डाॅ. शुभा गोखले

? मनमंजुषेतून ?

☆ पोत (बुनावट, Texture)लेखक : अज्ञात ☆ डाॅ. शुभा गोखले

.कापडाच्या स्पर्शाशी संबंधित असलेला हा शब्द हल्ली ऐकायलाही मिळत नाही फारसा. 

.हल्ली सगळे कापडाचा Feel घेतात. मात्र लहानपणी निरुपायाने आईबरोबर खरेदीला जावं लागलं की हा शब्द हमखास कानावर पडायचा. 

काल खादी भांडारात हा शब्द अचानक फिरुन समोर आला. एकदम वाटलं, अरे पोत फक्त कापडाला थोडाच असतो !…… 

 पोत आवाजालासुद्धा असतो की. 

– लताजींच्या आवाजाला निर्मळतेचा पोत, 

– जगजीत सिंग च्या आवाजाचा मखमली पोत,

– आमच्या शाळेतील संस्कृतच्या सरांच्या आवाजाचा विद्वत्तेचा पोत, 

– आजीच्या आवाजाचा विशुद्ध मायेचा पोत.

– तर काही जणांच्या खोट्या स्तुतिसुमनांच्या मागे दडलेला किळसवाण्या स्वार्थाचा पोत उघड असतो.

अगदी एकेकाच्या स्वभावालासुद्धा पोत असतो.

– देशस्थांच्या स्वभावाचा पोत घोंगडीसारखा असतो, जरा खरखरीत पण ऊबदार. 

– कोकणस्थांच्या स्वभावाचा पोत मात्र पार्‍यासारखा असतो, कितीही जवळ आलं तरी स्वतःचं अस्तित्व   वेगळं टिकवून ठेवतो. 

– काही जणांच्या स्वभावाला सुरवंटाच्या केसांचा पोत असतो, जवळीक साधायचा प्रयत्न केला की कातडी सोलवटलीच पाहिजे. 

– काही जणांच्या स्वभावाला फणसाच्या सालीचा पोत आहे, दुखवत नाही पण फार जवळही येऊ देत नाही. 

– तर काहींच्या स्वभावाला मात्र, निरांजनाच्या प्रकाशाचा पोत आहे ..  शांत, शीतल, प्रसंगी दाहक, पण तरीही घर उजळून टाकणारा.

एकेका वयालासुद्धा निरनिराळा पोत असतो. 

– बालपणाला सायसाखरेचा पोत असतो,

–  पौगंडाला गुळगुळीत कागदावरच्या देखण्या चित्राचा पोत असतो, जे हवंहवंसं वाटतं पण हाती गवसत नाही. 

– तारुण्याला फुलपाखराच्या पंखांचा पोत असतो, देखणं, सुंदर पण विस्कटून जायला तत्पर. 

– तिशी-पस्तिशीला पाचशे रुपयांच्या कोर्‍या करकरीत नोटेचा पोत असतो, 

तर,

– पन्नाशीला धुऊन वापरून मऊ झालेल्या सोलापुरी चादरीचा पोत असतो.

–  साठीला मातीच्या मडक्याचा पोत असतो, दिसतं कणखर, पण असतं हळवं. 

– सत्तरीपुढे मात्र मिठाईवरच्या राजवर्खाचा पोत होतो,.. पाहताच मनात आदर निर्माण करणारा, मात्र काळजीपूर्वक हाताळायला हवं याचं भान देखील देणारा.

बघता बघता किती तऱ्हेतऱ्हेचे पोत या पोतडीत गोळा झालेत ना ?

स्वतःचा पोत ओळखा….!…. मनस्पर्शी पोत….. 

ह्या ‘पोता’नी अनेक आठवणींचं “पोतं” उघडेल…..अशी आहे बघा भाषेची करामत.!

लेखक : अज्ञात

प्रस्तुती :  डॉ. शुभा गोखले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments