डॉ. ज्योती गोडबोले
☆ ।। एक होती राणी ।। ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆
मला माणसांशी बोलायला, त्यांच्याशी संवाद साधायला फार आवडतं आणि खरं सांगायचं तर ते जमतंही पटकन ! माणसं मनातल्या गाठी माझ्याजवळ उकलतात हे मात्र खरं. त्यादिवशी दवाखान्यात नुसतीच बसले होते. मनात दुसरेच विचार घोळत होते. इतक्यात एक बाई दवाखान्यात शिरली. मी नीट बघितलं तर ती एक तृतीयपंथी व्यक्ती होती.
“ दीदी,आप मुझे दवाई दोगी क्या? पेटमें बहुत दर्द हो रहा है “. ती कळवळून सांगत होती. मी तिला टेबलवर घेतले आणि नेहमीप्रमाणे तपासले. ‘ माझ्याजवळच्या गोळ्या लगेच घ्या ‘असं सांगितलं आणि घरी घ्यायला दोन दिवसाचं औषधही दिलं. पाण्याचा ग्लास पुढं केला आणि ‘ गोळ्या घ्या ‘ असं म्हटलं. तिने त्या गोळ्या घेतल्या आणि मी म्हटलं,” थोडा वेळ बसा इथं खुर्चीवर.अर्ध्या तासानंतर जा.बघूया किती कमी होतं ते हं.” मी तिला बसवलं आणि वाचनात गुंगून गेले.अर्धा तास सहज झाला. ती संकोचून म्हणाली, “दीदी मला खूप बरं वाटायला लागलंय. खूप थांबलंय पोट दुखायचं. थँक्स दीदी “.ती स्वच्छ मराठीत माझ्याशी बोलत होती. “अहो,तुमचं नाव काय? कुठं रहाता? ” – “ दीदी, इथंच तर रहाते मी ! तुम्ही रोज स्कूटरवरून त्या शॉर्टकटने येता ना, मी रोज बघते तुम्हाला. आज खूप त्रास व्हायला लागला ना, म्हणून तुमची आठवण आली. नाहीतर कोणी डॉक्टर आम्हाला तपासायला तयार होत नाहीत. तुमचे खूप आभार ! “
मी म्हटले “ नाव काय म्हणालात तुमचं? ”
“ राणी “ किती सुंदर होती राणी . नीट बघितल्याशिवाय समजणारही नाही हिच्यात असं काही कमी आहे.
“ दीदी,किती पैसे झाले? “
मी म्हटलं “ राहू द्या हो !मग बघू.”
” असं नको !आहेत माझ्याकडे.” ती संकोचून म्हणाली.
मी म्हटलं, “ पुढच्या वेळी द्या नक्की. आज राहू दे. “
राणी खुशीनं हसली .तिचे अगदी एक ओळीत असलेले पांढरेशुभ्र दात चमकले. हळूहळू राणी माझी नेहमीची पेशन्ट झाली. माझ्या दवाखान्यात बाकावर बसलेल्या इतर पेशन्टनाही तिची सवय झाली होती. किती अदबशीर वागणं होतं तिचं ! आपला नंबर येईपर्यंत ती टेबलावर ठेवलेली मासिकं वाचायची. माझ्या चौकस स्वभावानुसार मी हळूहळू तिची माहिती विचारायला लागले.
राणीचं कुटुंब पुण्यातलंच ! मी जिथून शॉर्टकटने येते त्या वस्तीत तिची आई भाऊ त्याची बायका मुले सगळे एकत्रच रहातात. राणीचा भाऊ सिक्युरिटी गार्ड आहे. भावजय एका मॉलमध्ये नोकरी करते. राणी खरं तर एस.एस.सी.झालीय, पण आपल्या इथले दुर्दैव ! तिला कुठेही नोकरी मिळाली नाही. पण राणी फार उत्तम शिवण शिवते. तिच्याकडे वस्तीतल्या सगळ्या बायका कपडे शिवायला टाकतात. निरनिराळे फॅशनेबल ब्लाउज राणी इतके सुंदर शिवते की बस. वस्तीतल्या बायका तिच्याशी अगदी मैत्रिणीसारख्या वागतात.
सहज एकदा तिला विचारलं, “ किती ग मिळतात महिन्याला पैसे?”
” मिळतात की सहज दहा हजार रुपये ! “ ती म्हणाली. मी हे ऐकून गारच पडले. तशी राणी हसून म्हणाली, “ दीदी,तसं नाही. माझं शिवण बघून कॅम्पमधला एक माणूस मला शोधत आला. मला बघून म्हणाला, ‘अरे बापरे, तूच का ती राणी ?” मी म्हणाले, “ हो मीच ! नेमकं काय काम आहे तुमचं माझ्याकडे ? “ तो म्हणाला, “ तुमचं शिवण फार छान आहे. मी तुम्ही शिवलेले ब्लाउज बघितले आहेत, माझ्या एका गिऱ्हाईकाने घातलेले ! तिने तुमचा पत्ता दिला ! पण ….” आणि तो माणूस क्षणभर काहीच बोलला नाही. मग अवघडत म्हणाला .. “ पण तुम्हाला माझ्या दुकानात नोकरी नाही देऊ शकणार मी ! “ मग मीच आपणहून त्यांना म्हटलं .. “भय्या, तुम्ही मला कटिंग करून आणून द्या, मी तुम्ही सांगाल तसे देईन शिवून. माझी ऍक्टिवा गाडी आहे. मी आणून पोचवीन की दुकानावर.” मी त्यांना नमुन्याचे ब्लाउज आणि ड्रेस शिवून दिले. तो इतका खूष झाला. आता माझ्याकडे त्याचे खूप काम असते. मला सहज दहा हजार रुपये मिळतात त्याच्याकडून. दीदी, मी आता फॅशन डिझाइन मशीनही घेतली आहे मागच्या वर्षी ! “ किती अभिमानाने राणी सांगत होती.
मला राणीचं अतिशय कौतुक वाटलं. मी दवाखान्यात जातायेता राणी दिसायची. रस्त्यावरच घर होतं त्यांचं ! राणी भांडी घासताना, केर काढताना दिसायची. तिची आई, शेजारणी, गप्पा मारताना दिसायच्या. राणी बाहेर टाकलेल्या खाटेवर बसून तिच्या भाचरांचा अभ्यास घेतानाही दिसायची कधीकधी. मला मोठं कुतूहल आणि कौतुक वाटायचं या कुटुंबाचं. मी राणीच्या आईला हळूहळू बोलतं केलं. राणीच्या आई फार साध्या, अगदी गरीब स्वभावाच्या होत्या. मी बिचकतच विचारलं, “ राणीच्या आई, असं मूल झाल्यावर तुम्हाला काय वाटलं हो? राग नाही ना आला माझा? नाहीतर नका देऊ उत्तर.” — “ नाही हो बाय ! कसला राग आणि काय ! पहिला मुलगा माझा एकदम छान हो. त्याच्या पाठीवर हे बाळ झालं. आम्ही घाबरूनच गेलो असलं मूल बघून. तो डॉक्टर म्हणाला, “ देऊन टाका याला कोणत्यातरी आश्रमात. तुमचं आणि त्याचं जिणं हराम होईल बघा.” पण माझा जीव नाही झाला हो असं करायला. म्हटलं मी वाढवीन याला. कसाही असला तरी माझ्या पोटचा आहे ना हा. चार वर्षे होईपर्यंत मी मुलगा म्हणूनच वाढवला याला. पण मग मोठं झाल्यावर तो मुलाचे कपडे घालीचना. बहिणींचे फ्रॉक, स्कर्ट घालायचा. दिसायलाही किती सुंदर आहे तुम्ही बघताच की ! मग मी त्याला मुलींसारखा वाढवला. लै हाल काढलं लेकरानं शाळेत. पण झाला बघा एसएससी. पण नोकरी कोण देणार हो याला… पण देवानं बघा कशी कला ठेवली हातात. मस्त पैसे मिळवते राणी. आम्ही मोठ्या भावाचं लग्न करताना हेही सगळं आपणहूनच सांगितलं. त्या मुलीला याला भेटायला पण सांगितलं. तीही पोरगी इतकी गुणांची बघा, म्हणाली, ‘ मला आवडल्या राणीताई. मी एकत्र राहीन तुमच्या सगळ्यांबरोबरच. आणि बघा आता, आज किती वर्षे झाली, मोठ्या भावाला दोन लेकरं झाली. अजूनही आम्ही सगळे गुण्या गोविंदानं राहतोय बघा. तेवढं व्यंग सोडलं तर काय कमी आहे हो माझ्या राणीत? बायकांना मागं सारील अशी कामं करती माझी राणी. वस्तीत पण सर्वांना आवडती बघा. धावून जाती मदतीला लोकांच्या. तिचा मोठा भाऊ म्हणायचा, ‘राणीला सिग्नलला टाळ्या वाजवून पैसे मागताना नाही बघायची आपल्याला. तिला पायावर उभी करू आपण.’ कोणी चेष्टा केली तर हा धावून जायचा अंगावर. खूप केलं त्यानं राणीसाठी ! आता वस्ती धड वागती… पण आधी? जिणं हराम केलं व्हतं आम्हाला याच लोकांनी. पण राणीनं सगळं निमूट सोसलं. आपल्या गोड स्वभावानं जिंकून घेतलं लोकांना. म्हणून आज उभी आहे मानानं. भाऊ भावजयीचा भक्कम आधार आहे तिला.” राणीच्या आई सांगत होत्या. क्षणभर थांबल्या आणि आवंढा गिळत म्हणाल्या, “ काय सांगू डाक्टरबाई, पन्नासवेळा आले हिजडे, आमचं आहे हे मूल, आम्हाला देऊन टाक. तिच्या भावाने मग पोलीस कम्प्लेन्ट केल्यावर गेले बघा. खूप दिलाय त्रास त्यांनी पण हो. पण आता सगळं छान आहे. काळजी वाटतं हो की हिचं पुढचं आयुष्य कसं जाईल. पण भाऊ भावजय सांभाळतील नीट. खूप चांगले आहेत दोघे.” राणीच्या आईच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणाल्या,” असतात तुमच्यासारखी देवमाणसं पण जगात. तुम्ही नाही का, कोणत्याही चौकश्या न करता औषध दिलं त्या दिवशी ! राणी लै नाव काढती बघा तुमचं.”
त्या दिवाळीला मी माझ्या मुलींचे दोन ड्रेस राणीकडे शिवायला टाकले. राणी दवाखान्यात आली. म्हणाली, “ ताई,दोघींचे ड्रेस शिवून तयार आहेत. पण एक विचारू? मला तुमच्या घरी बोलवाल का? मला खूप आवडेल तुमच्या मुली, घर हॉस्पिटल बघायला. बोलवाल का?’ माझ्या पोटातच तुटलं. किती साधी अपेक्षा यामुलीची ! मी म्हटलं, “ अग त्यात काय ! ये की या रविवारी. मला सुट्टी असते ना तेव्हा.”
ठरल्या दिवशी राणी आपल्या आईला घेऊन ऍक्टिव्हावरून ऐटीत आली. छान साडी, माफक मेकअप. माझ्या सगळ्या नर्सेस,आया बघतच राहिल्या. मी राणीला हॉस्पिटल दाखवलं, सगळ्या स्टाफशी ओळख करून दिली. राणी वर घरात आली. माझ्या देवघरात तिने डोक्यावर पदर घेऊन देवांना नमस्कार केला. माझ्या मुलींना जवळ बोलावलं आणि म्हणाली, ‘ बघा ग पोरीनो… आवडले का मावशीनं शिवलेले ड्रेस?” त्यांनी तिला ते लगेच घालून दाखवले. काय सुरेख शिवले होते आणि किती सुंदर एम्ब्रॉयडरी केली होती राणीनं ! केवळ अप्रतिम ! माझ्या मुलींची अलाबला घेऊन म्हणाली, “ सुखात रहा ग पोरीनो. आई कसली, देवी आहे देवी तुमची आई ! माझी पण आईच आहे हो ही.” माझ्या बाईने केलेले पोहे ,लाडू आनंदानं खाल्लं दोघीनी. मी राणीला सुंदर भारी साडी आणि तिच्या आईलाही साडी दिली. डोळ्यात पाणीच आलं दोघींच्या. “ कशाला हो बाई? आमच्याशी इतकं चांगलं कुणीपन वागलं नाही हो आजपर्यंत ! तुम्ही खूप वेगळ्या आहात बाई ! देव तुम्हाला काही काही कमी नाही पडू देणार ! “ राणीच्या आईनी म्हटलं. “ अहो त्यात काय एवढं? माझ्या मैत्रिणींना नाही का मी देत? तुम्हीही नाही का माझ्या मैत्रिणी? आणि राणी लहान मैत्रीण !” राणीनं माझं हॉस्पिटल हिंडून नीट बघितलं. पाळण्यातली लहान बाळं बघितली. आमच्या नर्सेस, आयांशी गप्पा मारल्या आणि हसतमुखाने गेली सुद्धा.
सगळा स्टाफ हळहळला तिच्यासाठी ! “ बया,द्येव तरी कसा बाई अन्याय करतो हो एखाद्यावर ! किती हो गुणांची आहे तुमची राणी !” आमची सिस्टर मनापासून कळवळून म्हणाली.
याही गोष्टीला खूप वर्षे लोटली. नंतर राणीच्या भावाने ती जागा सोडली आणि ते मुंबईला गेले असं ऐकलं मी. अजूनही मला राणीची आठवण येते. कोणी तृतीयपंथी सिग्नलवर पैसे मागताना दिसला तर सांगावेसे वाटते……
…… “ अरे,त्या राणीचं उदाहरण घ्या रे ! बघा किती सन्मानाने जगतेय ती आयुष्य. देवानं एवढा अन्याय करूनही कधी तिने त्याला दोष नाही दिला.” …… अजूनही वाटतं कधीतरी ….. राणी अशीच समोर येऊन उभी राहील आणि विचारील, “ बाई, बऱ्या आहात ना? राणीला विसरला नाहीत ना?” आणि माझे डोळे माझ्याही नकळत पाणावतात राणीसाठी !
© डॉ. ज्योती गोडबोले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈