सौ. उज्ज्वला सुहास सहस्रबुद्धे
☆ मनमंजुषेतून ☆ आठवणींचा त्रिपूर ! ☆ सौ. उज्ज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆
आज त्रिपुरी पोर्णिमा! दसरा दिवाळीपासून सुरू झालेल्या सर्व सणांची सांगता या त्रिपुरी पौर्णिमेने होते. त्रिपुरी पौर्णिमा आली की डोळ्यासमोर आपोआपच आठवणींचा त्रिपुर उभा राहतो ! तेलाच्या पणत्यांनी उजळलेली असंख्य दिव्यांची दीपमाळ दिसावी तसा हा आठवणींचा त्रिपुर डोळ्यासमोर येतो.लहानपणी त्रिपुर पहायला संध्याकाळी सर्व देवळातून फिरत असू!
वर्षभर उभी असलेली दगडी त्रिपुर माळ उजळून गेलेली दिसत असे. गोव्यातील तसेच कोकणातील देवळातून अशा दिप माळा मी खूप पाहिल्या.
पण… माझ्यासाठी ही त्रिपुरी पौर्णिमा मोठी भाग्याची होती बहुतेक! कारण ह्यांचा जन्म त्रिपुरी पौर्णिमेला झाला! सासुबाई सांगत, ‘समोर देवळात त्रिपुर लावून आले आणि मग यांचा जन्म झाला! त्याकाळी जन्मवेळ अगदी परफेक्ट नोंदली जाण्याची शक्यता कमी असे, पण ह्यांचा जन्म त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी झाला एवढे मात्र खरे! आणि लग्नानंतर तारखे पेक्षा त्रिपुरी पौर्णिमेला ह्यांचा वाढदिवस साजरा केला जाई!
सांगलीला आमच्या घरासमोर असलेल्या मारुती मंदिरात संध्याकाळी त्रिपुर लावण्यात प्रकाश भावजींचा पुढाकार असे. मग मुले आणि आम्ही सर्वजण पणत्या , मेणबत्या घेऊन त्रिपुर लावण्यात मदत करत असू. मंदिराचे सौंदर्य पणत्यांच्या स्निग्ध प्रकाशाने उजळून गेलेले पहाण्यात आम्हाला खूप आनंद मिळत असे. या काळात आकाश साधारणपणे निरभ्र असे. शांत वातावरणात वाऱ्याची झुळूक आणि गारवा असला तरी पणत्या तेवण्यासाठी योग्य हवा असे. सगळीकडे नीरव शांतता आणि अंधार असताना ते दिवे खुपच उजळून दिसत! अगदी बघत राहावे असे!
प्रत्येक सण आपले वैशिष्ट्य घेऊन येतो. तसा हा त्रिपुरी पौर्णिमेचा दिवस! यानंतर थंडीचे दिवस शालीत गुरफटून घेत डिसेंबर ,जानेवारी येतात, पण बरेचसे मोठे सण संपलेले असतात. संक्रांतीचे संक्रमण सोडले तर फाल्गुनातील होळी आणि चैत्र पाडव्यापर्यंत सर्व निवांत असते.
ह्यांच्या आयुष्याचे 70 त्रिपूर पूर्ण झाले! या त्रिपुरी पौर्णिमेच्या आनंदात आम्ही परिपूर्ण जीवन जगलो,असेच आनंदाचे, आरोग्याचे टिपूर चांदणे यांना आयुष्यभर मिळो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना! जीवेत शरद: शतम्!
© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈