प्रा.डॉ.सतीश शिरसाठ
☆ एका श्रीमंत गरिबाची गोष्ट… भाग – 2 ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆
डाॅ.भालचंद्र फडके
(“जू तुमच्या मानेवर नेहमीच असते.” असं म्हणून स्त्रियांच्या रोजच्या जीवनातील विविध प्रकारच्या जूचे त्यांनी वर्णन केले.) इथून पुढे.
पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात तेव्हा धुळे जिल्हा होता. धुळे जिल्ह्य़ातील महाविद्यालयीन प्रौढ शिक्षण कार्यक्रम अधिका-यांच्या जिल्हा बैठकीसाठी विभागातील आम्ही सगळे अधिकारी धुळयाला गेलो होतो. एका गेस्ट हाऊसमध्ये आदल्या रात्री आमचा मुक्काम होता. रात्रीचे जेवण आटोपल्यावर आम्ही सगळेजण झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी जिल्हा बैठक होती. रात्री साधारणत: एक वाजला असेल. मी सहज गेस्ट हाऊसच्या बाहेर पडलो. पुढच्या खोलीतला लाईट जळत होता. तिथे फडके सर होते. दुसऱ्या दिवशी सरांशी बोलताना समजलं की, काही दिवसांतच त्यांचं एक व्याख्यान होतं. त्याची टिपणे काढण्यासाठी सर रात्रभर जागे होते.
गुजरातमधील एका विद्यापीठातर्फे एक राष्ट्रीय पातळीवरील चर्चासत्र होतं.आमच्या विभागातर्फे या चर्चासत्रासाठी मी जावं असं सरांनी सांगितलं. यापूर्वी चर्चासत्र, कृतिसत्रं वगैरेमध्ये भाग घेण्याचा मला बिलकुल अनुभव नव्हता. तेही महाराष्ट्र सोडून इतर राज्यात तर अजिबात नव्हता. सरांच्या या निर्णयाने मी पुरता भांबावून गेलो होतो. या चर्चासत्रासाठी कुलगुरूंची मंजूरी वगैरे तांत्रिक बाबी सरांनीच पूर्ण केल्या.
पुणे ते मुंबई आणि मुंबईहून सुरत असा प्रवास करत मी सुरतमार्गे बलसाडला पोहोचलो. टीव्हीवर काळे कोट घातलेली माणसं गंभीर चेह-याने चर्चासत्रात बसलेले मी पाहिले होते. इथं ते अनुभवलं. उद्घाटनानंतर लगेच मला पेपर सादर करण्यास सांगण्यात आलं. सगळं बळ एकवटून मी मनाचा हिय्या करून पेपर सादर केला. सुरवातीला वाटलं होतं तितकंसं अवघड वाटलं नाही. आपल्या ज्युनियर सहका-याला संधी देऊन त्यासाठी त्याला मदत करण्याची सरांची ती कार्यपध्दत मला आयुष्यात खूपच मौलिक वाटली.
माझं लग्न रजिस्टर पध्दतीनं झालं. सर्व धार्मिक बाबींना यात फाटा दिला होता. काही निवडक लोकांसाठी लग्न झाल्यावर सायंकाळी रिसेप्शन ठेवलं होतं. सर आवर्जून आले होते. माझ्या आणि माझ्या पत्नीच्या हातात एक बाॅक्स त्यांनी ठेवला. ” सर,कोणताही आहेर किंवा भेटवस्तू आणू नयेत असं आम्ही पत्रिकेत म्हटलं होतं” असं मी सरांना बोललो.
“अहो शिरसाठ, हा आहेर नाही. मिठाई आहे ” सरांनी दिलेल्या मिठाईचा मी अव्हेर करू शकलो नाही.
भारतीय संविधानाचे निर्माते डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत सरांनी काम केले होते. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथे केलेल्या धर्मांतराच्या वेळी झालेल्या नाटकाचे दिग्दर्शन सरांनी केले ही आठवण कुणीतरी मला सांगितली होती. बाबासाहेबांसोबत काम केल्याने सामाजिक परिवर्तन आणि समाजातील उपेक्षित, सर्वसामान्य माणसांविषयी सरांना वाटणारी कळकळ त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि संपूर्ण जीवनाचा अविभाज्य भाग बनून राहिली होती. भारतातील अनेक विद्यापीठांतून प्रौढ शिक्षण कार्यक्रम सुरू होता. मात्र ह्या कार्यक्रमातून साक्षरता प्रसाराबरोबरच समाजप्रबोधन आणि परिवर्तन घडवून आणण्याची दिशा सरांनी घालून दिली होती. त्यामुळेच गावोगावचे प्रौढ शिक्षण कार्यक्रम हे समाजपरिवर्तनाची केंद्रे बनली होती. यातून अनेक सामाजिक कार्यकर्ते तयार झाले. लोकांना आपले प्रश्न सोडविण्यासाठी स्वावलंबी बनविणे हे प्रौढ शिक्षण कार्यक्रमाचे ध्येय बनले होते. या कार्यक्रमातून अनेक ध्येयवादी कार्यकर्ते तयार झाले. सामाजिक अभिसरणाच्या अनेक यशोगाथा या कार्यक्रमातून उदयाला आल्या. मला चांगलंच आठवतं, विद्यापीठाच्या प्रौढ शिक्षण केंद्रातील प्रौढांचा एक आनंदमेळावा आम्ही दापोडी येथील जीवक संस्थेत आयोजित केला होता. विविध सामाजिक स्तरांवरील शेकडो स्त्री-पुरुष प्रौढ या मेळाव्यात सहभागी झाले होते.
साहित्य क्षेत्रात लिहू लागलेल्या अनेक नवोदित लेखक, कवींच्या पाठीशी सर नेहमीच उभे असत. त्यांना ते लिहिण्याला सतत प्रोत्साहन देत. दलित साहित्याचे ते खंदे समर्थक होते. खेडोपाडी, झोपडपट्टीतील अनेक दलित कार्यकर्त्यांना ते नेहमीच मदत करत .यामुळे ‘ दलित फडके’ अशी त्यांच्यावर टीका होई. मात्र समाजपरिवर्तनाचा झेंडा सतत खांद्यावर घेणा-या सरांनी अशा टीकाही हसत हसत स्वीकारल्या.
सर खूप आजारी होते. विभागातील आम्ही अनेकजण त्यांच्या घरी त्यांना भेटायला गेलो होतो. सर बोलू शकत नव्हते. मात्र नेहमीप्रमाणे हसून त्यांनी आमचे स्वागत केले. अशाही स्थितीत डाव्या हाताने ते लिहीत होते. एका लढवय्या वीराची ती जिद्द नक्कीच प्रेरणादायी होती.
सर गेले, तरी त्यांच्या पत्नी हेमाताई आणि कन्या सई यांच्याशी माझा संपर्क होताच. विद्यापीठातून सेवानिवृत्त झाल्यानंतर एकदा मी माझे एक पुस्तक त्यांना भेट देण्यासाठी त्यांच्या घरी गेलो होतो. फडके बाई थकल्या होत्या. मात्र मी पाहिलं की,आईची सेवा करणं हे आपलं जीवनकार्य समजून सई त्यांचं सगळं करत होत्या. बाईंनी लिहिलेलं पुस्तक- ‘ जीवनयात्री ‘ त्यांनी मला दिलं. हे पुस्तक मी अनेकदा वाचून काढलं. त्यातील त्यांचं एकूणच लिखाण वाचून वाटलं, हे पुस्तक त्यांनी शाईने नाही तर डोळ्यातील अश्रूंनी लिहिलं आहे. या पुस्तकात बाईंनी सरांविषयी लिहिलंय. सर त्यांना म्हणायचे, ” तू एखादया पाटलाची बायको व्हायची तर माझ्यासारख्या गरीब मास्तराची बायको झालीस ” बाईंना मात्र असं कधीच वाटलं नाही. आपल्या गोड स्वभावाने अनेक लोकांचं प्रेम सरांनी मिळवलं होतं. आर्थिक बाबतीत त्यांची स्थिती फारशी चांगली नव्हती. पण मनाने मात्र ते नक्कीच अतिश्रीमंत होते.
— समाप्त —
© प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ
सेवानिवृत्त प्राध्यापक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
मो व वाटसॅप नं. – ९९७५४३५१५२, ईमेल- [email protected]
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈