सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
☆ ओंजळ… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆
रोज सकाळी उठताना ‘कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती….’ ‘म्हणत दोन्ही हाताची ओंजळ सर्वप्रथम डोळ्यासमोर येते आणि ‘प्रभाते कर दर्शनम्’….’ म्हणत रोजचा दिवस दाखवणाऱ्या परमेश्वराला त्याच हाताने आपण नमस्कार करतो !
‘ओंजळ’ म्हटली की डोळ्यासमोर येतो तो कर्ण ! सकाळच्या वेळी गंगेच्या पाण्यात उभा राहून सूर्याला अर्घ्य देताना केलेल्या ओंजळीतून पाणी देत असलेला ! दानशूर कर्णाची ओंजळ कधी रीती रहा ]त नव्हती. गंगा स्नानानंतर तो हा दानयज्ञ ओंजळीने करीत असे ! दानशूर कर्णाची भरली ओंजळ ज्याला जे पाहिजे ते देण्यात व्यस्त असे ! त्यामुळे कर्णाकडून कोणाला काही पाहिजे असेल तर ते सूर्योदयाला दानाच्या वेळी त्याला भेटले तर मिळत असे. इंद्राने त्याची कवच कुंडले ही अशाचवेळी मिळवली.
‘ओंजळ’ हे दातृत्वाचे प्रतीकच आहे जणू ! दोन्ही हातांचे तळवे एकमेकांना जुळवून ओंजळ तयार होते. तहानलेल्या माणसाला ओंजळीत पाणी ओतत असताना प्यायले की पोटभर पाणी प्याल्यासारखे वाटते, तसेच ओंजळभर धान्य एखाद्याच्या झोळीत टाकले की झोळी भरल्यासारखी होते. ओंजळ ही नेहमी भरलेली असावी. दानासाठी आपण हाताचे महत्त्व सांगतो, तसेच ओंजळ ही नेहमी दोन हाताने काही देण्यासाठीच असते !
फुलांनी भरलेली हाताची ओंजळ डोळ्यासमोर आली की मन प्रसन्न होते. सकाळच्या वेळी जर कोणी सुवासिक जाई, जुई, मोगरा, बकुळी यासारखी फुले ओंजळ भरून दिली तर अगदी श्रीमंत असल्यासारखेच वाटते मला ! त्या फुलांचा वास भरभरून मनाच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचतो आणि तीच फुले देवाच्या देव्हाऱ्यात सजलेली पाहताना ते फुलांनी सजवलेले परमेश्वराचे रूप पाहून मन भरून येते !
ओंजळ हे छोटेसे प्रतीक आहे जीवनाचे ! आकाशात भरून आलेला पाऊस हत्तीच्या सोंडेने जरी धरतीवर कोसळत असला तरी त्या धारेची साठवण आपण हाताच्या ओंजळीत करतो तेव्हा ती सीमित असते. ओंजळ आपल्याला तृप्त राहायला शिकवते असे मला वाटते !….. भुकेच्या वेळी मिळालेले ओंजळभर अन्न किंवा तृषार्त असताना मिळालेले ओंजळभर पाणी याचे महत्त्व माणसाला खूपच असते. अशावेळी तृप्तीचे आसू आणि हसू आल्याशिवाय रहात नाही. जे मिळते ते समाधानाने घ्यावे, त्यातच जीवनाचे सार सामावलेले असते !
ओंजळ भरून लाह्या जेव्हा पती-पत्नी लाजा- होमात घालत असतात तेव्हा हीच त्यागाची भावना एकमेकांसाठी मनात भरून घेतात ! जीवनाच्या वेदीवर पाऊल टाकताना नवरा- बायको लाह्यांची ओंजळ समर्पण करून एकमेकासाठी आपण आयुष्यभरासाठी जोडलेले आहोत ही जाणीव एकमेकांना देत असतात., तर कन्यादानाच्या वेळी मुलीचे आई-वडील आणि नववधू- वर हाताच्या ओंजळीत पाणी घेतात, जणू आई-वडिलांकडून कन्येचे दान या ओंजळीतून होत असते !
‘ओंजळभर धान्य ‘ या संकल्पनेतून घराघरातून धान्य जमा करून एका सेवाभावी संस्थेत देत असलेले ऐकले आहे. त्याठिकाणी प्रत्येक घरातून आलेल्या ओंजळभर धान्याचे रूपांतर एका खूप मोठ्या धान्यासाठ्यात होते. देणाऱ्यांना एक ओंजळभर धान्य देताना फारसा त्रास वाटत नाही, पण अशा असंख्य ओंजळीच्या एकत्रीकरणातून नकळत खूप मोठी समाजसेवा घडत असते… गोंदवलेकर महाराज म्हणत असत की दारी आलेल्या भुकेल्या माणसाला कधी हाकलून देऊ नये. फार तर त्यांना पैसे देऊ नयेत पण ओंजळभर धान्याची भिक्षा द्यावी. त्याकाळी अन्नदानाचे पुण्य मोठे वाटत असे आणि त्या अन्नाचा आशीर्वाद संपूर्ण कुटुंबाला मिळत असे.
आपण लक्ष्मीचे चित्र बघतो तेव्हा ती ओंजळीने नाणी ओतत असते आणि तिची ओंजळ सतत भरभरून वाहत असते ! अशा लक्ष्मीची कृपा आपल्यावर सतत राहू दे असंच मनात येते. लक्ष्मीपूजनाला आपण अशा लक्ष्मीची पूजा करतो.
आत्ता सहज आठवली ती व्ही. शांताराम यांच्या चित्रपटात सुरुवातीला दाखवली जाणारी कमनीय स्त्री, जी ओंजळीतून फुले उधळीत असते. त्या कमनीय देहाचे सौंदर्य त्या ओतणाऱ्या ओंजळीतून इतके प्रमाणबद्ध रेखाटले आहे की, ते चित्र आपल्या सर्वांच्या मन: पटलावर कोरले गेले आहे !
आपल्या दोन हातावरील रेषा आपले भविष्य दाखवतात असे आपण म्हणतो. जेव्हा ते दोन हात एकत्र येतात आणि जी ओंजळ बनते ती आपल्याला काम करण्यास प्रवृत्त करते. अशी ही ‘ओंजळ’ शब्दबद्ध करताना माझी शब्दांची ओंजळ अपुरी पडते असे मला वाटते ! पण भावपूर्ण शब्दांच्या या ओंजळीला सतत ओतत राहण्यासाठी सरस्वती मला साथ देऊ दे, असंच या छोट्या ओंजळीसाठी मला वाटते !
© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈