सुश्री वर्षा बालगोपाल 

? मनमंजुषेतून ?

☆ श्रीमंत  पदर… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

आपल्या संस्कृतीत सोळा श्रृंगार सांगितले आहेत, त्यातील एक साडी परिधान करणे हा आहे. मग साडी म्हटलं की ओघाने पदर येणारच•••

पण राज्य बदलले की साडी तीच रहाते पण पदर घ्यायची पद्धत बदलते. कोणी डाव्या खांद्यावर घेतो कोणी उजव्या खांद्यावरून पुढे घेतो, कोणी त्याला चावीचा गुच्छा बांधून दुसर्‍या खांद्याच्या मागे सोडतो कोणी डोक्यावर घेतो कोणी दोन खांद्यावर कोणी डोक्याच्याही पुढे चेहर्‍यापर्यंत ओढतात तर कोकणी स्त्रिया चक्क कमरेला गुंडाळतात. कसेही कोणत्याही प्रकारचे पदर घेतलेले हे स्त्रीचे रूप नेहमीच मनाला मोहवित आले आहे. 

पण या पदराची किमया त्याच्यापुढे लावलेल्या क्रियापदामुळे कृष्णलीला वाटतात. या पदराच्या लीला काही पाहिलेल्या काही अनुभवलेल्या काही ऐकलेल्या एकत्र वाचायला नक्कीच मजा येईल.

दिवाळीच्या खरेदीसाठी गेलेली उषा आईला म्हणाली आई हीच साडी तू घे. अगं पदर बघ किती छान आहे . युनिक आहे युनिक. 

नुकताच पदर आलेल्या म्हणजे पदरेकरीण झालेल्या आपल्या लेकीचं ज्ञान पदरात पडलं आणि तीच साडी आईने घेतली. 

जरी पदरेकरीण झाली असली तरी आईचा पदर धरून चालणे तिची सवयच होती. आईने पदर खोचून दिवाळीची सफाई केली.

दिवाळीच्या वेळेस आईने लक्ष्मी पुढे पदर पसरला म्हटली सगळ्या चुका पदरात घे आणि सगळ्यांचे सुख आरोग्य पदरात टाक गं आई. माझ्या पदरी निराशा नको येऊ देऊ.

आईचा जरतारी पदर भरून पावला होता जणू. पदरात मावेल एवढे दान मिळाल्याचा भास तिला झाला होता पण पदरात न मावेल एवढा आनंद उत्साह चेहर्‍यावरून ओसंडत होता.

त्याच उत्साहात दिवाळी संपली आणि आई उषाला म्हणाली आता पोरी तू मोठी झालीस. आता आईच्या पदरामागे लपणे, आईच्या पदराला तोंड पुसणे, शेंबुड पुसणे असे करायचे नाही. आता आपल्या पदराला आपणच जपायचे . पदर ढळू देऊ नकोस. पण जर कोणी पदराला हात घालू पाहील त्याला पदर झटकून वठणीवर आणायचे आणि मानानं पदर डोईवर घ्यायचा .  

हे काही पदरचं सांगत नाही. अगं समाजाची रीत आहे ही. 

आईच्या संस्कारामुळे उषाच्या जीवनाला पदर लाभत होते.एक एक पदर छान सुटून येत होते. दोघींचाही पदर फाटका नाहीये हे समजत होते.

स्वाभिमानाची शिकवण देताना आई म्हटली अंगी असेल ते काम अन् पदरी पडेल तो दाम करण्याची तयारी हवी. अगं पोरी पदरचे खावे पण नजरचे खाऊ नये.  नेहमी पदरचे खावे अन चौघात जावे उषा अजून मोठी झाली. तिच्यावर प्रेम करणारा तिच्या आयुष्यात आला आणि ती नकळत पदराशी चाळे करू लागली.आईच्या नजरेतून हे सुटले नाही. आई म्हटली आता त्याची तुझ्या पदराशी गाठ बांधली की होईल बाई जबाबदारीतून सुटका. जरा पदर फडकायला मोकळा होईल. 

तू तुझ्या मनाने त्याला निवडलं आहेस तर छान पदर अंथरून स्वागत कर त्याचं. त्याचे काही चुकले तरी शक्य तेवढे सावरून घेत ‘ पदरी पडलं अन पवित्र झालं ‘ म्हणायचं . एकमेकांचे होऊन रहाताना पदरी पडली झोड हसून केली गोड  म्हणत गुण्यागोविंदाने रहायचे.

आईचे  पाठ , शिकवण यातुन सुसंस्काराने न्हाऊन उषाच्या पदराशी त्याची गाठ पडली एकदाची. आयुष्याचा हा पदरही चांगला असल्याने ती कधी पदराची चवरी करून त्याची रिद्धी तर कधी पदराने वारा घालून त्याची सिद्धी होत होती. जरी सुखवस्तु कुटुंबात पडली असली तरी पदरपेशी होऊन जगणं तिला जमतच नव्हते तिला समजून घेणारा तिच्या पदरचा माणूस ; तिचा नवरा तिला काही कमी पडू देत नव्हता म्हणून गरजूंना ती पदरमोड करून मदत करत होती. चांगल्या मनाने केले तर पदरास खार पडणार नाही हे तिला माहित होते. पदर खर्च करून जणू स्वत:च्याच पदरात पुण्याचे माप घालत होती. 

त्यामुळे पदर गमावण्याचा प्रश्न नव्हताच. ती क्षम्य चुकांवर हसत पदर घालत होती. आईने सांगितल्या प्रमाणे पदर सावरत “ पदरचे द्यावे मग सांगावे “ या धोरणाने मदत करत जीवन जगत होती. सासरच्या कुत्र्याला सुद्धा अहो म्हणायचे या संस्कारातून ती कधीच एक पदरावर येत नव्हती. शिवाय आपला पदरही पाडत नव्हती. त्यामुळे नियतीच  पदरचं घालायला तिच्यापुढे ठेपली तेव्हा दैव आले द्यायला अन पदर नाही घ्यायला अशी तिची गत झाली नाही.  तोंडाला पदर आणि गावाला गजर तिच्या बाबतीत घडले नाही. कायम पदराची शुद्ध जपत पदरास खाच न पाडता ती समाधानाने रहात होती. म्हणूनच उषाच्या जीवनात सुवर्णपहाट येण्याची चाहूल तिला लागली होती. ती आई होणार होती. सातव्या महिन्यात ओटी पदरात भरून ती आईकडे बाळंतपणासाठी आली होती.  

आता ती सुखरूप प्रसूत झाली होती आणि चिमुकले बाळ तिचा पदर ओढत होते आणि त्या कान्ह्याला पदराखाली घेताना तिला पदराची महती समजली होती आणि असा श्रीमंत पदर लाभण्याचे भाग्य आपल्या पदरी आहे या जणिवेने तिच्या डोळ्याचे पदर ओलावले. 

जीवनाच्या चिरोट्याचा एक नाजूक पदर खुलला होता तो हृदयाच्या एका पदरात तिने लपेटून घेतला होता.

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments