श्री संभाजी बबन गायके
मनमंजुषेतून
☆ “एकसष्ट दिव्यांच्या प्रकाशात !!!” — एका पत्नीचे मनोगत – भाग – १ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
त्याची एकसष्टी जवळ आलीये आणि मी त्यादिवशी काहीतरी करू शकते, याचा त्याला अंदाज होताच. हल्ली सरप्राईज देण्याची नाहीतरी पद्धतच पडून गेली आहे. परंतू याला काही सरप्राईज द्यायचं म्हणजे महाकठीण. तो सेवानिवृत्त होण्याआधी ठीक होतं. सतत खात्याच्या कामात गर्क. अंगावर सरकारी आणि अधिकाराची वर्दी होती पण त्याचा रुबाब दिसायचा तो प्रशिक्षक म्हणून. त्यामुळे पायाला भिंगरी बांधलेली असायची त्याच्या. मी ही माझ्या नोकरीत असल्याने दोन डोळे शेजारी पण भेट नाही संसारी अशातली गत होती. पण आता मात्र असं नव्हतं. आणि मला त्याला त्याच्या एकसष्टीचं सरप्राईज द्यायचंच होतं. पण हा सतत जेथे जातो तेथे तू माझा सांगातीच्या चालीवर सोबत. कदाचित इतक्या वर्षांची भरपाई करण्याचा त्याचा हा प्रामाणिक प्रयत्न असावा.
याची एकसष्टी म्हणजे एक आंतरराष्ट्रीय कट शिजवण्यासारखी भानगड. आंतरराष्ट्रीय यासाठी की चिरंजीव आणि सूनबाई दूर तिकडे परदेशात. घरातल्या एकाला तरी माझ्या मनसुब्याची कल्पना असावी म्हणून आधी सूनबाईला कारस्थानात सहभागी करून घेणे आले. कारण तिच्याकडे सून आणि लेक अशा दुहेरी भूमिका आहेत. आम्हांला मुलगी नाही म्हणून सुनेलाच मुलगी मानायचं याचं खूप आधीपासून ठरलेलं होतंच. आणि इतक्या वर्षांत सूनबाई आमच्या लेकीच्या भुमिकेत अगदी फिट्ट बसल्यात. पण ही लेक आणि आमचा लेक या दोघांनाही त्यांच्या कामामुळे इथे येणे अशक्य होतं. त्यामुळे सर्व नियोजन करण्याची जबाबदारी माझ्याच खांद्यांवर येउन पडली. शहरात कार्यक्रम करण्यातला सर्वांत मोठा टप्पा म्हणजे कार्यालय मिळवणे. शिवाय ते जवळचे,सोईचे आणि परवडणारेही असावे लागते. शिवाय तारीख विशिष्ट असल्याने इतर कार्यक्रमांसारखी कार्यालयाची उपलब्ध तारीख बघून दिवस ठरवणे चालणारे नव्हते. कार्यालय बघायला म्हणून घराबाहेर निघाले तर साहेब सोबत यायला तत्परतेने तयार झाले. काहीतरी कारण सांगून मी एकटीच बाहेर पडले!
याचा मित्रपरिवार अनेक ठिकाणी विखुरलेला. त्यामुळे त्यांचेशी संपर्क साधणे जिकीरीचे होतेच. शिवाय ती मंडळी याच्या सतत संपर्कात असतात. त्या सर्वांना याची जन्मतारीख तोंडपाठ आहे कारण ही तारीखच लक्षात राहिल अशी आहे. पण यातील कोणी फितुर झाला तर गडबड होणार, हे नक्की!
मुळात असा कार्यक्रम करणे हे त्याच्या बुज-या स्वभावात बसेल की नाही,ही मोठीच शंका होती. कारण जबाबदारी आणि रुबाबाचा सरकारी रंगाचा गणवेश असूनही साहेबांनी तो कधी मिरवला नाही कामाव्यतिरिक्त. प्रामाणिकपणा, तत्वनिष्ठा आणि अंगभूत सौजन्यशीलतेच्या हल्ली दुर्गुण भासणा-या गुणांमुळे तो प्रसिद्धीपासून आणि लाभांपासून चार हात दूरच राहिलेला माणूस. तीस पस्तीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेत फक्त एकदाच प्रमोशन मिळाले त्याला यावरूनच सर्व काही लक्षात यावे खरे तर. पण त्याची त्याला कधी ना खंत ना खेद. लहानपणी म्हणजे तो चौथीला असताना त्याच्या बाबांनी त्याच्याकडून भगवद गीता तोंडपाठ करून घेतलेली होती. पुढे त्यातील काही श्लोकांचं त्याला विस्मरण झाले थोडेसे. मात्र ‘कर्मण्ये वाधिकारस्ते’ तो विसरला नाही. जे काम मिळाले ते जीव ओतून करावे हा एक अर्थ त्याला उमगला होता. त्यामुळे त्याला मानणारा मोठा मित्रपरिवार त्याने जमवून ठेवला होता. त्यामुळे कार्यक्रमाला बोलवायचे तरी कुणाकुणाला असा सवाल उभा राहिला. पाचशे दोनशे दीडशे वरून गाडी सव्वाशेवर स्थिर केली. पाच पंचवीस इकडे तिकडे होतातच.
अगदी मुलीच्या लग्नाची आमंत्रणे करावीत अशी यादी तयार केली लपून छपून. कारण काहींचे संपर्क क्रमांक माझ्यापेक्षा त्यालाच जास्त ठाउक असतात. पण काहीतरी कारण सांगून,त्याच्या फेसबुकमध्ये घुसखोरी करून ते क्रमांक मी मिळवले….त्या सर्वांना कार्यक्रमाला यायचेच होते. पण इतक्या लांबून कार्यक्रमाच्या आधी एक दिवस इथे येणा-या मित्रांनी चुकून इथल्या त्यांच्या कॉमन मित्रांकडे भंडाफोड न केला म्हणजे मिळवली!
जावयाचा कार्यक्रम आणि त्याच्या माहेरच्या म्हणजे माझ्या सासरकडील लोकांना नाही कळवलं तर कसं जमेल? त्यात हा त्यांचा अतिशय लाडका जावई. जावई कम लेक. म्हणजे जावई कमी आणि लेकच जास्त. माझ्या माहेरच्या आणि सासरच्या पैकी एकाला जरी वगळलं तर अवघड झाले असते…भावनिकदृष्ट्या! जितकी सेवा त्याने त्याच्या वडिलांची केली तितकीच काळजी माझ्या घरच्यांचीही घेतली आजवर. अहो, नोकरी मुंबईत आणि घर पुण्यात. त्याच्या वडिलांच्या पायांना रोज तेल लावून मालिश करून द्यायचा याचा शिरस्ता. बाबांची मालिश करून देणं वैद्यकीयदृष्ट्या अत्यावश्यक तर होतेच. एखादा पगारी माणूस नेमून हे काम खरे तर त्याला करून घेता आले असते…. पण मुलाचे कर्तव्य म्हणून तो हे काम न कंटाळता करत असे. त्यामुळे साहेब भल्या पहाटे रेल्वेने मुंबापुरीला प्रयाण करायचे आणि रात्री उशीरा पुण्यात परतायचे…असा क्रम थोडाथोडका नव्हे…कित्येक वर्षे चालला. याला भक्त पुंडलीक म्हणावं की श्रावण बाळ असा प्रश्न पडायचा.
माझ्या नणंदेचे म्हणजे याच्या बहिणीचे यजमान अकाली निवर्तले तेंव्हा याने मला ठामपणे सांगितले…दीदीची आणि तिच्या कुटुंबाची जबाबदारी आता आपली! आणि त्याने ती आजवर निभावली आहे. कार्यक्रमात दीदीच्या पोरींना म्हणजे भाच्यांना आणि भावाच्या मुलींना सहभागी न करून घेउन कसे भागणार? या भाऊरायाच्या सोहळ्याला बहिण आणि मामाश्रीच्या कार्यक्रमाला भाच्या, आणि पुतण्या तर हव्यातच. म्हणून मग सव्वाशेची निमंत्रण यादी दिडशेच्या घरात सहजच गेली. शिवाय गाणे शिकलेल्या भाचीबाई सूत्रसंचालनासाठी सूत्रे हाती घेण्यास उत्सुक होत्याच. त्यामुळे दीप-प्रज्वलन,स्वागत गीत, प्रार्थना,आभारासह सूत्रसंचलन इत्यादीचा प्रश्न परस्पर मिटला. फ्लेक्स,आमंत्रण पत्रिका, फुलांची सजावट,केक, एकसष्ट दिवे,जेवणाचा मेन्यू फोटोग्राफर,फुलांच्या पायघड्या,रंगमंच इत्यादी शेकडो बाबी पटापट फायनल झाल्या….त्याची माझ्यावर नजर होतीच… काही तरी डाव सुरू आहे हे ओळखायला त्याला वेळ नाही लागला. पण निश्चित डाव काय हे मात्र मी गुलदस्त्यातच ठेवू शकले.
– क्रमशः भाग पहिला
शब्दांकन व प्रस्तुती : श्री संभाजी बबन गायके.
पुणे
9881298260
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈