☆ मनमंजुषेतून : अबोली – सुश्री मानसी चिटणीस ☆
लहानपणापासूनच मला अबोली आवडते..माझं नाव अबोली का ठेवलं नाहीस म्हणून मी आईवर कितीदातरी रूसले
असेन. आमच्या मागच्या अंगण्यात अबोलीचं रान होतं. मी रोज फुलं वेचून आणायचे आणि हट्टाने आजीकडून त्याचा गजरा करून घ्यायचे. रोज वेणीत माळायचे. त्या अबोलीच्या गजऱ्यासाठी मी माझे केस ही वाढवले होते..
चुकला पिर मशीदीत तशी मी बघावं तेव्हा त्या अबोलीच्या रोपांसोबतच असायचे..असं कोणतं नातं , ऋणानूबंध आमच्यात होते काय माहित पण माझं अबोली वेड कायम राहिलं..
लग्न झाल्यावर कित्येक वर्ष गेली आणि संसारीक अबोल्यात माझीच अबोली झाली..अंगणातली अबोली मनात लपून गेली आणि मी अबोली होत गेले. तिचे केशरी रंग रुजवत राहिले रोज नव्याने. अबोली होवून जगताना तिला नेहमीच समजायची माझी भाषा अन् मला तिची सळसळ मोहवायची.
साधारण वर्षभरापुर्वी एका झाडवाल्याकडे मला ती मिळाली आणि माझं अबोलीप्रेम पुन्हा उफाळून आलं. एखादी जिवलग मैत्रीण भेटावी असा आनंद झाला. वर्षभर ती छान फुलली, डवरली, मोहरली पण साधारण महिनाभरापुर्वी काही कारणास्तव आम्हाला सगळ्यांनाच पंधरा दिवस गावाकडेच रहावं लागलं आणि त्यावेळात घरातली सगळी झाडे सुकून गेली त्यात माझी प्रिय अबोली सुद्धा सुकली..
मन उदास होतं एकदम. ही झाडं म्हणजे माझा जीव की प्राण..पुन्हा नवी झाडं आणली , रुजवली तेव्हा जरा जिवात जिव आला..पण अबोली काही गवसली नाही..मी आजूबाजूच्या साऱ्या नर्सऱ्या शोधल्या पण कुठेच सापडली नाही आणि मनाची तलखी मात्र वाढत राहिली. असेच आठ दहा दिवस गेले..
एक दिवस दळण टाकायला गिरणीत चालले होते तेव्हा एका घराच्या अंगणात ती मला दिसली आणि मी हरखले. भराभर गिरणीत जाऊन दळणाचा डबा ठेवला आणि जवळपास धावतच पुन्हा त्या घराजवळ आले आणि दाराची कडी वाजवली. एका काकूंनी दरवाजा उघडला. मी मागचा पुढचा विचार न करता एका दमात बोलून गेले,”मला अबोली खूप आवडते. मी घेऊ का दोन रोप तुमच्या बागेतली ? “त्यांनी आश्चर्याने मला आपादमस्तक न्याहाळले आणि हो..घ्या. एवढे बोलून दरवाजा लावून घेतला.
मी तेवढ्या परवानगीनेही खूष झाले. अलगद तिथली दोन रोपं जमिनीतून मोकळी केली आणि घरी घेऊन आले. आल्या आल्या मोगऱ्याच्या शेजारच्या कुंडीत त्यांना जागा करून दिली. पण दोन दिवस दोन्ही रोपं रुसल्यासारखी वाटत होती..मलाही करमेना त्यांना गोंजारत राहिले वेळेवर पाणी घालत राहिले..
आज सकाळी झाडांना पाणी घालायला ग्रिल उघडलं तर काय..!दोन्ही रोपांतून दोन पिटुकल्या कळ्या नुकत्याच उमलल्या होत्या , जशाकाही माझ्याकडे डोळे मिचकावून हसत होत्या..खूप खूप खूप आनंद झाला मला..
अबोलीने माझी मैत्री स्विकारलीय..आता ती पुन्हा फुलेल..बहरेल..मोहरेल माझ्या इतकुश्या अंगणात आणि मनातही..
© सुश्री मानसी चिटणीस
चिंचवडगाव
फोन : 9881132407
सुंदर रचना