मनमंजुषेतून
☆ “रुजणे…” – सुश्री प्रिया कोल्हापुरे ☆ प्रस्तुती – सुश्री माधुरी परांजपे ☆
चार दिवसांपूर्वी झाडांची माती बदलण्यासाठी वेळ काढला. सगळी झाडं झाली, एक वेल राहिला- गोकर्णचा. त्याला फुलं कमी यायला लागलेली, पण वेल काढायचा म्हणजे रिस्कच. त्यात एकाच कुंडीत पाच बिया लावून त्या एकाच दोऱ्याने वर गेलेल्या. एकात एक गुंतलेल्या पाच वेलींना बाहेर काढून परत मातीत रुजवायचं म्हणजे दिव्यच वाटलं. फुलं नाही दिली तरी जिव्हाळा जमला होता त्यांच्यासोबत. काढून परत लावल्याने त्या वेली जगतील की नाही समजत नव्हतं. रिस्क घेतली आणि बदलली माती.
संध्याकाळपर्यंत वेल सुकल्यासारखी झाली. जीव झुरझुरला. सकाळी उठल्या उठल्या वेलीकडे गेले. बघितलं तर वेल पूर्ण सुकला, जीव गेल्यासारखा वाकला होता. खूप वाईट वाटलं.पण पाणी घालत राहिले, आणि आज चार दिवसांनी त्याच्यात हिरवेपण दिसू लागलं.
त्यावरून असं वाटलं की आपण बायका पण त्या झाडासारख्याच असतो .काही वेलीसारख्या नाजूक, तर काही डेरेदार – काही रुक्ष, तर काही अल्लड, सुबक, सुंदर – काही नुसताच दिखावा, तर काही दिसायला बेढब पण उपयुक्त – काही लाजऱ्या -बुजऱ्या, तर काही स्वतःच्या अस्तित्वाने आकर्षित करणाऱ्या – काही बोचऱ्या तर काही मुलायम.
आपणही लहानपणी माहेरी रुजतो, फुलतो, बहरतो. लग्नानंतर आपली पाळेमुळे उखडून दुसऱ्या ठिकाणी आपल्याला रुजवलं जातं. आपणही या वेलीसारखं थोडं सुकतो, बिचकतो ,नवीन बदल पचवतो आणि आपली मुळे रोवायला सुरुवात करतो, बहरायला लागतो. तिथं आपल्याला खत,पाणी, वातावरण कसं मिळतं त्यावर प्रत्येकीचं बहरणं वेगवेगळे होतं. काहींना खूप खत, पाणी, काळजी मिळते, त्या खूप बहरतात, फुलतात. काहींना मिळतं पाणी खत, पण त्या दुर्लक्षित असतात. अशावेळी त्या फक्त वाढतात. पण फुलण्याची, बहरण्याची उमेद नसते. त्या स्वतःला हरवून बसतात. काहींना काहीच मिळत नाही. त्या हळूहळू एक एक पान गळून गळून जातात.
असे हे झाडांशी बाईपण जुळतं-
लेखक : सुश्री प्रिया कोल्हापुरे
मो. -9762154497
संग्रहिका – सुश्री माधुरी परांजपे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈