डॉ अभिजीत सोनवणे
© doctorforbeggars
☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ भिक्षेकरी ते कष्टकरी ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆
जेवणात जर मीठ बरोबर असलं तर मिठाची आठवण कोणालाच येत नाही. परंतू हेच मीठ मात्र कमी पडलं की च्च…च्च…म्हणत सगळ्यांची मीठ शोधायची धांदल सुरू होते….!
आपलं आयुष्यही या मिठासारखंच असावं…!
…. आपल्या असण्याची जाणीव कोणाला असो किंवा नसो, परंतु आपल्या नसण्याची उणीव कोणाला तरी भासणे हे खरं सुख !…… मात्र, ज्यांच्या असण्या आणि नसण्याचं सोयर सुतक कोणालाच नाही….असे अनेक जण मला या महिन्यात भेटले…!
त्यापैकीच या चौघी….
१. एक अंध ताई, डोळ्यातील ज्योत पूर्णपणे विझली आहे, परंतु मनातला अंगार मात्र विझलेला नाही….
—शिवाजीनगर परिसरात भीक मागायची. जिथे ती भीक मागायची, तिथेच तिला खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय सुरू करून दिला आहे.
२. दुसरी एक दिव्यांग ताई… तिचे पती सुद्धा दिव्यांग आहेत. एकमेकांच्या साथीने आयुष्याचं ओझं डोक्यावर पेलण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतू दरवेळी ते शक्य होत नाही, म्हणून ही ताई भीक मागायची…..
— हिला एक wheel chair दिली आहे. Artificial Jewellery त्याचप्रमाणे स्त्रियांची इतर प्रसाधन साधने तिला विक्रीसाठी घेऊन दिली आहेत. नानावाडा परिसर, तसेच शनिवार वाडा परिसर येथे ती आता हा व्यवसाय करू लागली आहे.
३. भवानी मातेसमोर जोगवा मागणारी ही तिसरी मावशी… कोणाच्याही आधाराशिवाय जगते आहे. तिला आपण भाजी, तसेच फळं विक्रीचा व्यवसाय सुरू करून दिला आहे–= त्यासाठी तराजू, वजन काटे, इत्यादी सर्व साहित्य घेवून दिले आहे. कॅम्प, भवानी पेठ, तसेच पुण्यातील राजेवाडी परिसर येथे तिने फिरून विक्री करण्यास सुरुवात केली आहे.
४. एक तरुण महिला शनिपार मंदिर, बाजीराव रस्ता येथे भीक मागत होती, त्याच परिसरात तिला खेळणी विक्रीचा व्यवसाय सुरू करून दिला आहे.
…… या महिन्यात “महिला दिन” होता हा फक्त योगायोग !
“दीन” असणाऱ्या महिलांना, तुम्ही सुद्धा “माणसं” आहात याची जाणीव करून देत, आम्ही रोजच महिला दिन साजरा करत आहोत.
कोणताही समारंभ नाही… “हार – तुरे” नाहीत…!
…. आयुष्यात जगताना, कायम ज्यांची “हार” झाली, अशा दुर्दैवी आयुष्य जगणाऱ्यांना… पुन्हा गळ्यात “हार” घालण्याचं प्रयोजन काय…?
…. खाली झुकलेली मान, जेव्हा सन्मानाने ताठ होते, त्यावेळी आमच्यासाठी तोच सण असतो… समारंभ असतो… महिला दिन तोच असतो….! आठ मार्चला आम्ही महिला दिन साजरा करत नाही…. तर तो रोज रोज जगतो…!!!
५. याच महिन्यात रंगपंचमी येवून गेली…! आयुष्य रंगपंचमी सारखंच आहे…. कितीकदा चेहऱ्यावर रंग चढतो आणि कितिकदा परिस्थिती तो उतरवून टाकते…
…… असेच रंग उडालेले… पाय मोडून रस्त्यात खितपत पडलेले ते दोघे….!
यांच्यावर आधी उपचार केले, दोघांनाही व्हीलचेअर दिल्या. त्यातील एकाच्या अंगी दाढी कटिंग करण्याचे कसब होते, त्याला लागणारे सर्व साहित्य घेऊन दिले. दुर्गंधीत असणाऱ्या आमच्या भिक्षेकर्यांचीही दाढी कटिंग करायला कोणी पुढे येत नाही…. मग यालाच आम्ही आमच्या भिक्षेकर्यांची दाढी कटिंग करायला लावून पगार द्यायला सुरुवात केली… !
…. इकडे “याला” रोजगार मिळाला तिकडे “ते” स्वच्छ झाले…
It’s our Win – Win situation….!!!
६. दुसऱ्या एका व्यक्तीचा पूर्वी पायपुसणी विकायचा व्यवसाय होता… एक्सीडेंट होऊन, रस्त्यावर आल्यानंतर तो स्वतःच “पायपुसणं” होऊन बसला…
…. आता, पायपुसणी विकायचा व्यवसाय याला पूर्ववत टाकून दिला आहे…. ! पर्वती पायथा परिसरात तो फिरून हा व्यवसाय करत आहे….
…. या रंगपंचमीत आम्ही त्या अर्थाने जरी रंग खेळलो नाही… तरी, ज्यांच्या चेहऱ्यावरचे रंग उडालेले आहेत, अशांच्या चेहऱ्यावर स्वाभिमानाचा एक तेजस्वी रंग मात्र नक्की लावला आहे…. !
“भिकारी” या शब्दांची लक्तरं आम्ही होळीच्या आगीत अर्पण केली आहेत…. !
७. एक अपंग आजी... जंगली महाराज मंदिराच्या प्रवेशद्वारावरच भीक मागते…!
….. या महिन्यात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर… तिला एक व्हीलचेअर आणून दिली…. त्यावर तिला व्यवस्थित बसवलं, आणि तिच्या पायाशी वजन काटा ठेवला… तिला सांगितलं, ‘ लोक येतील, यावर आपलं वजन करतील आणि तुला पैसे देतील ‘…… अर्थातच बोहनी (भवानी) करण्याचा मान मला मिळाला…. !
८. पूर्वी पती असतांना सुस्थितीत असणारी एक मावशी…. पती अचानक गेल्यानंतर, सर्व काही बिघडले…. शनिपार येथे मग गळ्यात माळा घालून भीक मागायला सुरुवात केली… तिला स्वतःला भीक मागायची लाज वाटत असे… परंतु उपाशी पोटाला कुठं लाज असते ? अनेकांनी तिला अनेक सल्ले दिले…. परंतू भरल्या पोटानं दिलेला सल्ला, उपाशी पोटाला कधीही पचत नाही…! गुढीपाडवा हा सण साजरा करण्यासाठी, पूजा करण्यासाठी ज्या ज्या वस्तू लागतात या सर्व वस्तू, सणाअगोदरच या मावशीला घेऊन दिल्या आहेत… जेणेकरून ती या वस्तूंच्या विक्रीचा व्यवसाय करू शकेल…. !
या विक्रीतून जमा झालेल्या भांडवलातून आम्ही आता दुसरा कायमस्वरूपी व्यवसाय सुरू करणार आहोत.
९. नवऱ्याने सोडून दिलेली बाळासह रस्त्यावर राहणारी एक ताई…. !
…. आमचा अन्नपूर्णा प्रकल्प चालवणारे, श्री अमोल शेरेकर यांचा मला एके दिवशी फोन आला, ‘ सर, या ताईचं काय करू ? ‘
.. मी विचार करून उत्तर देईपर्यंत ते म्हणाले, ‘ मी जिथे राहतो त्याशेजारी एक रूम खाली आहे. आपल्याला फक्त डिपॉझिट आणि या महिन्याचे भाडे आणि किराणा भरून द्यावे लागेल. माझ्या नजरेत एक काम आहे, मी या ताईला तिथे कामाला लावतो…. मार्च नंतर एकदा का हिला पगार मिळायला लागला, की मग आपल्यावर आर्थिक जबाबदारी राहणार नाही.’
…. मी काहीही बोलण्याअगोदर माझा होकार गृहीत धरून श्री अमोल शेरेकर कामाला लागले….
त्या रूमचे डिपॉझिट, मार्च महिन्याचे भाडे आणि किराणामाल भरून दिला आहे…. !
…. ही ताई स्वाभिमानाने एका कंपनीत आता छोटा जॉब करते, आज ३१ मार्चला तिचा पगार होईल…. !
कोणाच्याही आधाराशिवाय ती ताई तिच्या बाळासह स्वयंपूर्ण होईल….!
.. या ताईला मी सांगून ठेवलं आहे, बाळ जेव्हा शाळेत जायच्या वयाचं होईल, तेव्हा मला सांग. संपूर्ण शाळेची जबाबदारी आमची…. !
… कृतज्ञतापूर्वक ती म्हणाली, ‘ उद्या एक तारीख आहे. आज माझा पगार होईल, आता माझा बोजा कोणावर पडणार नाही. मी खूप खूष आहे…’ असं म्हणून ती ओक्साबोक्षी रडायला लागली… !
…. आज प्रथमच कोणीतरी रडत होतं आणि तरी मी मनापासून हसत होतो…. ! अर्थात हे सर्व श्रेय श्री. अमोल शेरेकर यांचं, मी फक्त माध्यम होतो…. श्री अमोल शेरेकर यांचा मला अभिमान आणि कौतुक आहे !
…. या तिघींच्याही मनात “आत्मविश्वासाचा ध्वज” उभारून दिला आहे….
…. “प्रतिष्ठेच्या पताका” दारात नाही… पण मनात लावल्या आहेत…
…. नवीन जोमानं आयुष्य जगण्याची “गुढी” आम्ही उभारून दिली आहे….
…. नुसतं “नवीन वर्ष” नाही तर त्यांना “नवीन आयुष्य” सुरू करून दिलं आहे…
…. त्यांच्या आयुष्यातल्या “कडू आठवणी”…. कडुनिंबाचं पान चावता चावता, कधी गोड होऊन गेलं कळलंच नाही…. !
अशात भर दुपारी आईचा फोन आला, ‘अरे, येतो आहेस ना ? किती उशीर ? आज गुढीपाडवा आहे… घरची पूजा तुझ्या वाचून खोळंबली आहे…! ‘
…. पूजा माझ्या वाचून खोळंबली आहे…??? मला गंमत वाटली….
‘अजून कुठली पूजा राहिली आहे ?’ मी आईला हसत म्हणालो.
‘ म्हणजे ?’ तिने भाबडेपणाने विचारले….
पूजा…पूजा…. म्हणजे काय असतं…. ?
पूजा ज्यावेळी भुकेत शिरते त्यावेळी ती “उपवास” होते….
पूजा ज्यावेळी अन्नात शिरते, त्यावेळी ती “प्रसाद” होते….
पूजा ज्यावेळी पाण्यात शिरते, त्यावेळी ती “तीर्थ” होते…
पूजा प्रवास करते, तेव्हा ती “वारी” होते….
पूजा घरात येते, तेव्हा ते घर “मंदिर” होतं….
पूजा जेव्हा डोक्यात शिरते तेव्हा ती “नामस्मरण” होते…
पूजा जेव्हा हृदयात शिरते तेव्हा ती “अध्यात्म” होते…
आणि पूजा जेव्हा हातात शिरते, तेव्हा ती “सेवा” होते… !!!
— आता अजून कुठली पूजा मांडू… ???
माझ्या या पुजेमध्ये आपण दिलेल्या समिधाच अर्पण केल्या आहेत…. आणि म्हणून भिकेच्या आणि लाचारीच्या दलदलीमधून बाहेर निघालेल्या, “त्या” जीवांनी दिलेल्या आशीर्वादाचा प्रसाद, लेखाजोखाच्या रुपाने आपल्या पायाशी अर्पण करतो…. गोड मानून घ्यावा !
प्रणाम
© डॉ अभिजित सोनवणे
डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे
मो : 9822267357 ईमेल : [email protected],
वेबसाइट : www.sohamtrust.com
Facebook : SOHAM TRUST
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈