सुश्री प्रभा सोनवणे

??

☆ शाळेतील हुशार “पंचकन्या” ☆ सुश्री प्रभा सोनावणे 

मी १९७३ ला अकरावी पास झाले, या वर्षी आम्ही एस.एस.सी.होऊन पन्नास वर्षे होत आहेत म्हणून शाळेत गेटटुगेदर करायचं ठरवतोय ! त्या निमित्ताने चार तुकड्यातील मिळून १७३ विद्यार्थी /विद्यार्थिनींची यादी शाळेत मिळाली ! त्यातील आम्ही पन्नासजण आधीच एका what’s app group वर २०१५ पासून एकत्र  आहोत ! आम्ही विद्याधाम प्रशाला -शिरूर जि.पुणे चे विद्यार्थी !

आत्ता या १७३ पैकी सुमारे शंभरजण एका what’s app group वर एकत्र आलोय ! मुलांपैकी  सुभाष जैन, डॉ. मारूती ढवळे, ऍडव्होकेट ओमप्रकाश सतिजा हे शालांत परीक्षेत अनुक्रमे पहिले ,दुसरे, तिसरे आलेले ! बँकेत ऑफिसर–नंतर वकिली आणि इतर स्वतंत्र व्यवसाय ! दुसरा एम.बी.बी.एस.डॉक्टर , तिसरा वकील आणि इतरही स्वतःची स्वतंत्र ओळख असणारे तिघे !`

आज मी लिहिणार आहे ते आमच्या बॅचच्या हुशार मुलींबद्दल ! त्या अकरावी अ मधल्या… माधुरी तिळवणकर, निर्मला गुंदेचा, शारदा मुसळे, शशी जोशी आणि फैमिदा शेख, या मुळातच हुशार,बुद्धिमान मुलींबद्दल !

वरील  पंचकन्याही हुशार विद्यार्थिनी म्हणून प्रसिद्ध असलेल्या ! माधुरी तिळवणकर ही नेहमीच गणितात शंभर पैकी शंभर मार्कस् मिळविणारी म्हणून माझ्या लक्षात राहिलेली ! निर्मला गुंदेचा पण खूप हुशार,या दोघींचा नेहमीच आमच्या अ तुकडीत पहिला दुसरा नंबर असायचा. चढाओढ या दोघींच्यातच पण त्या अगदी सख्ख्या मैत्रीणी, आजही त्यांची मैत्री टिकून आहे ! निर्मल अहमदनगरला असते ! माधुरी पुण्यात.  एस.पी.काॅलेजमधून ग्रॅज्युएट झाल्यावर लगेचच तिला सरकारी नोकरी लागली ! खरंतर ती आयएएस वगैरे होण्याच्या गुणवत्तेची. पण लग्नानंतर पतीच्या सांगण्यावरून नोकरी सोडली !

आत्ता माधुरी स्वतःबद्दल म्हणते – ” शाळेत  बरी होते.  पण.घरासाठी  सरकारी नोकरी  सोडली. नंतर आयुष्य  बरे गेले पण फारसे यश मिळाले नाही. हा आपल्या  नशिबाचा भागआहे ..जीवनात  समस्याना तोंड  देत जगावे लागते. आयुष्यात नियोजन  कमी पडले, त्यात आजारपणाचे कारण झाले.असो…..” 

इतकी विनयशीलता पाहून मन भरून आलं म्हटलं, ” माधुरी तू शाळेत बरी नाही उत्कृष्ट होतीस !”

आमच्या प्रगती पुस्तकावर “बरा” तर तिच्या प्रगतिपुस्तकावर “उत्कृष्ट” शेरा असायचा  

निर्मल गुंदेचाचंही लवकरच लग्न झालं पण तिने लग्नानंतर बी.काॅम. एम.काॅम. केले. टेलिफोन एक्सचेंजमधे नोकरी केली, आता सेवानिवृत्त ! शशी आणि शारदा या सुद्धा क तुकडीतल्या हुशार,  स्कॉलरशिप मिळविणा-या ! अकरावीत अ तुकडीत गेलेल्या ! अकरावी अ मध्ये “फिजिक्स केमिस्ट्री” हा विषय घेणारे सगळेच हुशार विद्यार्थी ! या पंचकन्या अकरावीत अ तुकडीत असलेल्या ! दहावी पर्यंत अ तुकडीत असणारी मी अकरावीत अ तुकडीत नव्हते ! आम्ही “शरीरशास्त्र आरोग्यशास्त्र” वाले सामान्य विद्यार्थी!

शशी बी.काॅम. झाली.  तिनं तिचा चित्रकलेचा छंद जोपासला आहे. तिच्या पेंटिग्जची प्रदर्शने भरत असतात ! शारदा एम.काॅम. झाली. लग्नानंतर मुंबईत असते ! फैमिदा शेख उर्दू शाळेतून विद्याधाममधे आलेली ! आठवीत असताना ती संस्कृतमधे पहिली आलेली, इंग्लिश/ गणितही चांगलं ! हिंदीच्या सरांना आडलेला ” परहेज” या शब्दाचा अर्थ तिने वर्गात स्पष्ट करून सांगितला होता ! “पथ्य” !

ती परवा म्हणाली “मला टीचर व्हायचं होतं…!” मी तिला म्हणाले,.. ” होय, पण तुझ्या वडिलांनी तुला Rich & Handsome नवरा बघून दिला ” …अकरावी नंतर लगेचच तिचं लग्न झालं ! काही वर्षे ती आबुधाबीला होती,आता मुंबईत आहे !

या पाच मैत्रीणींनी सुखाचे संसार केले ! त्या आदर्श गृहिणी, आदर्श माता आहेत ! पन्नास वर्षानंतर एकमेकींना नव्याने जाणून घेताना हे विशेष जाणवलं की हुशार मुलींच्या बाबतीतही…शिक्षण..करियर पेक्षा लग्नालाच अधिक महत्त्व दिलं जात होतं आमच्या काळात !

माधुरी एकदा मला म्हणाली होती, “राणी तू मराठीची प्राध्यापक झाली असतीस”! तिच्यासारख्या हुशार मुलीकडून असं काही ऐकून मी भरून पावले होते ! मी कधीच हुशार किंवा अभ्यासू नव्हते, अकरावी नंतर लगेचच माझंही  लग्न होईल असं मला वाटत होतं, कारण नववीत असल्यापासून मला “स्थळं” येत होती ! मी अजिबातच महत्वाकांक्षी नव्हते/ नाही. तरीही कुठल्या प्रेरणेतून मी पुणे विद्यापीठाच्या मास्टर डिग्रीपर्यत पोहचले माझं मलाच कळत नाही ! असो…..

आमच्या बॅचच्या या हुशार मुलींचं हे कौतुक आणि अभिनंदनही ! या पाचही जणी शाळेत असताना दिसायच्याही छान ! आजही छान दिसतात ! सलाम तुम्हाला पंचकन्यानो !

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
3 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Prabha Sonawane

Thanks 😊