श्री मकरंद पिंपुटकर
मनमंजुषेतून
☆ रामाचं नाम… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆
कोणीही भेटलं की तो “श्रीराम” म्हणायचा. सोसायटीच्या वॉचमनपासून कंपनीच्या मालकापर्यंत सगळ्यांनाच हे ठाऊक होतं, आणि आताशा तर तो दिसला की आपसूकच तेही त्याच्या निमित्ताने रामनाम घेत असत. साधना वगैरे नाही, पण रोज एक माळ रामनाम तो घ्यायचा. त्याच्या मित्राला काही हे आवडायचं नाही, पटायचं नाही. “का करायचं असं ? याने तुला काय फायदा होतो ? तू हे कशासाठी करतोस ?” वगैरे प्रश्नांची तो मित्र याच्यावर सरबत्ती करायचा.
तो एरवी त्या मित्राच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायचा, हसून सोडून द्यायचा. पण एके दिवशी मित्र खनपटीलाच बसला, “तुला काय मिळतं हे सारखं राम राम करून ? तुला काय तो राम दर्शन देतो का असं केल्याने ?”
“काही मिळण्यासाठी कशाला रामाचं नाव घ्यायचं ?” तो शांतपणे म्हणाला. “आणि दर्शन होण्याचंच म्हणशील तर अजून काही ते दर्शन झालं नाही, हे खरंच आहे. पण ते राहू दे. सुट्ट्यांमध्ये फिरायला जायचं आहे. कुठे जाऊ ? मदुराई छान आहे का रे ?”
हा एकदम पर्यटनात कुठे घुसला, मित्राला बोध झाला नाही. पण मदुराई छान आहे हे त्याने ऐकलं होतं, त्यामुळे त्याने उत्साहाने या ठिकाणाला अनुमोदन दिलं.
“गाडी घेऊनच जाईन म्हणतो. Long drive पण होईल. पण जायचं कसं ? रस्ता तर माहित नाहीये.”
“कसा रे तू असा भोटम् ? गुगल मॅप आहे की तुझ्या फोनमध्ये. ती बाई सांगेल तसा जात जा की.” मित्र कीव करत म्हणाला.
“तू गेला आहेस का रे मदुराईला ?” त्याची पृच्छा.
“नाही बुवा. मला तो आपला हा म्हणाला होता – छान आहे मदुराई – म्हणून मी तुला सांगितलं.” मित्राची कबूली.
“एक्झॅक्टली. तू मदुराईला गेलेला नाहीस, पण तो अमका अमका गेला आहे, त्याने तुला सांगितलं, म्हणून त्याच्या अनुभवावर विश्वास ठेवून तू ते मला सांगितलंस. तुला मदुराईचा रस्ता ठाऊक नाही, पण ज्या गुगल मॅपने हजारो जणांना योग्य मार्ग दाखवला त्या गुगल मॅपवर तुला विश्वास आहे. मलाही प्रत्यक्ष देव दिसला नाही, पण आमच्या गुरूंना नक्की देव दिसला आहे, त्यांनी सांगितलं आहे – ज्या गुरू परंपरेनं हजारो लाखोंना मार्गदर्शन केलं, त्या गुरू परंपरेने छातीठोकपणे सांगितलं आहे – नामस्मरण करा, तुम्हाला देवदर्शन होईल. विश्वास ठेवायला एवढं कारण पुरेसं आहे, नाही का ?”
या युक्तीवादाची यथार्थता पटल्याने मित्र निरुत्तर झाला. पण तरी त्याला अजून प्रश्न होतेच.
“अरे, पण तू असे किती दिवस अजून राम राम करत राहणार ? इतकी वर्षे झाली तरी तुला जे हवंय ते अजून का मिळालं नाही ? आणि इतकी वर्षे झाली, तरी अजून फक्त राम राम वरच गाडी अडकली आहे तुझी ? इतकी वर्षं झाल्यावर काही वेगळं, काही नवीन, काही आणखी advanced करावं, असं नाही वाटत ? आणि तुला जर माहितीच नाही, तुला नक्की काय हवंय ते तर मग तुला समजणार तरी कसं की तुला जे हवंय ते तुला मिळालं म्हणून?” तो मित्र काही पिच्छा सोडत नव्हता. त्याची टकळी थांबतच नाही म्हटल्यावर त्याच्या सगळ्याच प्रश्नांची फायनल उत्तरं द्यायला त्याने सुरुवात केली.
“तुला पुष्कर लेले माहित आहे ना ? शास्त्रीय संगीत – नाट्यसंगीत गायक ? ऑलरेडी त्यांचं बऱ्यापैकी नाव झाल्यानंतर, सवाई गंधर्व यांच्या गायकीचे बारकावे शिकण्यासाठी ते पुन्हा एका गुरूंकडे गेले – बहुतेक पंडित सत्यशील देशपांडे यांच्याकडे. तर नवीन काही शिकवण्याऐवजी, गुरुजींनी या ख्यातनाम गायकाला पुनश्च हरि ओम म्हणत, मूलभूत षड्ज लावायचा अभ्यास करायला सांगितलं. पुष्कर आश्चर्यचकित झाले. त्यांच्यासारख्या प्रथितयश गायकाला परत “सा” लावायला शिकायला सांगणं म्हणजे चार्टर्ड अकाऊंटंटला पहिल्यापासून बेरजा वजाबाक्या शिकायला सांगण्यासारखं होतं. पण गुरूंवर श्रद्धा ठेवून त्यांनी तो अभ्यास करायला सुरुवात केली. रोजचा रियाझ संपला की ते प्रश्नार्थक मुद्रेने गुरूंकडे पहायचे – काही सल्ला, सूचना किंवा कदाचित कौतुक ऐकू येईल या अपेक्षेने – पण दर वेळी गुरू स्थितप्रज्ञतेने सांगत – अभ्यास चालू ठेवा.
तीन चार महिने असेच निघून गेले, आणि एक दिवस तो “सा” लागला – सापडला. गुरूंनी काही सांगायची गरजच लागली नाही. तो अनुभव, ती अनुभूती पुष्करना मिळाली – जाणवली. ते शहारले. त्यांनी गुरूंकडे पाहिले. मंद हसत गुरूंनी सांगितले – “ये बात ! अब इस षड्जको पकड कर रख्खो.
त्यामुळे जे मिळायला हवे आहे, ते मिळालं आपसूकच कळेल. कोणी काही वेगळं सांगण्याची गरज नाही. आता प्रश्न राहतो की जे हवं आहे ते अजून का गवसलं नाही.
“ तुझं असं होतं का रे ? टीव्हीवर जाहिरात चालली असते – अवघ्या पाच दहा सेकंदांचा खेळ – पण आपण तल्लीन होतो, त्या जाहिरातीने हसतो वा टचकन डोळ्यात पाणी येतं. ती तल्लीनता येणं महत्त्वाचं. आपण अजून पोटतिडीकीने राम राम म्हणत नाही रे. खच्चून भूक लागल्यावर लेकरू ज्या विश्वासाने आईला पुकारते, वस्त्रहरण होताना द्रौपदी ज्या आर्ततेने कृष्णाचा धावा करते, ते अजून होत नाही. इतकी वर्षे ती आर्तता, तो विश्वास माझ्या हाकेत आणायचा प्रयत्न करतोय, एवढंच.” तो म्हणाला, त्या मित्राला राम राम घातला, आणि आपल्या कामाला निघून गेला.
© श्री मकरंद पिंपुटकर
चिंचवड
मो ८६९८०५३२१५
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈