सौ. अमृता देशपांडे
☆ मनमंजुषेतून ☆ ।। राजा पंढरीचा ।। भाग 4 ☆ सौ. अमृता देशपांडे ☆
मंदिराच्या परिसरात जाताच मला देवभूमीवर उभी असल्याचा भास झाला. नखशिखान्त आतून एक शक्ती लहर माझ्यात भिनल्यासारखे वाटले. सकाळी अकराची वेळ होती. सूर्य बराच वर आला होता. थंडीत त्याच्या उबदार किरणांची शाल अंगावर घेत दर्शनाच्या रांगेत सामील झालो. हळूहळू पुढे सरकत सरकत मंदिरात प्रवेश करते झालो. आत शिरताच दोन्ही बाजूंनी भिंतीवर विठ्ठल रखुमाई, मंदिराबद्दल माहिती, तिथे साजरे होणारे उत्सव, आषाढी कार्तिकी च्या वारीची आणि वारक-यांची माहिती, रिंगण, इंद्रायणी चे महत्व, अनेक संतांची चित्रे, अभंग, ओव्या, ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज इत्यादींची सुचवेन, असा संत- खजिना बघायला मिळाला. सर्वात शेवटी श्री ज्ञानेश्वरांचे पसायदान होते. आमच्या मागे खानदेशातून आलेल्या भक्तांचा ग्रुप होता. ते सर्व जण त्यांच्या भाषेतील विठ्ठलाचे अभंग सामुदायिक गात होते.ऐकायला खूप छान वाटत होतं, पण माझं लक्ष विठ्ठलाकडेच लागलं होतं. मूर्ती अजून किती दूर आहे हे बघत होते. पुढे चालता चालता जरासं उजवीकडे वळून समोर पहाते तो……
‘सावळे सुंदर रूप मनोहर’, मकरकुंडले ल्यालेला, कमरेवर हात ठेवून उभा होता. मुखावर मंद हास्य, अतिशय सुंदर, देखणा पंढरीचा राणा.
त्याच्या नजरेतून वहाणारे वात्सल्याचा झरा माझ्या डोळ्यात भरून आला.दृष्टी न हलवता पुढे जात होते. जवळ पोचताच भान हरखून मूर्ती बघतच राहिले. भटजी म्हणाले, आधी पायावर डोकं ठेवायचं, मुख दर्शन नंतर घ्या. मी विट्ठलाचे पाय धरून माथा टेकला.
रांगेत असल्याने पुढे सरकावेच लागते. मला तर विठ्ठलाच्या जवळून दूर व्हावेसेच वाटत नव्हतं. माहेराहून सासरी येताना प्रत्येक वेळी आई दारात दिसे पर्यंत मान मागे वळून वळून आईला बघत रहायचे आणि ती दिसेनाशी होईपर्यंत डोळे डबडबलेले असायचे. आत्ता तीच अवस्था माझी झाली. हो! ही सुद्धा विठू माऊली च ना!
परत मागे येऊन किंचित अंतरावर, मूर्ती पहाण्याची संधी मला मिळाली. बांधेसूद शरीरयष्टी, चेह-यावर सात्विक भाव, गळ्यात तुळशीहार, गुलाबी वस्र ल्यालेल्या विठोबा चं ते देखणं रूप डोळ्यात साठवून घेतलं. “राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रविशशिकळा लोपियेल्या” अशा देखणेपणातून मला त्याची आश्वासक कृपाद्रुष्टी जाणवली. जणु काही मला सांगत होता, “मी असताना तुला कसली चिंता?”
गर्दी असल्याने तिथे जास्त वेळ थांबता नाही आले. पण त्या पाच मिनिटात सगळे विचार, सगळ्या चिंता, काळज्या, काळ-वेळ, सगळ्या सगळ्याचा विसर पडला. फक्त विठू माऊली आणि मी. दुसरं काहीच नाही.
“अवघा रंग एक झाला
रंगी रंगला श्रीरंग
मी तू पण गेले वाया
पहाता पंढरीचा राया”
अगदी अशीच मी एकरूप झाले. आयुष्यात पहिल्यांदाच मन इतकं शांत झालं. ही सुखद अनुभूती मी प्रथमच घेत होते.
क्रमशः …
© सौ अमृता देशपांडे
पर्वरी- गोवा
9822176170
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈