सुश्री सुनीला वैशंपायन 

? मनमंजुषेतून ?

☆ भगवंताची मिठी… ☆ सुश्री सुनीला वैशंपायन 

सोप्प नसतं हो, भगवंताचं होणं. प्रचंड निरागसता लागते, स्वच्छ मन लागतं. तुम्ही कधी भगवंताला मिठीत घेतलय का? नाही ना…. कधी सहज म्हणून कुणाला निरपेक्ष मदत केली आहे  का? करून बघा.. भगवंत स्वतःहून मिठीत घेईल. अतीव दुःखात कुणाला आधार दिलाय का? देऊन बघा.. भगवंत स्वतःहून मिठीत घेईल. कुणाच्या उत्कर्षाचं कारण व्हा, कुणाच्या यशात भक्कम साथ द्या, भगवंत स्वतःहून मिठीत घेईल. कुणी कुणाचं नसतं हो.. तरीही कुणाचं तरी व्हायला काय हरकत आहे? आई नसलेल्याची आई व्हा, कुणाची ताई व्हा, तर कुणाचा भाऊ.. मग बघा.. भगवंत स्वतःहून मिठीत घेईल. कुणाच्या चेह-यावरचं हास्य बना, कुणाचे अश्रूंनी तुडुंब भरलेले डोळे पुसा, मग बघा.. भगवंत स्वतःहून मिठीत घेईल. वार्धक्याने थकलेल्या पायांना तुमच्या हातांची ऊब द्या, थरथर कापणारे हात समाधानाने आशिर्वाद देतील.. मग भगवंताने स्वतःहून मिठी मारल्यासारखं वाटेल. आज प्रत्येक जण पैसे कमवायच्या मागे लागलाय. स्वतःचं स्टेटस वाढवायचय् प्रत्येकाला.. कुणाच्यातरी आयुष्यात आपल्या वाटणीचा ओंजळभर आनंद देऊन तर बघा.. खात्रीने सांगतो त्यांच्या मनातलं तुमचं स्टेटस खूप उंचावर असेल, अन् त्याच वेळेस भगवंताच्या मिठीची चाहूल लागेल. व्याकुळ नजरेने पाहत असलेल्या मुक्या जनावरांना पाणी द्या, अन्न द्या, ते आमरस नाही हो मागत.. तुम्ही दिलेल्या शिळ्या पोळीतच ते खूष असतात.. कधी स्वतः जवळची ताजी पोळी देऊन तर बघा, भगवंत स्वतःहून मिठीत घेईल. आपल्याकडे आपलं असं काय आहे? भगवंतानीच दिलेल्याचा आपण तोरा मिरवतो. मग त्यानी दिलेलं कघी कुणाला मनापासून द्या.. मग बघा … भगवंत मिठी मारल्याशिवाय राहणार नाही.

कवयित्री- अज्ञात

प्रस्तुती : सुनीला वैशंपायन

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments