सुश्री शिल्पा मैंदर्गी
☆ मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे –6 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी ☆
(पूर्ण अंध असूनही अतिशय उत्साही. साहित्य लेखन तिच्या सांगण्यावरून लिखीत स्वरूपात सौ.अंजली गोखले यांनी ई-अभिव्यक्ती साठी सादर केले आहे.)
कॉलेज ची धमाल करता करता परीक्षा कधी संपली समजलेच नाही. काही दिवसांनी रिझल्ट लागला आणि मी मराठी घेऊन बीए चांगल्या मार्कांनी पास झाले. सगळ्यांनाच खूप आनंद झाला. सगळ्यांनी माझे कौतुक केले आणि अभिनंदनाचा वर्षाव झाला.
पण आता पुढे काय हे मोठे प्रश्नचिन्ह उभे राहीले. कोणी म्हणाले आता एम ए करून घे. कोणी म्हणाले त्यापेक्षा आवाज चांगला आहे गाणं शिक…
लहानपणापासून मला नृत्याबद्दल,नाचा बद्दल खुपच ओढ होती. मला ना,चवथीपर्यंत चांगलं दिसत होतं. म्हणजे जन्मतः जरी मला मोतीबिंदू असले, तरी ऑपरेशन करून थोडं दिसायला लागलं होतं. पण फार लहानपणी मोतीबिंदू झाल्यामुळे काचबिंदू वाढत गेला आणि चौथीनंतर दृष्टी कमी कमी होत गेली. पुढे बीए झाल्यावर वयाच्या एकविसाव्या वर्षी भरतनाट्यम शिकायला मी सुरुवात केली. तेच का हे सुद्धा मला चांगलं आठवतंय. माझे बाबा विद्या मंदिर प्रशाला मिरज, इथं शिक्षक होते. त्यावेळी दिल्लीमध्ये झालेल्या एका कोर्समध्ये त्यांना प्रोजेक्टर, स्लाईड्स बक्षीस मिळाले होत्या. त्यामध्ये भारतातील प्राचीन मंदिरे, भारतीय नृत्य याची सखोल माहिती होती. परमेश्वर कृपेने त्यावेळी मला दिसत होते आणि तो नाच, तो सुंदर पोशाख,छान छान दागिने माझ्या मनामध्ये इतके पक्के बिंबले होते की माझी नजर नंतर गेली पण मनावरचे ते दृश्य नाहीसे झाले नाही. ते मला सारखे साद घालत होते म्हणतात ना, चांगले बी पेरले ही पोषक वातावरणात ते उगवते, फुलते. माझेही तसेच झाले. अर्थात हे सगळे माझ्या नृत्यातल्या गुरु मुळेच घडू शकले. माझ्या नृत्यातल्या गुरु म्हणजेमिरजेतील सौ धनश्री आपटे.
माझ्या नृत्यातल्या, माझ्या विचारांच्या जडण-घडणीतल्या, माझ्या व्यक्तिमत्व विकासाला उमलू देणाऱ्या, फु लू देणाऱ्या, मला माझ्या आयुष्यातला आनंद मिळवून देणाऱ्या आणि एक प्रकारे माझे जीवन उजळून टाकणाऱ्या या माझ्या ताई म्हणजे सौ धनश्री ताई या माझ्या गुरुच आहेत.
अशा गुरू मला केवळ माझे नशीब,माझ्या आई बाबांचे आशीर्वाद,परमेश्वराची कृपा आणि ताईचा मोठेपणा यामुळेच मला प्राप्त झाल्या.
मी बी ए झाल्यानंतर माझ्या मनातले नृत्य शिकण्याचे गुपित आई बाबांना सांगितले. माझ्या बाबांनी ते मनावर घेतले आणि मला नृत्य. कोण शिकवू शकेल याचा शोध घ्यायला सुरुवात केली. धनश्री ताई बद्दल समजल्यावर माझे बाबा मला त्यांच्याकडे घेऊन गेले. तो पहिला दिवस मला अजूनही चांगला आठवतोय. बाबांनी माझी ओळख करून दिली आणि हिला तुमच्याकडे नृत्य शिकायचे आहे आहे असे सांगितले. माझ्या चालण्या वरून, वावरण्यावरून ताईंना मी पूर्ण दृष्टिहीन आहे असे वाटले नाही. पण ज्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की एका आंधळ्या मुलीला नृत्य शिकवायचा विडा आपल्याला उचलायचा आहे, तेव्हा क्षणभर त्याही गोंधळल्या. त्यांना हे अनपेक्षित होतं. थोडा विचार करून म्हणाल्या मी दोन दिवसांनी सांगते. आणि त्यांचा आलेला होकार माझ्यासाठी खूप मोलाचा ठरला. माझ्या आयुष्याला प्रकाश देणारा ठरला.
फक्त मला एकटीला शिकवण्यासाठी ताईंनी माझ्यासाठी बुधवार आणि शुक्रवार राखून ठेवले होते. एकदा तरी त्यांना जमणार नव्हते,म्हणून मला घरी सांगायला आल्या, आज येऊ नको म्हणून. त्यावेळी. मी एकटी जाऊ शकत नव्हते ना,कोणीतरी माझ्याबरोबर सोडायला आणायला लागायचे. आमची खेप वाचावी म्हणून त्या स्वतः आल्या. त्यांच्यातला तो साधेपणा, खरेपणा इतकी वर्ष झाली, तरी अजून तसाच आहे .
ताईंनी मला नृत्यामधल्या हाताच्या,पायाच्या विशिष्ट हालचाली, हावभाव, चेहऱ्यावरचे भाव कसे आले पाहिजेत ते मला समजून समजावून,शिकवलं. हाताच्या मुद्रा त्या तोंडी सांगायच्या. अंगठा आणि पहिले बोट यांची टोके जुळवून गोल कर, बाकीची तीनही बोटं तशीच राहू दे. पायाच्या हालचाली सांगताना त्या या खाली बसून माझे पाय तसे करून घ्यायच्या,एकदा मला कळलं की त्यांना पाहिजे तसं जमेपर्यंत प्रॅक्टिस करून घ्यायच्या . माझ्या एमएच्या अभ्यासाचं सांगते, धीर गंभीर अशा श्लोकांच्या स्वरांमध्येमला दशावतार करायचे होते. अक्षरश: नाच करत दहा अवतार सादर करायचे होते. कलकी या अवतारामध्ये मी खरंच घोड्यावर बसून करते आहे असेच मला वाटले. मला त्या सगळ्या अभ्यासाची मजा लुटता आली,आनंद घेता आला.
गाण्यांचे विशिष्ट बोल, त्याचा अर्थ, त्यानुसार हावभाव हे सगळं प्रॅक्टिस न जमत गेलं. सुरुवाती सुरुवातीला काय व्हायचं मी नुसती शरीरानं म्हणजे फिजिकली नाचत होते. घरी येऊनही त्याचा सराव करत होते. एकदा त्यांच्या लक्षात आलं की नाचून नाचूनमाझे पाय सुजले आहेत तेव्हा त्या म्हणाल्या, “नृत्य नुसतं शरीरांन करायचं नसतं. मी काय सांगते ते मनानं, बुद्धीने समजून घे, तसं मनात उतरु दे.” त्यासाठी त्या मला शंभर गोष्टी सांगायच्या, त्यातल्या मला कशातरी पन्नास समजायच्या. माझं त्यांनी इतकं पक्क करून घेतलं की मी अजून सुद्धा झोपेतही ते विसरणार नाही. त्यांनी नृत्यातल्या सगळ्या अवघड गोष्टीसोप्या करून सांगितल्या. मनापासून कसं करायचं याची ट्रिक सांगितली. मला वेगळच समाधान मिळालं. आपल्यातलं काहीतरी सुप्त असलेलं, मला लागले याची जाणीव झाली. नृत्या तला आनंद मिळाला.
मी भरतनाट्यम ची विद्यार्थ्यांनी आहे. पूर्ण शिकून झालं असं मी म्हणणार नाही. पण पण गांधर्व महाविद्यालयाच्या सलग सात वर्ष परीक्षा दिल्या मी . शेवटची परीक्षा नृत्य विशारद ची होती.
असाध्य ते साध्य कसं करावं ते मी माझ्या ताई कडूनच शिकले. माझ्या आई बाबांच्या खालोखाल, माझ्यासाठी माझ्या ताईंचं स्थान आहे. त्यांनी मला खूप, माझ्या आयुष्यात त्यांना अनन्यसाधारण स्थान आहे. शिष्याचे प्रगती गुरु कसा भेटतो यावर अवलंबून असते. माझे गुरु प्रगल्भ अध्यात्मिक पाया असणारे, उच्च स्तरावरील विचारांचे आणि खूप प्रेमळ आहेत. ताईंनी मला जवळजवळ वीस वर्ष शिकवले आहे म्हणून मी मी अनुभवान एवढं बोलू शकते.
…. क्रमशः
© सुश्री शिल्पा मैंदर्गी
दूरभाष ०२३३ २२२५२७५
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈