सौ. अमृता देशपांडे

☆ मनमंजुषेतून ☆ ।। राजा पंढरीचा ।। भाग 2 ☆ सौ. अमृता देशपांडे ☆ 

तो काळ महाराष्ट्रासाठी फार कठीण होता. यवनांचा धुडगूस माजला होता. परकीयांच्या आक्रमणापेक्षा जनजीवन उध्वस्त झाले होते. बायका मुली पळवल्या जात होत्या. मंदिरांची तोडफोड करून मूर्ती भंग केली जात असे. पांडुरंगा ची मूर्ती यवनांनी पळवून कर्नाटक प्रांतात नेऊन टाकली. अशा वेळी सर्व संतांनी आपापल्या परीने घाबरलेल्या जनतेला एकत्र आणण्याची जबाबदारी घेतली. भगवी पताका, भागवत धर्म,  आणि वारकरी संप्रदाय या त्रयींच्या आधारे जनतेला एक सुरक्षा कवच दिले. श्री संत भानुदास म्हणजे एकनाथ महाराजांचे वडील, यांनी पांडुरंगाची मूर्ती कर्नाटकातून आणून पंढरपूरात स्थापन केली. कर्नाटकातून आला म्हणून “कानडा राजा पंढरीचा”.

संत रामदास स्वामी, संत तुकाराम,  संत एकनाथ इत्यादिनी हिंदुधर्म,  हिंदु दैवते, यांचे महत्व पटवून देऊन साध्या भोळ्या शेतकरी, कामकरी वर्गाचे जगणे सुसह्य कसे होईल याची ग्वाही दिली. त्याच काळात शिवाजी राजे दिल्लीच्या पातशाहीशी टक्कर देत होते. स्वराज्य आणि सुराज्य स्थापनेसाठी त्यांची पराकाष्टेची शिकस्त चालू होती. त्यांना समर्थ रामदास व संतश्रेष्ठ तुकाराम महाराज हे पाठीशी राहून उत्तेजन देत होते. मार्गदर्शन करत होते. महाराजांना तुळजाभवानीचा वरदहस्त होता. अवघा महाराष्ट्र संक्रमणाच्या कठिण परिस्थितीतून जात होता. रयतेला, जनतेला एकत्र आणून त्यांच्या वृत्ती,  त्याचे आचार,  त्यांचे विचार , हे विठ्ठलाच्या रूपात असलेल्या परम शक्ती कडे वळवण्याचे महत्कार्य सर्व संतांनी केले आहे.  त्यातूनच भागवत धर्माची गुढी रोवली गेली. भगवी पताका अस्तित्वात आली. वारकरी,  माळकरी संप्रदाय उदयास आला.

भोळी भाबडी रयत विठ्ठलाच्या वात्सल्यपूर्ण कृपेच्या आश्रयाला आली.

अभ्यास करताना माझ्या मनात परत परत विचार यायचे, कि खरंच विठ्ठल भक्तांच्या मदतीसाठी धावून आला असेल का? मग कळलं, ज्याचा त्यावर विश्वास नाही,  किंवा मनात संदेह आहे, त्यांना तो दिसत नाही,  जाणवत नाही. पण ज्यानं विश्वास ठेवला, त्याला तो प्रत्यक्ष दिसतो, मदत करतो, संकटातून बाहेर काढतो. कुठल्याही गोष्टीत विश्वास आणि श्रद्धा महत्वाची. जनाबाईंच्या अभंगातला विठू लेकुरवाळा असतो.  सगळे भक्त विठ्ठल नामाच्या गजरात नाचतात, गातात, धावतात,  उड्या मारतात. स्वतःला विसरून पांडुरंगाच्या पायाशी लोळण घेतात.  पावसापाण्याची, उन्हातान्हाची  कदर न करता पायी पंढरीची वारी करतात. त्यांच्या भक्तीने,  त्यांच्या सेवेने वेडा झालेला विठू सुद्धा आषाढी कार्तिकी एकादशीला त्यांची वाट बघत असतो. असं हे देवाचं आणि भक्ताचं नातं. ‘ देव भावाचा भुकेला ‘ . त्याला फक्त भक्तांच्या ह्रदयीचा खरा भक्ती भाव अपेक्षित आहे. भक्तांची आर्ततेने आलेली ” विठ्ठला, विठुराया, पांडुरंगा ” अशी हाक त्याच्यापर्यंत क्षणार्धात पोचते, आणि तो भक्तांजवळ हजर होतो. हा अनुभव भक्तांचा.

 

© सौ अमृता देशपांडे

पर्वरी- गोवा

9822176170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments