सुश्री मंजुषा सुनीत मुळे
मनमंजुषेतून
☆ “श्रध्दा आणि विश्वास…” लेखक – अज्ञात ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
आज नैवेद्याला नुसती दूधसाखर ठेवलीये हो.. गोड मानून घ्या.. ” असं म्हणून आज्जींनी स्वामींच्या मूर्तीला भक्तिभावाने नमस्कार केला..आणि ‘आज बाहेर पडायलाच हवं. फळं, भाजी सगळंच आणायला झालंय. छान उघडीप पण आहे.’ असं स्वतःशीच म्हणत त्या बाहेर जायची तयारी करू लागल्या. “बाहेर जाऊन येते हो. उद्याला नैवेद्यासाठी फळं, पेढे घेऊन येते. उद्या परत दुधसाखरच समोर ठेवली तर म्हणाल आजही दुधसाखरच का ? म्हणून..”असं स्वामींच्या मूर्तीकडे बघून म्हणत त्या स्वतःशीच हसल्या अन कुलूप लावून बाहेर पडल्या..त्यांना एकुलती एक मुलगी.. लग्न होऊन सासरी गेली.. यजमान त्या आधीच गेलेले…मुलीच्या लग्नानंतर त्यांनी रहाता भला मोठा बंगला विकून कोथरूडमध्ये छोटासा फ्लॅट घेतला आणि त्या स्वामींच्या सोबतीने राहू लागल्या.. माहेरी सगळेच स्वामींचे भक्त त्यामुळे नकळत्या वयापासून त्यांच्यावर श्रद्धा जडली ती आजपावेतो..एकटेपण आल्यावर मग स्वामींच्या मूर्तीशी बोलायची सवयच जडली… अगदी एखाद्या माणसाशी बोलावं तसं त्या स्वामींच्या मूर्तीशी बोलत. अगदी सगळं सगळं सांगत. एकट्या असल्या तरी व्यवस्थित स्वयंपाक करून बरोब्बर साडेबाराला मूर्तीसमोर नैवेद्याचं ताट ठेवत अन पंधरा मिनिटांनी, “स्वामी, बरं झालंय ना सगळं ? तिखट नाही ना लागलं काही ? ” असं त्यांना विचारून तेच ताट त्या स्वतः घेत असत..इच्छा एकच होती की शेवटी लोळत घोळत पडू नये..शांतपणे मरण यावं.. हल्ली त्या तसं स्वामींना वारंवार सांगत…दिवस, वर्षं सरत होती. आज अंथरुणावर अंग टाकायच्या आधी हात जोडून त्यांनी नेहमीप्रमाणे स्वामींचं स्मरण केलं.. आणि ” स्वामी, आता आयुष्याच्या या सांजवेळी पुढच्या प्रवासाला निघून जावंसं वाटतं…जे योग्य असेल ते घडवून घ्या..” अशी प्रार्थना करून त्यांनी डोळे मिटले..मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या कपाळावर कुणीतरी हात ठेवल्याचा त्यांना भास झाला अन, ” बाळ, सगळं तुझ्या मनासारखं होईल, पण अजून वेळ आलेली नाही.” हे वाक्य अगदी स्पष्टपणे ऐकू आलं.. त्या जाग्या होऊन अंथरुणावर उठून बसल्या.. काही दिवसांपासून चाललेली मनाची घालमेल संपली. अतीव समाधानानं अंतःकरण भरून आल्यासारखं झालं. त्यांनी स्वामींकडे पाहिलं. मंदशा दिव्याच्या उजेडात स्वामींची मूर्ती तेज:पुंज दिसत होती. खरं सांगू, यालाच म्हणतात श्रध्दा आणि विश्वास.
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : सुश्री मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈