श्री संभाजी बबन गायके

 

? मनमंजुषेतून ?

☆ “टिप टॉक !—  ☆ श्री संभाजी बबन गायके 

टीप हा शब्द अगदी मनाच्या तळाशी जाऊन बसला आहे लहानपापासूनच ! जो पर्यंत टीप द्यावी लागत नव्हती तो ही टीप तशी तळटीपच होती !

ही टीप पुस्तकांत खाली छापलेली दिसायची. आमंत्रण पत्रिकेत जवळ जवळ धमकी या शब्दाला पर्यायी शब्द म्हणून नजरेस पडायची.

कपडा फाटला की त्याला टेलर काकांना विनंती करून ही टीप मारून घ्यावी लागे ! त्यांनी जास्त पैसे मागितले की डोळ्यांतून टिपे गळायची बाकी रहात ! अशावेळी एवढ्याशा कामाचे एवढे पैसे? असे शब्द अगदी tip of my tongue यायचे ! पण घाबरून जिभेची हीच टीप चावावी आणि गप्प बसावे,असे होई !

काही लोक पोलिसांना टीप देतात, किंवा त्यांना ती कुठून तरी मिळते,असेही वाचनात येते अधून मधून !

टीपटॉप नावाची टेलरिंग दुकाने असतील तर अशी टीप मारून देणे ते लोक कमी पणाचे समजतात ! असो.

शहरातल्या हॉटेलात जायला लागल्यापासून टीप शब्दाचा आणि त्यामागचा ‘ अर्थ ‘ समजू लागला.

खरं तर या कल्पनेमागे खूप सुंदर कल्पना आहे,असे वाटते ! विशेषतः hospitality industry मध्ये नम्रता, ग्राहकाभिमुख सेवा, आणि अचूक सेवा या बाबी महत्त्वाच्या असतात. लोक सारं काही छान, भारी मिळावं म्हणून पैसे खर्च करतात. हल्ली तर hospital industry आणि hospitality industry सारख्याच महाग असतात. कोरोना काळात या दोन्ही सेवा मेवा मिळवत राहिल्या ! श्रीमंतांनी five star उपचार घेतले आणि गरिबांनी दिवसा star पाहिले डोळ्यांसमोर ..बिलाचे आकडे पाहून ! असो. .. तर ..वेटर इत्यादी मंडळी हसतमुख सेवा देतात, काय खावे, काय परवडेल याचे मार्गदर्शन करतात, वेळेवर पदार्थ आणून देतात, उरलेले पदार्थ तत्परतेने पार्सल करून देतात, इत्यादी शेकडो कारणांनी या सेवकांना काही रक्कम स्वखुशीने देणे,अपेक्षित असते. यात आता स्वखुशीे दूर गेली आहे ! काही हॉटेल मध्ये काम करणाऱ्या वेटर मंडळीमध्ये सुका आणि ओला असे दोन प्रकार असतात म्हणे ! सुका म्हणजे फक्त पगार घ्यायचा ! तिथले अन्न मिळणार नाही. ओला म्हणजे अन्न आणि पगार ! या ओलाचा पगार तसा कमीच असणार !

मुळातच या व्यवसायात बिचारी नाडलेली मंडळी दिसतात. नाईलाजाने हा डगला अंगावर चढवलेली… बँडवाल्यांसारखी ! अन्न वाढणारे वेटर आणि आनंदाच्या धुना वाजवणारे वादक यांचे चेहरे पाहून घ्यावेत !

या लोकांची काही वरकमाई करण्याची इच्छा असते. ग्राहकाने झालेलं Bill पूर्ण देऊन काही रक्कम यांच्यासाठी ठेवावी,अशी त्यांची मूक मागणी असते. विशेषतः आपण त्यांच्याकडे bill चे पैसे दिले, त्याने ते pay करून आणून त्या पाकिटात ठेवले तर उरलेले सुट्टे पैसे ग्राहकाने तसेच ठेवावेत,असे त्यांना वाटते. त्यासाठी हे सेवक आपल्या टेबलच्या आसपास अदबीने आणि छुप्या रीतीने घुटमळत राहतात. आपली पाठ वळताच लगबगीने त्यातील पैसे खिशात घालतात. अपेक्षेनुसार रक्कम नसेल तर एकमेकांना नजरेने इशारे करत राहतात. अर्थात हे हॉटेलनुसार बदलते. भारी हॉटेलात जाणारे भारी लोक काही वेळा keep the change असं म्हणून उठून जातात. त्यांच्यामुळे इतर सामान्य लोकांना change व्हायला लागले आहे.  मोठ्या हॉटेलांत पहिल्यांदा गेलेले लोक चक्क तिथल्या स्मार्ट वेटर बांधवांना काहीसे बिचकुन असतात !

मोठ्या हॉटेलच्या bill मध्येच काही टक्के रक्कम आधीच कापून घेतात म्हणे ! काही ठिकाणी टीप टाकण्यासाठी box असतात. ही रक्कम वेटर आपसात वाटून घेत असावेत. जास्त महागडे पदार्थ मागणाऱ्या ग्राहकांकडून जादा टीप मिळण्याची शक्यता असल्याने तिथे अधिकचे सौजन्य दाखवले जात असावे का? टिप देण्यास टाळाटाळ केली किंवा अगदीच कमी दिली तर कदाचित पुढल्या वेळच्या सेवेत काही बदलही होऊ शकतात ! आपला नवरा किंवा मुलगा वेटरसाठी किती रक्कम मागे ठेवतो,यावर काही पत्नी,माता लक्ष ठेऊन असतात. आणि त्यातील काही रक्कम परस्पर कमीही करतात !

पण टीप देणे ही एक नाजूक गोष्ट असते. याचे चलन आपल्याकडे परदेशातून आले असले तरी दिवाळी पोस्त,बक्षिसी इत्यादी प्रकार आहेतच आपल्याकडे आधीपासून. राजे लोक तर चक्क त्यांच्या हातातल्या, गळ्यातल्या सोन्याच्या वस्तू सेवकांना बहाल करीत असत. 

परदेशात आणि आता आपल्याकडेही महिला वेटर मोठ्या प्रमाणात असतात. गोष्ट परदेशातील आहे…एक गरोदर महिला वेटर…ती धावपळ करीत होती..तिला आणखी काही महिने तरी काम करण्याशिवाय पर्याय नव्हता. एका टेबलवरील चार मित्रांनी तिची अवस्था जाणली..आणि तिला तीन महिने पुरेल एवढी रक्कम आपसात जमा करून टीप म्हणून दिली…तिच्या डोळ्यांतील भाव अवर्णनीय होते !

एक आणखीन गोष्ट ! दुपारी हॉटेल बंद होण्याची वेळ. एक आठ दहा वर्षांचा मुलगा सायकलवर घाईघाईत आला. महिला वेटर वैतागली..आता हा कशाला आला काम वाढवायला ! तिने विचार केला. काहीशा नाराजीनेच त्याच्यापुढे मेन्यू कार्ड ठेवले. त्याला ice cream पाहिजे होते. एक छान ice cream १०० रुपयांचे होते आणि त्यापेक्षा स्वस्त आणि साधेसे ८० रुपयांचे. त्याच्याकडे १०० रुपये होते ! पण त्याने ८०चे मागवले. वेटर महिलेने काय भिक्कार ग्राहक म्हणून नाराजीने order serve केली आणि ती आवरायला निघून गेली. ती परत टेबलाशी आली तोवर तो मुलगा निघून गेला होता…तिने bill ठेवतात ते पाकीट उघडलं.. त्यात २० रुपये ठेवले होते…टीप म्हणून ! तिला टीप देता यावी म्हणून त्यानं कमी किमतीचे ice cream order केलं होतं ! ती वेटर महिला आपल्या डोळ्यांतले अश्रू रोखू शकली नाही !

टिप: इथेच थांबतो. बाकी तुम्ही सांगा… शेवटी या विषयाच्या हिमनगाचे हे मी लिहिले ते फक्त एक tip म्हणजे टोक आहे !

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments