सौ. अमृता देशपांडे
☆ मनमंजुषेतून ☆ ।। राजा पंढरीचा ।। भाग 1 ☆ सौ. अमृता देशपांडे ☆
संत वाङमय, आणि संत साहित्य, भागवत धर्म, वारकरी संप्रदाय, संत चरित्रे या सर्वांचा अभ्यास करण्याचा योग मला माझ्या महाविद्यालयीन काळात आला. त्या अनुषंगाने ज्ञानेश्वरी, अमृतानुभव,तुकाराम गाथा, शेकडो अभंग, ओव्या, भारूडे, लोकगीते यांची ओळखंच नाही तर पक्की दोस्ती झाली .
दरवर्षी आषाढी एकादशी, कार्तिकी एकादशीला लाखो वारकरी विठ्ठल रखुमाई च्या दर्शनाला जातात.
कपाळी बुक्का,गळा तुळशीची माळ, खांद्यावर भगवी पताका, हाती मृदंग टाळ आणि ‘ विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल ‘ च्या तालावर पडणारी पावले. विठ्ठलाच्या प्रेमात सारं वातावरण भारून गेलेलं असतं. सगळ्यांची वाट एक, नेम एक, ध्यास एक – विठ्ठलाला भेटणे. संत साहित्य वाचताना एक गोष्ट सातत्याने आणि प्रकर्षाने जाणवत होती, ती म्हणजे, ” जगत्जेठी विठ्ठल दोन्ही हात कमरेवर ठेऊन विटेवर उभा आहे, त्याचं दर्शन झाले की आयुष्यातल्या सगळ्या व्यथा, दुःख, कष्ट, त्रास नाहिसे होतात आणि मनात रहातं फक्त त्याचं साजिरं गोजिरं रूप. एकदा त्याच्या पायावर डोकं ठेवलं की पुढं वर्षभर कसलीच काळजी नाही.आपली सगळी दुःख, संकटं तोच निवारण करतो हा प्रचंड विश्वास. पंढरपूर ला जाताना दर्शनासाठी आसुसलेली मने येताना शांत होतात. असं काय असेल त्या विठ्ठलाकडे?
लहानपणी विठोबा रखुमाई च्या अनेक छोट्या मोठ्या गोष्टी वाचल्या, ऐकल्या. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर, निवृत्ती, सोपान, मुक्ताई, तुकाराम, एकनाथ, नामदेव, पुंडलिक, गोरा कुंभार, चोखामेळा, जनाबाई, कान्होपात्रा, सावता माळी अशा अनेक संतांची विट्ठलाचे गुणवर्णन करणारी, ईश्वरानुभूतिचे अनुभव सांगणारी चरित्रे वाचली आहेत. अभंग, ओव्या ऐकल्या आहेत. एक एक अभंग म्हणजे विठुरायाच्या गळ्यातील तुळशीचे एक एक दळच जणु. इतके पवित्र आणि आर्त.
पंढरपुरात विठोबा जरी विटेवर युगे अठ्ठावीस उभा असला तरी भक्तांची श्रद्धा इतकी दृढ की आपले नित्याचे काम करताना मुखावाटे विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल हा जप केला तर कष्ट जाणवल्याविना त्यांचे काम पार पडत असे.
( परीक्षेत पेपर्स लिहायला विठू मदत करेल का? असा प्रश्न मनात आला होता)
विठ्ठल, पांडुरंगा, म्हटलं की दिवसभराचे सर्व क्लेश, कष्ट शरीरातून निघून जाई, आणि रात्री पाठ टेकल्या टेकल्या भक्तांना गाढ झोप लागत असे. तुकोबारायांची अभंगगाथा समाजकंटकानी इंद्रायणीत बुडवली, नंतर ती जशीच्या तशी पाण्यातून वर आली.गोरा कुंभाराचा चिलया बाळ परत जिवंत झाला.अशा अनेक अलौकिक कथा आहेत.
© सौ अमृता देशपांडे
पर्वरी- गोवा
9822176170
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈