जाणार नाही ? तिचे सुरकुतलेले ते हात अजूनही माझ्या हाती होते… हातावरची आणि चेहऱ्यावरची प्रत्येक सुरकुती ही आयुष्यानं शिकवलेल्या अनुभवांची होती… पचवलेल्या पराभवाची होती…!
रस्त्यावर एकटी आयुष्य कंठत असताना, समोर येणाऱ्या वाईट परिस्थितीला सुद्धा, या वयात, दरवेळी शड्डू ठोकत, ‘ये खेळ माझ्यासंगं कुस्ती’ असं म्हणत आव्हान देत होती….!
…. छोट्या छोट्या गोष्टींनी पिचून जात, रडत राहणारे आपण… चटकन हार मानणारे आपण….!
माझ्यासाठी ती मात्र एक “अजिंक्य मल्ल” होती…! तिच्या कानाशी जाऊन मी म्हणालो, ‘आजी मी तुला जितवलं नाही… तू खरोखर जिंकली आहेस …!
…. यावेळी मी तिच्या डोळ्याकडे पाहिले आणि सहज आभाळाकडे लक्ष गेलं….. दोन्ही पाण्याने भरले होते…! मी ते माझ्या ओंजळीत घेतलं …
…… तीर्थ ….तीर्थ …म्हणत असावेत, ते हेच असेल काय ???
© डॉ अभिजित सोनवणे
डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे
मो : 9822267357 ईमेल : [email protected],
वेबसाइट : www.sohamtrust.com
Facebook : SOHAM TRUST
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈