श्री संभाजी बबन गायके

? मनमंजुषेतून ?

☆ “एकसष्ट दिव्यांच्या प्रकाशात !!!” — एका पत्नीचे मनोगत – भाग – २ ☆ श्री संभाजी बबन गायके 

(काही तरी डाव सुरू आहे हे ओळखायला त्याला वेळ नाही लागला. पण निश्चित डाव काय हे मात्र मी गुलदस्त्यातच ठेवू शकले.) इथून पुढे — 

त्याच्या पुतणीचं अ‍ॅडमिशन इथं पुण्यातच झालं होतं इंजिनियरींगचं. कॉलेजच्या होस्टेलवर राहणं जवळपास निश्चितच झालेलं असताना यानं तिचा बाडबिस्तरा घरात आणून ठेवला. आणि तिच्यासोबत तो ही इंजिनियर झाला…तिस-यांदा..एकदा तो स्वत:,नंतर चिरंजीव आणि आता ही! कारण तिच्या सर्व अभ्यासात हा पूर्णपणे सहभागी झाला होता. गणित विषय पक्का असल्याने आणि शिकवण्याची प्रचंड हौस आणि आवाका असल्याने नोकरीच्या कामांतून हा नेमका वेळ काढायचाच. थोडक्यात एक मुलगी नसल्याचे शल्य याने भाची,पुतणी आणि सून यांच्यामार्फत सुसह्य करून घेतले होते.

आपला वाढदिवस या ही वेळेस नेहमीसारखा साजरा होणार एवढंच त्याला वाटलं. सोन्याची चेन करून घेतली बळेबळेच. कशाला? हा त्याचा सततचा प्रश्न मी न सोडवताच पुढच्या प्रश्नाला सुरुवात करायचे….असू दे रे….हे उत्तर तर जणू कॉपी पेस्ट करून ठेवले होते मनात. सोनं म्हणजे गुंतवणूक असं सांगितलं त्याला.  त्याला शोभेल असा पोशाखही तयार करून घेतला. मुलगा परदेशी…सूनबाईही त्याच्यासोबत…मग कशाला करायचा एवढा थाटमाट? हा त्याचा प्रश्न योग्यच होता. पण मी तो ऑप्शनला टाकला.

मुळात तो एकसष्ट वर्षांचा दिसत नाही…..तो मूळातच उत्तम चालीचा असल्याने वजन नेहमीच आटोक्यात. पण सरकारी खात्याच्या चाकोरीबद्ध कामाच्या पलीकडे जाऊन काम करण्याच्या प्रवृत्तीमुळे समाजात वजन भरपूर. पण हे वजन कुणावरही टाकण्याची त्याच्यावर वेळ येत नाही आणि त्याची इच्छाही नसते. त्यामुळे त्याची एकसष्टी होते आहे, हे अनेकांना आश्चर्याचे होते. शिवाय तो हा सोपस्कार करून घ्यायला तयार झालाच कसा? हाही प्रश्न अनेकांना पडला. मग त्यांना सांगावे लागले..यातलं त्याला काहीही माहित नाही…त्याला थेट कार्यक्रम स्थळी आणणार आहे….मंदिरात जायचंय असं खोटं सांगून!

मी सकाळपासून तयारीत. तर साहेब निवांतपणे त्यांच्या लेखनाच्या,संशोधनाच्या कामांत व्यग्र. दुपारचे जेवणही बेताचेच घेतले. रात्री बाहेरच जेवायचं आहे म्हणून दुपारी कमी जेवावे…हा त्याचा विचार. कार्यक्रमात मला त्याच्याविषयी बोलायचंच होतं…पण काय काय सांगणार? ‘तु योग्य तेच करशील याची मला खात्री आहे’ असं तो लग्नाच्या पहिल्या दिवसापासून मला सांगत आलाय. त्यामुळे मी तसा प्रयत्नही केला. आणि त्यानेही तो गोड मानून घेतला. तु माझ्या या मोठ्या परिवाराचा एक भाग झाली आहेस… या परिवाराची सर्व सुख-दु:खे,अडचणी आता तुझ्याही आहेत’ असं म्हणून त्याने संसार सुरू केला. आपलं एक स्वत:चं घर असावं असं त्यालाही वाटत होतं. पण पगारात भागवा या तत्वावर निष्ठा असल्याने त्याच्या आणि माझ्या पगारात घर नजरेच्या टप्प्यात लवकर आलेच नाही. पण देवाच्या कृपेने डोईवर छप्पर आलं. आणि मग आम्ही ते निगुतीनं सजवलं. एक मुलगा..तो ही बाप से सवाई. वडील एवढे अधिकारी असूनही त्याने कधीही कुठल्या नियमांचा भंग केला नाही…अगदी कुणी पहात नसताना सुद्धा!

संसार सुरू असताना त्याने माझा नवरा,माझ्या आणि त्याच्याही पालकांचा मुलगा, भावाचा आणि बहिणीचा भाऊ, भाच्यांचा मामा, पुतण्यांचा काका, सहका-यांचा मार्गदर्शक, नवोदितांचा प्रशिक्षक, वाचकांचा लेखक, श्रोत्यांचा व्याख्याता, शाळकरी विद्यार्थ्यांचा शिक्षक अशा अनेक भूमिका त्याने लीलया पार पाड्ल्या.

नोकरीत,त्यातून शासकीय नोकरीत अनेक आव्हाने असतातच…व्यवस्था बदलण्याच्या वेळखाऊ कामात वेळ घालवण्यापेक्षा व्यवस्थेत राहून शास्त्रीय, संशोधनाच्या, जनसंपर्काच्या माध्यामातून शक्य ते करीत राहणे त्याने शिकून घेतले होते. त्याच्या कुण्या साहेबांनी दिलेला Love all, Trust a few but do wrong to none  अर्थात प्रेम सर्वांवर करा,त्यातला काहींच्यावर विश्वास ठेवा मात्र वाईट कुणाचंच करू नका! हा कानमंत्र त्याने प्रत्यक्ष आचरणात आणला. त्यामुळे निवृत्तीनंतर आजही त्याला देशभरात लोक बोलावतात आणि तो ही न कंटाळता जातो. अर्थात आता मी ही सोबत जातेच. त्याच्या व्याख्यानांना मिळणारा प्रतिसाद पाहते, तेंव्हा मलाही छान वाटतं!

कार्यक्रमाच्या दिवशी सकाळपासून मी फोन सायलेंटवर ठेवला होता….चोरून बोलायचं कार्यक्रमाची तयारी करणा-या लोकांशी!  चार वाजताच घराबाहेर पडले…म्हटलं जरा मैत्रिणीच्या घरी जाऊन येते…तिच्या घरी पुजेचा कार्यक्रम आहे. मी साडेपाच वाजता तयार रहा…आपण मंदिरात जाऊ आणि मग नंतर जेवायला. मी आलेच..असं म्हणून मी सटकले आणि थेट कार्यालयात गेले. तयारी अंतिम टप्प्यात होती. बोलावलेले सर्वच आलेले होते…तयारीत. घटिका जवळ आली….कार्यालयात शांतता ठेवली होतीच. दिवेही मंद केले होते. फुलांची पायघडी तयार होती. रेडी? मी सर्वांना म्हटले…आणि रिक्षा करून घरी गेले. त्याला नवा ड्रेस, सोन्याची चेन घालायला लावली. ती चेन त्याने लगबगीने शर्टच्या आत घालायचा प्रयत्न सुरू केला. मी म्हटलं ‘असू दे थोडा वेळ! छान दिसतीये! रिक्षा कार्यालयाच्या आत जाऊ लागली तेंव्हा तो चमकला. अगं इथं कुठलं हॉटेल? हे तर कार्यालय दिसतंय! मी त्याला हाताला धरून हॉल मध्ये नेलं. सनईच्या सुरांनी त्याचं स्वागत झालं. त्याच्या गळ्यातली चेन चमकत होती. एवढ्या लोकांना पाहून त्याने ती चेन लगेच शर्टमध्ये लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. दिवे प्रखर लागले आणि त्याची अत्यंत प्रेमची माणसं उठून उभी राहिली…टाळ्यांचा गजर झाला. त्याला कुणाकुणाला भेटावं,काय बोलावं हे सुचेना. बालपणीचे मित्र, शाळा-कॉलेजातले मित्र,खात्यातली जुनी जाणती माणसं…..सर्व अगदी जवळचे नातलग…! फुलपाखराला मधाने शिगोशीग भरलेल्या फुलांच्या मोठ्या बगिच्यात सोडून द्यावं तसं झालं… एखाद्या लहान मुलासारखा भांबावून गेला बिचारा.

त्याला हाताला धरून मी मंचावर घेऊन जाऊ लागले…फुलांच्या पायघड्यांवर पाऊल टाकले तर ती कुस्करून जातील म्हणून तो आधी तयारच होईना…पण मग पायांतल्या चपला काढून अलगद चालत गेला…त्यानं त्याच्या सहवासातल्यांना आतापर्यंत या फुलांसारखंच जपलंय.

मग एकसष्ट दिव्यांनी ओवाळणं,केक कापणं,त्याला गोडाची आवड..त्यातल्या त्यात सातारी कंदी पेढ्यांचं जास्त कौतुक म्हणून मित्रांनी आणलेला पेढे-हार….सर्व सर्व मनासारखं झालं..!

मग मी बोलायला उभी राहिले तर मनात असलेलं सर्वच उंचबळून आलं….जमेल तेव्हढं सांगून टाकलं….आणि इतक्या वर्षांत पहिल्यांदाच त्याला सर्वांदेखत,सार्वजनिकरित्या आय लव यू! म्हटलं! त्याच्या चेहरा त्या कंदी पेढ्यांपेक्षाही गोड दिसत होता यावेळी !

– समाप्त –

— एका पत्नीचे मनोगत

(नुकताच हा सोहळा पाहिला आणि प्रत्यक्ष अनुभवला. एका सुशील माणसाच्या पत्नीच्या भूमिकेत जाऊन लिहिलेला हा लेख. व्यक्तींची नावे,पदे आणि इतर तपशील महत्त्वाचा नाही म्हणून तो लिहिला नाही. कारण प्रेम एकाच वेळेस वैय्यक्तिकही असते आणि वैश्विकही. आपल्या आसपास अशी माणसं असणं हे आपलं आणि समाजाचं सुदैवच की ! एक नातं असं रूपाला येऊ शकतं, बहरू शकतं हे केवळ गोड… )

शब्दांकन व प्रस्तुती : श्री संभाजी बबन गायके.

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments