सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
☆ सारे प्रवासी घडीचे !… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆
कोणताही प्रवास म्हटला की निघायचे ठिकाण नक्की असते. कुठे पोहोचायचे तेही ठरलेले असते. कसे आणि कधी निघायचे तेही ठरवलेले असते . लहानपणापासूनच मला प्रवासाची फार आवड ! वडिलांच्या बदली निमित्ताने आम्ही वेगवेगळ्या गावी गेलो. बदली झाली की आई वडिलांना टेन्शन असे. नवीन गावात जागा मिळवणे, मुलांच्या शाळा बघणे अशा अनेक गोष्टींचा विचार करावा लागे. आम्हाला मात्र या सगळ्याची गंमत वाटत असे. जसजसे मोठे होत गेलो, हायस्कूल शिक्षण संपले तशी प्रवासाचीही सवय झाली आणि त्यातील गंमत कमी होऊन जबाबदारीची जाणीव वाढू लागली !
अजूनही प्रवास म्हटला की माझी तयारी जोरात चालू असते. कुठलीही ट्रीप असो किंवा कौटुंबिक कार्यक्रम असो, प्रवासाची पूर्ण तयारी झाल्याशिवाय मला चैन पडत नाही. माझे मिस्टर तर मला कायमच चिडवतात, ‘ तुझा प्रत्येक प्रवास हा पहिलाच असल्यासारखे टेन्शन घेतेस !’ पण स्वभावाला औषध नसते
ना ! कुठेही गेले तरी प्रवासात आपली गैरसोय होऊ नये आणि दुसरीकडे गेल्यावर कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू नये, म्हणून मी जास्तीत जास्त काळजी घेत असते. पैसे, मौल्यवान वस्तू, कपडे सगळं जागच्या जागी असावं असं मला वाटतं !
आम्ही जेव्हा प्रथमच एका लांबच्या ट्रीपला गेलो त्यावेळी किती पैसे लागतील याचा अंदाज नव्हता. ह्यांच्या एका बॅंकर मित्राने आग्रह केला आणि पैशाचा प्राॅब्लेम आला तर आमच्या बॅंकेची ब्रॅच तिथे आहे, मी पैसे काढून देऊ शकतो असा दिलासा दिला. ट्रिपला निघणार होतो त्या दिवशी शनिवार होता.त्यामुळे बॅंकही बंद झाली होती. अचानकच ठरल्यामुळे आहे ते पैसे घेऊन ट्रीपला गेलो. त्यामुळे ऐन वेळी ठरलेल्या त्या ट्रीपला आम्ही उत्साहाने निघालो.
प्रत्यक्षात तिथे पोचल्यावर हाॅटेल खर्च, प्रेक्षणीय स्थळे बघण्यासाठी गाडीचे बुकिंग केले आणि मार्केटमध्ये गेलो. बंगलोरमध्ये जाऊन बंगलोर सिल्क घ्यायची नाही असं कसं होईल ! बरीच खरेदी केली..
२/४ दिवस हाॅटेलवर रहाणे, फिरणे, खाणे पिणे यांवर भरपूर पैसे खर्च केले. बॅंकवाल्या मित्राला ऐनवेळी पैसे मिळू शकले नाहीत आणि शेवटी परतीच्या तिकिटाचे पैसे जेमतेम उरले ! आणि असा तो प्रवास संपवून घरी आलो तेव्हा एक मोठा धडा शिकलो की प्रवासाला जाताना जरा जास्तच पैसे बरोबर लागतात !
असा हा पहिला पहिला मोठा प्रवास मला कायमचा स्मरणात राहिला !
आता वयाची साठी उलटली तरी यात फारसा बदल झाला आहे असं वाटत नाही. उलट विसरायला नको म्हणून आधीपासूनच तयारीला सुरुवात होते.
हा झाला व्यावहारिक जीवनातला नेहमीचा प्रवास ! पण अलीकडे मात्र मन वेगळ्याच दिशेला धावतं !
हा जीवन प्रवास केव्हा सुरू झाला? माणूस जन्माला येतो तोच आपल्या जीवन प्रवासाची सुरुवात करून !
या प्रवासाची सुरुवात आणि शेवट दोन्हीही माहिती नाही. तरीही आपण त्या जीवन प्रवाहात स्वतःला झोकून देतो. जीवनातील सुखदुःख भोगतो. जीवनाचा आनंद घेतो. वृद्धत्वाने खचून जातो, तर कधीतरी मृत्यू हा त्याचा शेवट आहे या जाणिवेने परिस्थितीला सामोरा जातो !
काही वेळा कोणाच्यातरी मृत्यूची बातमी येते .कोणी वृद्धत्वाने, तर कोणी आजाराने, तर कोणी आत्महत्येने, अकाली जीवन संपवते. असे काही ऐकले की मन नकळत मृत्यूचा विचार करू लागते.
कधी वाटते की हे मानवी आयुष्य किती छोटे, मर्यादित आहे. देवाने माणसाला विचारशक्ती, बुद्धी दिली आहे. त्या जोरावर तो निसर्गाला टक्कर देत असतो. खरंतर निसर्ग हा अनाकलनीय आहे, त्याच्याशी आपल्या बुद्धीची तुलना करणे अशक्य आहे. तरीही आधुनिक काळात माणसाने केलेली प्रगती पाहिली की अश्मयुगापासून आत्तापर्यंत केलेल्या प्रगतीने खूपच थक्क व्हायला होते. हा तर अखंड जीवन स्त्रोत आहे आणि या स्त्रोताचे आपण एक बिंदू आहोत.
त्या प्रवासाची आपल्या बुद्धीला कल्पना सुद्धा करता येणार नाही ! असंख्य विचारांचा गुंता कधी कधी मनाला अस्वस्थ करतो. निसर्गाच्या अद्वितीय श्रेष्ठ शक्तीचे एक बिंदू रूप म्हणून आपला हा जीवन प्रवास सुरू होतो. तो अधिकाधिक चांगला श्रेयस्कर करणे हेच आपल्या जीवनाचे ध्येय असले पाहिजे.
आता या प्रवासाचा शेवटचा टप्पा जगताना आपण जे चांगले करता येईल ते करावे. जगण्याचा आनंद भरभरून घ्यावा, तरच शेवटचा दिस गोड जावा असे म्हणत त्या जीवन प्रवासाचा निरोप आपल्याला घेता येईल….. शेवटी काय, सारे प्रवासी घडीचे !
© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈