सौ उज्ज्वला केळकर
☆ टिपकागद व्हावे… सौ विदुला जोगळेकर☆ सौ उज्ज्वला केळकर ☆
जाड बुडाच्या कढईत साजूक तुपातले बेसन…हलकेच रंग बदलत होते…
तुपात लपथपलेले…थुलथुलीत…उलथन्याने जरा हलवता कढयीभर गोळा होत फिरणारे…अजून किंचित भाजायला हवे आहे…पिठीसाखर पडली की बेसनाचा रंग फिका होईल…आता मात्र खमंग तांबूस रंग दिसायला लागला..तिने गँस बंद करून टाकला.आच संपताच पीठ स्थिरावले….तुपाचा चकचकीतपणा अंगाखांद्यावर लेऊन मस्त कढईभर सैलावून बसले. ‘ तूप जास्त होणार कदाचित ‘, तिच्या मनाला सराईत नजरेने सांगितले… व्याप वाढणार…तिने कोरडे पीठ भाजून घालावे या विचाराने डब्याकडे बघितले…घर म्हणून ठेवलेले जेमतेम वाटीभर पीठ होते…पिठीसाखर घातल्यावर किती आळते ते बघून ठरवू काय करायचे ते … तिने लाडवातून डोके काढून पुढच्या कामांना सुरुवात केली. तरीही मनाच्या एका कोपऱ्यात अति सैलावलेला लाडू ठाण मांडून बसलाच होता.
निवलेल्या पिठाच्या गोळ्यात पिठीसाखर घालून…ती लाडू आळण्याची वाट बघत बसली…साखर मुरल्यावर जरा आळले तर आळतील…वाऱ्याच्या दिशेला जरा पसरुन ठेवले तर आळतील…सतराशेसाठ वाटा…चुकलेल्या दिशेला जागेवर आणायला धावत येतात…! पण छेः … बाहेरच्या तापमानाशी सख्य साधत लाडवातलं तूप अगदी मनसोक्त साखरेसहित परत ऐसपैस पहुडलेलं बघून…आता या अतिरिक्त स्निग्धतेचं काय करावं हा प्रश्न तिला पडला.
कमी पडलं तर वरुन पटकन घालता येतं. पण जास्त झालं तर मात्र त्यातून सहजासहजी काढून घेणे होत नाही….. मग ते पदार्थ असो, नाहीतर माणुस असो. समत्वाला ममत्व येऊन मिळाले की अतिरिक्त स्नेह वाढतोच…आणि गोष्टींचा थोडा तोल ढळल्यासारखा होतो, आणि मग तो कधीकधी असा तापदायक ठरतो.
याचं जिवंत उदाहरण म्हणजे हे स्वयंपाकघरातले पदार्थ ! अशी अतिरिक्तता माणसांच्या स्वभावातूनही वेगवेगळ्या तऱ्हेने ओसंडून वहात असते…!
काही काळापुरता टिपकागद होऊन जडलेले नाते…ती अतिरिक्तता शोषून घेते आणि अलिप्त होऊन पुढचा मार्ग चालू लागते…..
… येस्स…खरंच की…थोड्या कोरड्या कणिकेवर तिने टिश्यू पेपर (टिपकागद) पसरला आणि त्यावर ते लाडवाचं मिश्रण पसरुन ठेवलं…हलके हलके मिश्रणातील तूप टिश्यूवर दिसू लागले….आणि खालची कणिक तो स्निग्धांश स्वतःत शोषून घेऊ लागली…! लेकीने विचारले, “ आई साखरेचा गोडवा तर नाही
ओढून घेणार तो टिपकागद…?”
“ नाही ग…शोषून फक्त ओलावा आणि स्निग्धता घेता येते. कोरडेपण फक्त आपलं अस्तित्व जपत मिसळून जाते फार तर ! “
न सांगता काय अन् किती टिपावं हे त्या कागदाला स्वभावतःच समजलेलं असतं …उगाच गरजेपेक्षा जास्त लगट ते इतक्या जवळ असूनही करत नाही…हे जर ज्या त्या नात्याला कळलं तर…टिपकागद होऊन प्रत्येक नात्यातली भूमिका निर्लेपपणे पार पाडता येईल. अतिरिक्त ओल/स्निग्धता तेव्हढी शोषून घेउन ,परत ज्याचं त्याचं स्वातंत्र्य मान्य करुन…अलिप्त होणारा टिपकागद तिला फार आपलासा वाटला. कागदावरचे लाडवाचे मिश्रण आता लाडू बांधण्याइतके नक्कीच आळले होते…कणकेतला मिसळून गेलेला स्निग्धांश वायाही गेला नव्हता…मधला कागद मात्र आपलं काम बजावून शांतपणे बाजूला झाला…!
नात्यात ही असा टिपकागद होता आलं पाहिजे… म्हणजे नाती आकारात, गोडव्यात, आणि व्यवहारातही देखणी राहतात …… होय ना !
लेखिका : सौ विदुला जोगळेकर
प्रस्तुती : सौ उज्ज्वला केळकर
संपर्क –17 16/2 ‘गायत्री’ प्लॉट नं. 12, वसंत दादा साखर कामगारभावन के पास , सांगली 416416 महाराष्ट्र
मो. 9403310170, email-id – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈