श्री सुहास रघुनाथ पंडित
मनमंजुषेतून
☆ ती ‘गुलाबी’ नोट !… लेखक – श्री रवी वालेकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
काल ICICI मध्ये पैसे काढायला गेले होतो. फार नाही पण बऱ्यापैकी गर्दी होती. पैसे जमा करायला आणि काढायला अशा दोन वेगवेगळ्या रांगा होत्या. सगळ्यांनाच लगीनघाई ! २०-२२ वर्षांच्या दोन-तीन चुणचुणीत मुली हा सगळा पसारा हसतमुखाने सांभाळत होत्या. रांगेत मोदी हा एक आणि मागच्या आठवड्यात पैसे नसल्याने झालेली तारांबळ हा दुसरा, हेच विषय सगळे चघळत होते. गुलाबी नोटेवरून हमखास होणारे विनोद होतेच. एकंदरीत झकास चालले होते.
सत्तरीच्या आत बाहेर असणारे ५-६ जण घाबरतच आत आले. बँकांमध्ये असणाऱ्या गर्दीविषयी टीव्हीवर येणाऱ्या बातम्या बघून धास्तावलेले असावेत (बहुतेक NDTV जास्तच बघतं असावेत !).
ह्या नव्या बँका त्यांच्या त्या भव्यतेने, इंटिरियरने अगोदरच कोणालाही बिचकाउन सोडतात. त्यात ते मधाळ इंग्रजीतले अगत्य ! जुन्या बँका कशा ‘आपल्या’ वाटायच्या ! टेबलाटेबलांच्या गर्दीतुन आपला-आपला ‘साहेब’ हुडकायचा आणि डायरेक्ट काम सांगायचं ! नमस्कार करायचीही गरज नसायची. एकदम घरगुती वातावरण अन् रोखठोक बोलणे !
‘ ऊद्या या ‘
‘ ह्याच नोटा मिळतील ‘
‘आम्ही काय गोट्या खेळतोय का? ‘
‘ घरी नाही छापत आम्ही ‘
‘ जा,हो, कमिशनरला जाऊन सांगा, असले छप्पन पायलेत ‘
— असा कसा स्वच्छ, आरस्पानी कारभार ! या नव्या बँका एखाद्या पंचतारांकित हॉटेलसारखेच नव्या पिढीलाही दबकुन वागायला लावतात, तिथे जुन्या पिढीचं काय !
मी लांबून त्या सगळ्या ग्रुपकडे बघत होतो. एकमेकांत चर्चा करून त्यांच्यातल्या एकाने धीर करून फॉर्म भरत असलेल्या एकाला काही विचारले, त्यानेही त्याचे हातातले काम थांबवून त्यांना एक फॉर्म आणून दिला. त्या फॉर्मचे सामुदायिक वाचन झाल्यावर ग्रूपमध्ये पुन्हा चर्चा झडली. मी अंदाज बांधला की या प्रत्येकाचे काम वेगवेगळे असावे. कोणाला पैसे भरायचे होते, कोणास नोटा बदलून हव्या होत्या, तर कोणाला पैसे काढायचे असावे. त्यांच्यातला जीन्स- टी शर्ट घातलेला एकजण धीटपणे सर्वांना सांभाळत होता. ( हे काका बहुधा बँकेतूनच रिटायर झालेले असावे ) तरीपण त्यांच्याही चेह-यावरचा गोंधळ काही लपत नव्हता ! सिनीयर सिटिझन्ससाठी वेगळी रांग असावी, अशा अंदाजाने आलेले ते, रंगीबेरंगी हाफपँटी न घालणाऱ्यांची तिसरी रांग चष्म्याआडून शोधत होते आणि ती काही सापडत नव्हती !
लोक येतच होते, रांग वाढतच होती. त्याचवेळी अजून २-३ वरिष्ठ नागरीक बँकेत आले ! पहिल्या ग्रूपमधल्या दोन चतुर काकांनी लगेच एका रांगेत उभे राहून घेतले ! (फॉर्मचं काय ते नंतर बघू, नंबर तर लाऊन ठेऊ !)
गर्दी वाढलेली बघून, काचेच्या केबिनमधून ब्रँच मॅनजेर बाहेर आल्या. त्या सुद्धा पंचविशीच्या आत बाहेर ! (या नव्या बँका तिशीतच VRS देतात का?) त्या गेल्या त्या डायरेक्ट या ग्रुपकडे ! २ मिनीटे बोलल्या असतील नसतील, सारी सिनीयर मंडळी निवांत सोफ्यावर बसली ! त्या ब्रँच मँनेजरने हाक मारून स्टाफमधल्या एका मुलीला बोलावले. ती आली. एकदम उत्साही आणि तरतरीत ! (या नव्या बँका बायोडेटात ‘चुणचुणीत’ आणि ‘तरतरीत’ हे शब्द असतील, तरच नोकऱ्या देत असावेत !)
त्या विशीतल्या पोरीने तिथेच त्यांच्या बरोेबर सोफ्यावरच बसुन कोणाला फॉर्म देे, कोणाला चेक लिहून दे, कोणाची आयडी प्रूफवर सही घे, पेईंग स्लिप चेक कर असा झपाटा लावला ! एवढच नाही, मध्ये उठून ती खुद्द ‘रोकड’ सुद्धा या काका लोकांना सोफ्यावरच हातात आणून देत होती, कोणाच्या नोटा बदलून आणत होती !
१५ ते वीस मिनीटात तिने सगळ्या कामाचा फडशा पाडला ! सारे अवाक होऊन बघत राहिले !
१५-२० मिनीटात सगळ्या वरिष्ठांना वाटी लाऊन,जवळ जवळ २-४ लाखांची ऊलाढाल करून, २-४ कोटींचे पुण्य कमवून, ती कन्यका आपल्या स्वत:च्या जागेवर जाऊन कामाला भिडलीसुद्धा !.. रांगेतल्या कनिष्ठांचे माहित नाही, पण आम्ही (ना कनिष्ठ ना वरिष्ठ असे मधल्यामधले ) आदराने तिच्याकडे आणि असूयेने वरिष्ठांकडे बघतच राहिलो!
माझा नंबर आला, नोटा मिळाल्या. नवी दोन हजाराची नोट पहिल्यांदाच हातात आली होती ! नोट अपेक्षेपेक्षा छोटी होती, आणि खरं सांगू? खोटी वाटतं होती ! पण काहीही असो, पाकिटात व्यवस्थित बसली. छान वाटले ! पूर्वीची हजाराची नोट उनाडपणे पाकिटाबाहेर डोकवायची. ही नवी नोट निव्वळ दिसायलाच देखणी नव्हती, तर घरंदाज- शालिनही होती, तरतरीतही होती !
मला एकदमं त्या ओरीजनल ‘तरतरीत’ मुलीला भेटावसं वाटलं.
‘स्सर?’ मोठ्ठे डोळे माझ्यावर रोखत तिने प्रश्नार्थक चेहरा केला. तिटकारा किंवा तुसडेपणाचा भावही त्या निर्मळ चेहऱ्यावर नव्हता ! मी तिला वरिष्ठांसाठी तिने जे केलं आणि जी धावपळ केली, ते सगळ्यांना कसे आवडले, ते सांगितले. (आणि हो, थोडेसे अस्पष्ट असे आभार ही मानले !)
‘अरे स्सरं! सालभर थोडी ऐसा करना पडता है? ये तो बस, हप्ता दस दिन की बात है ! और ऐसे समय पर सबको मदद करना अच्छा लगता है !’
घरी येईपर्यंत तिचे ते ‘अच्छा लगता है ‘ कानात, मनात घुमत होतं !
मोदीजींनी भारताची सर्वात जास्त किंमतीची नोट ‘गुलाबी’ का बनवली, याचा लख्ख उलगडा झाला !
या नव्या पिढीने आणि या असल्या ‘अच्छा लगता है!’ म्हणण्याऱ्या मुलीनेच त्यांना २०००ची नोट ‘Pink’ बनवायला भाग पाडले असणार !
जगलो-वाचलो तर एक दिवस मी पण ‘सिनीयर सिटिझन’ होईन, पण तेव्हा सुद्धा जेव्हा-जेव्हा दोन हजाराची नोट बघेन तेव्हा-तेव्हा हे ‘अच्छा लगता है’ आठवेल आणि मी माझ्या नातवांना विचारेन, ‘ ही नोट ‘गुलाबी’च का आहे, माहितीये?
लेखक : रवि वाळेकर
(ही नोट कधीकाळी रद्द होईल, असे हा लेख लिहिताना वाटलेही नव्हते!)
संग्राहक : सुहास रघुनाथ पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈