श्री संभाजी बबन गायके
मनमंजुषेतून
☆ “जीवनसे भरी तेरी आंखे !” — ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
तुझ्या डोळ्यांत पाहू जाता !
जीवनाची उत्पत्तीच पाण्यातून झाली असल्यानं पाण्याला जीवन म्हणणं तसं सयुक्तिकच ! वारि, नीर, तोय,सलिल,अंबु,उदक,जल ह्या अन्य नावांनीही तृषातृप्ती करणारं हे द्रव जेंव्हा डोळ्यांतून स्रवणा-या अश्रूंचं आवरण घेऊन वाहू लागतं तेव्हाच पाण्याचा आणि जीवनाचा अर्थ खोल आहे, याची जाणिव होऊ लागते.
तुझ्या डोळ्यांतलं पाणी म्हणजे जीवनच जणू. या जीवनाच्या ओलाव्यानेच तर तुझी नेत्रकमळं सदोदित ओली दिसतात…पापण्यांवरचे दंवबिंदु मोत्यांसारखे चमकत असतात सकाळच्या कोवळ्या उन्हांच्या तिरीपेत. माझ्या जगण्याचा डोह आता मरणासन्न आहे….तप्त सूर्य या डोहातले शेवटचे थेंब शोषून घ्यायचा कंटाळा करतोय बहुदा. त्याला काही एकच डोह शुष्क करायाचा आहे थोडाच! जगभरातले सर्व सागर,सर्व जलाशय त्याच्याच तर धाकात जगत असतात.
का जगावं असा यक्षप्रश्न सतत शिल्लक पाण्याच्या अंतरंगात ठिपकत असतो सारखा…तेव्हा जगण्याला उभारी तरी का म्हणून यावी? पण तुझे हे डोळे….जगण्याचा किनारा सोडून दूर जाऊ देत नाहीत .
सागराला तसं काय कमी आहे गं? सर्व खळाळत्या नद्या त्याच्याच तर बाहुपाशात विसावतात अखेरीस….येताना मातीला धावती आलिंगनं देत आलेल्या असल्या तरी. त्यांचे सुगंधी श्वास तर त्याच्याच अंगणात भरती-ओहोटीचा फेर धरून नाचत असतात की. किना-यावर येण्याचं नुसतं नाटक…त्यांना परत त्याच्याच कडे जायचं असतं हे काय कुणाला ठाऊक नाही होय? पण हा सागरही तुझ्या रूपाच्या रसाची आस बाळगून असतो…..म्हणूनच तर पुनवेला दोन पावलं पुढं येत असतो….न चुकता. आणि रुसून माघारीही जातो कोस दोन कोस !
तुझं रूप रंग-रेषांच्या क्षितिजावर मावत नाही, आकारांचे बांध तुझ्या रुपाला अडवून ठेऊ शकत नाही…तुझं हुबहू चित्र कोण कसं आणि कधी काढू शकेल, देव जाणे ! आणि तुझ्या वर्णनासाठीचे शब्द, त्यांना बद्ध करणारे छंद-वृत्त कवींना सुचावेत तरी कसे? तुझं रूप शब्दांना, चित्रांना कायमच अनोळखी राहून जातं…त्यांचा शोध सतत सुरू असला तरी.
काळजाला जागं ठेवणारे श्वास आणि त्याची आवर्तनं आहेस तू . तू आहेस म्हणून हृदय धडधडतं आहे त्याच्या अधीर वेगानं आणि तुझ्या रुपाच्या आवेगानं. तू म्हणजेच जगणं, तू म्हणजेच जगत राहणं…अविरतपणे.
तुझ्या श्वासांच्या सुगंधाला मधुबनाचं कोंदण लाभलंय…आणि तुझे बाहुपाश…पाश नव्हेत कमलदलेच जणू. त्यातून स्वतंत्र होण्याचा विचारही मनाला शिवत नाही. अपार पसरलेल्या नभात तुझा मुखचंद्र म्हणजे किरणांची पखरणच जणू. या किरणांच्या उजेडात जीवनाचा अंधार विलुप्त होऊन जावा ! हिरव्यागर्द हिरवळीतून तुझी पावलं एखाद्या हरिणीच्या वेगाशी लीलया स्पर्धा करतील अशी नाजूक आणि तितकीच चपळ. तू गोड गोजि-या हरिणांच्या सोबत चार पावलं जरी चाललीस तरी त्यांच्यातलीच एक दिसशील…..गोड !
आयुष्याच्या धकाधकीत काळजाला पडलेल्या चिरा तशाच राहतात…ठसठसत. या जखमांना टाके घालणं म्हणजे आणखी वेदना पदरात पाडून घेण्यासारखं…दुखणारं. पण तुझ्या पदराचा एक धागाही पुरेसा होईल हे जीवनवस्त्र पुन्हा होतं त्या रूपात पाहण्यासाठी….तुझ्या डोळ्यांतील जीवन पाहून का नाही कुणाला पुन्हा जीवनाच्या सावलीत विसावा घ्यावासा वाटणार? हे तर हवेहवेसे वाटणारे बांधलेपणच ! जोपर्यंत तुझ्या डोळ्यांतल्या जीवनाचा निर्झर खळाळत राहील…तोवर माझं आयुष्य वहात राहील…तृप्ततेच्या आभाळाखाली !
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈