सौ. अमृता देशपांडे
☆ मनमंजुषेतून ☆ ।। राजा पंढरीचा ।। भाग 5 ☆ सौ. अमृता देशपांडे ☆
वारक-यांची पावले आषाढ आला की संसारातून बाहेर पडून पंढरीची वाट का चालू लागतात, ते कळलं.’ ग्यानबा तुकाराम च्या तालावर चालत विठुरायाच्या पायावर माथा टेकण्याचा आनंद आणि सुख काय असतं ते कळलं. किती भाग्यवान ते वारकरी…..
विठ्ठल दर्शनानंतर रखुमाई कडे गेलो.
श्रीराम-सीता, श्री शंकर- पार्वती, श्री विष्णू -लक्ष्मी, आणि विठ्ठल-रखुमाई ही चार देव- दांपत्ये. रामसीता म्हटलं की सतत रामाबरोबर असणारी सीता, शंकर पार्वती कैलासावर बसलेले, विष्णू शेषशायी आणि लक्ष्मी त्यांचे पायाशी असे द्रुष्य समोर येते. विठ्ठल रखुमाई हे जोडपं आपल्यातलं वाटतं. सा-या जगाचा संसार समर्थ पणे सांभाळणारा विठ्ठल आणि सगळे भक्त “विठ्ठला, पांडुरंगा” म्हणत त्यांनाच आळवतात, म्हणून जणु रुसून दुसरीकडे जाऊन आपणही कमरेवर हात ठेऊन उभी असलेली रखुमाई. घराघरातल्या गृहस्थ- गृहिणी सारखे विठ्ठल रखुमाई.
दर्शनाला रखुमाई जवळ पोचले, कित्ती गोड रूप ते! अगदी विठ्ठलाला साजेसे.
विठ्ठलाच्या उंचपु-या मूर्ती समोर ही गोड गोजिरी रखुमाईची अतिशय लोभसवाणी मूर्ती. जगत्जेठी आणि जगतजननी. पिवळा शेवंतीचा हार तिच्या हिरव्यागार शालूवर छान शोभत होता. काळीशार तेजस्वी मूर्ती, नाकात नथ, कर्णफुले, आणि कपाळी मळवट. हेच ते दैवी, अलौकिक सौंदर्य. अनिमिषतेने बघतच रहावे अशी रखुमाई. नमस्कार केला आणि भारावलेल्या मनाने बाहेर आले.
बाहेर दुकाने गजबजलेली होती. पण विठूमाऊलीच्या दर्शनापुढे मला बाकी सगळे गौण वाटत होतं. अतिशय शांत मनाने आणि जड अंतःकरणाने तिथून निघालो.
40 वर्षांपूर्वी ची दर्शनाची इच्छा पूर्ण झाली. किती आभार मानावेत विठूरायाचे!
आभार तर मी मित्र मैत्रिणींचे मानते, ज्यांनी मला त्यांच्या बरोबर सामील होण्याची संधी दिली. मी शतशः त्यांची ऋणी आहे. त्यांच्यामुळेच हा ” सोनियाचा दिनु ” मला दिसला. नकळत मनात अभंगांचे स्वर रुंजी घालू लागले.
“जातो माघारी पंढरी नाथा
तुझे दर्शन झाले आता ।।
तुझ्या नादाने पाहिली
ही तुझीच रे पंढरी
धन्य झालो आम्ही जन्माचे
नाव घेऊ तुझे आवडीने ।।
दिपविली तुझी पंढरी चालू झाली भक्तांची वारी ।
तुका म्हणे भक्ती करा सोपी
जाती पापे जन्माची पळूनी ।।
।। समाप्त ।।
© सौ अमृता देशपांडे
पर्वरी- गोवा
9822176170
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈