☆ मनमंजुषेतून ☆ भक्तीची आस ☆ श्रीमती सुधा भोगले ☆
भक्ती संप्रदायाचा इतिहास जेव्हां वाचनात आला तेंव्हा साहित्याचे मुकुटमणी, संतांचे गुरु ज्ञानेश्वर यांना माऊली कां संबोधतात याची जाणीव झाली. भागवतधर्म म्हणजे काय? शैव व विष्णुरूपी पांडुरंग जो सर्व जातीपातीच्या, उच्चनीच, श्रीमंत, गरीब, विद्वान, सामान्य, सर्वांना एकाछत्राखाली सामावून घेतो.तो साक्षात ईश्वर संतांचा मायबाप, प्रसंगी, दिनांचा कनवाळू विठोबाराया!
आषाढी, कार्तिकीचे महत्व पूर्वापार चालत आले आहे. टाळ-मृदुंगाच्या गजरात वारकरी पालख्या घेऊन पंढरपुरला जातात. वर्षाचे बारामहिने एकादशी असतेच, पण या दोन एकादशीना विशेष महत्व आहे. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात. या सुमारास सूर्याचे दक्षिणायन असल्याने, देवांची रात्र सुरु होते. इथून पुढचे चार महिने चातुर्मास सुरु होतो. प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येतात. प्रत्येक एकादशीला वेगळे नाव आहे.
उदा.कामिका,पुत्रदा,पाशांकुशा,षट्तिला,स्मार्त,भागवत,परिवर्तिनी,इंदिरा,रमा,प्रबोधिनी,मोक्षदा,सफला, आमलकी,वरूथिनी,मोहिनी,पापमोचीनी,निर्जला,योगिनी अशी नावे आहेत.
एकादशी म्हणजे विष्णूचे व्रत.आषाढी,कार्तिकीला पंढरपुरच्या विठोबाचे महत्व! पुंडलिकाची गोष्ट लहानपणी ऐकलेली,वाचलेली होती.पण प्रत्यक्ष पंढरपूर,तेथील मंदिर पाहण्याचा योग सासरघरी आल्यावरच आला.नाहीतर एकाद्शी दिवशी उपवास करायचा फराळाचे पदार्थ खायचे एवढेच करायचो.
वयाबरोबर जाणतेपण येते,तसे मन प्रगल्भ होते आणि मग इतर गोष्टींची जाण येते. सासरघरचे वातावरण धार्मिक होते.दरवर्षी सासूबाई आळंदीला प्रस्थानाला जात.एकदा पुण्याला पालखी सोहळा पाहिला होता. शाळेतल्या क्रमिक पुस्तकात संतांची अभंगवाणी समाविष्ट असे.त्यातून जी काही थोडी बहुत तोंडओळख या ईश्वरभक्तीशी झाली तेवढीच! पण मनातून ईश्वरभक्तीच्या ओढीचे प्रेम जागृत व्हायला आवधीच लागला.
एकदा आमचेकडे,सासूबाईंनी,पंढरपुरला मोठी महापूजा घालायचे ठरवले.मी तशी या साऱ्यालाच नवखी होते.कशाला इतका घाट घालताहेत? असे आपले मला वाटले. सर्वानीच जायचे ठरले.
महापूजा सकाळीच असल्याने भीमेकाठी जाऊन, चंद्रभागेत स्नान करून तयार झालो.मी या सर्व गोष्टी खरोखर आलीप्तपणे करत होते. पुजेची वेळ झाली.घरचे यजमान पूजेच्या अग्रभागी सोवळे नेसून सिद्द होते.आम्हीही सर्वजण गाभाऱ्यात जमलो.पंच्यामृताच्या कळश्या एकेक हाती घेऊन पुजाऱ्याच्या सांगण्याप्रमाणे देवाला स्नान घालणे सुरु होते.सासूबाई मला सांगत होत्या,”अग हात पुढे कर,तू पण देवाचे अंग चोळ,हाताने अंघोळ घाल”!त्यावेळी थोडे उचंबळून आले.साक्षात भगवंताला न्हाऊमाखूघालत होतो. पण जितका आनंद व्हावा तेवढा काही होत नव्हता.भक्तीची आस,भक्तीची कास देवभेटीची आळवणी,श्रद्धा ही सुद्धा जागृत व्हावी लागते. ईश्वराविषयीचे आकर्षण काही कोणी सांगीतल्याने,ऐकल्याने ओतले जात नाही.ते निर्माण व्हावे लागते,मनाच्या खोल गाभाऱ्यातून! जो ईश्वर, जे परब्रह्म,मूळ तुमच्यात वास करुन आहे, जे अंतस्थ आहे, अदृश आहे त्या मूळ जीवात्म्याला,निर्गुण निराकार परब्रहमाशी जोडण्याकरिता मनाचा हुंकार तुमच्या अंतस्थ ह्रदयातून उमटावा लागतो.तो अंतस्थ हुंकार, भक्तीची प्रेमनदी,भक्तीचा पान्हा,साक्षात भगवंताला न्हाऊ घालताना मजजवळ नव्हता,’मी रीतेपणीच गेले आणि रीतेपणीच आले’! म्हणून मला ईश्वरासमीप जाऊनही ते साक्षात ‘परब्रह्म’ भेटले नाही.भाव तेथे देव.भाव तो मनीच नव्हता, मग देव कसा भेटावा?
काही वर्षांनी पुन्हा पंढरीला जाण्याचा योग आला.यात्रा नव्हती.एरवीची एक संध्याकाळ होती.गर्दी तुरळकच होती. थोडा वेळ बारीत उभे राहून दर्शन झाले. गाभारा जवळ जवळ येऊ लागला, या वेळेसमात्र मागच्यापेक्षा मनात भक्तीची, देवाला प्रेमाने भेटण्याची ओढ होती. त्या तरंग लाटा मनात उचंबळू येऊ लागल्या. त्या आनंदाच्या भेट सोहळ्यात, पूर्वीच्या स्मृतीत मी हात वर उंचावून देवाला पाहू लागले, त्याच्या कायेला स्पर्शू लागले. एवढ्यात पुजार॒याचे दम भरलेले शब्द ऐकू आले, ‘बाई, पायाशीच हात लावा !’ अरे बापरे ! महापुजेवेळी साक्षात भगवंताला न्हाऊमाखू घालताना त्याचे अंग चोळले, अंघोळ घातली. बाळकृष्णाला, गोपाळाला पण आता तसा हा उंचावायचा नाही. बरोबर आहे, ‘बा, विठ्ठला, माझे पामराचे डोके तुझ्या चरणी लीनच व्हायला हवे. ते अशावेळी तुझ्या कायेला हात लावून आशीर्वाद का बरे घेणार !’ चूक झाली मायबापा चूक झाली. !’ असे मनाशी म्हणत मी पांडुरंगाच्या चरणी आपले मस्तक लीन केले, टेकवले. पुजाऱ्याने घाई चालवली होती. मी डोळेभरून ईश्वर पहिला. मनी त्याचे रूप आकंठ साठवून माझ्यावर प्रेमाची पाखर घालण्यास विनवले आणि पुन्हा आपल्या संसारी येऊन मग्न झाले. यावेळेस मला ईश्वराच्या सत्चीदानन्दाची जाणीव होऊ लागली. हृदयी ईश्वर भेटीचा प्रकाश होऊ लागला.
अशी ही ईश्वराची भक्ती, हृदयी भाव नसलेल्यांना वेडं करणारी ! भक्तीचा झरा वाहू लावणारी, असीम, उत्कट, अविनाशी ! दरवर्षी आषाढी येते. यावर्षीही आली आहे. पण यावर्षी मनाच्या गाभाऱ्यात वरील रहस्यमय अनुभवांचे गुंजन चालू आहे. जिकडे तिकडे पंढरपूरला पालखी निघाल्याच्या वार्ता कानावर येत आहेत. मन तिकडे हळूहळू ओढ घेत आहे.
शैशवात मनात नसलेला भक्तीचा उगम. हा काही नंतर एकाकी झालेला नाही. बहिर्चक्षूंनी पाहिलेला देव. अंतरमनात वास करीतच होता. परंतु बौद्द्धिक पातळीवर त्याचा विचार केलेला नव्हता. ती अंतरमनातील भक्ती जागृत झाली. बुद्धीने मनाची जागृती एका उंच स्तरावर नेऊन ठेवली. ह्यालाच भक्ती म्हणावं कां? देवाची भक्ती, त्याची आळवणी, त्याचे नामस्मरण सामान्यांनी करावे. हाच खरा सुखाचा मार्ग संतांनी शतकानुशतके दाखविला आहे. भक्तीच्या अशा नवविध पद्धती सांगितल्या जातात. देह हा इंद्रिय सुखाच्या पिंजऱ्यात अडून पडलेला आहे. त्या देहातील जीवात्म्याला त्या परिपूर्ण, अनादी अनंत परब्रह्माशी जोडून जिवाचे सोने होईल तेच खरे अंतिम सुख ! ‘देह जावो अथवा राहो ! पांडुरंगी दृढ भावो ! नुरो मस्तक ! कुटो हे शरीर ! नामाचा गजर सोडू नये ! नामाच्या गजराने, भक्तीने तो कृपाळू ईश्वर भक्तावर आपली कृपादृष्टी करतो. भक्ताच्या चिमुकल्या नामघोषाने फुल नाही फुलाची पाकळीसुद्धा त्याला पुरते. इतका तो दयानिधी कृपाळू आहे. त्याच्याकडे देण्यासाठी खूप आहे, पण आपली झोळी फाटकी असता कामा नये.
म्हणूनच ‘पुंडलिके वरदा हरिविठ्ठल, द्यानोबा तुकाराम,’ ह्या नामघोषात लाखो वारकऱ्यांनी भक्तीची ही उज्ज्वल परंपरा जागृत ठेवली आहे. हजारो वर्षे हे विठ्ठलाचे पाईक अखंड मुखी हरिचे नाम घेत. उन्हापावसाची, दगडाधोंड्यांची पर्वा न करता जिवाचे, देहाचे कवतीक सोडून, मैला मैलांचा प्रवास करीत, आपल्या मनातील नाद्ब्रम्हाला त्या परब्रम्हाशी एकरूप करण्या, भेटवण्या, पंढरपूरला त्या विठूरायाच्या दर्शनाला जातात आणि आपले मस्तक लीन करतात. आपल्या अंतरमनातील उर्जा देवाच्या दर्शनाने तृप्त करून परतात.
वारीला जातो तो वारकरी होतो. आपण पांडुरंगाच्या दर्शनाची आस ठेवली. भक्तीचा भाव ठेवला आणि वारीत मनाने जरी सहभागी झालो तरी आपणही वारकरी होऊ. प्रत्येकाच्या मनातले भक्तीचे स्वरूप जरी वेगळे असले तरी भाव तेथे देव आहेच ! भक्ती तेथे कृपा ! ईश्वराने अनेक प्रसंगी केलेली आपण पाहिली वाचली आहे. म्हणून या आषाढी निमित्त एकादशीला पंढरपूरला जाणार्या वारकऱ्याच्या स्वरात आपलाही स्वर मिसळून म्हणूया टाळी वाजवावी ! गुढी उभारावी !वाट ही चालावी ! पंढरीची.
© श्रीमती सुधा भोगले
९७६४५३९३४९ / ९३०९८९८९१९
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
सुरेख!