सुश्री शिल्पा मैंदर्गी
☆ मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 7 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी ☆
(पूर्ण अंध असूनही अतिशय उत्साही. साहित्य लेखन तिच्या सांगण्यावरून लिखीत स्वरूपात सौ.अंजली गोखले यांनी ई-अभिव्यक्ती साठी सादर केले आहे.)
पहाटेच्या वेळी एकदा एक कळी हळूच आली
आपले मनोगत हळुवार सांगून गेली.
रात्र कधीची संपली,पहाट झाली.
ही कळी म्हणजे माझ्या मनात नृत्य शिकण्या विषयी विचारांनी घेतलेला जन्म. या कळीला हळूवार फुंकर घातली धनश्री ताई रुपी वाऱ्या ने हळूवार फुंकर घालत असताना त्या कळीच्या आणि वाऱ्याच्या झालेल्या एकत्र प्रवासाविषयी थोडेसे.
खरेतर सुरुवातीला भरतनाट्यम हा नृत्यप्रकार शिकणे केवळ आणि केवळ डोळ्यांनी पाहून शिकणे हीच कला आहे. त्यामुळे सुरुवातीला मोठा अडसर ताईंच्या आणि माझ्या वाटेत उभा होता.
पण ताईंनी माझं मन नावाचं organजा गं करायला सुरुवात केली. आणि आमच्या दोघांच्याही असं लक्षात आलं की शरीर हे केवळ माध्यम आहे, साधन आहे आणि शरीरा पलीकडे म्हणजे अतिंद्रीय शक्तीच्या आधाराने आपण बऱ्याच गोष्टी साध्य करू शकतो. ताईनी मग स्पर्श, बुद्धीआणि मनातील अंतरिक प्रेमभाव यांच्या माध्यमातून नृत्य शिकवायला सुरुवात केली. अशाप्रकारे नृत्यातील अडवू, हस्त मुद्रा शिकत असताना कधी आमचे सूर जुळून गेले हे कळलेच नाही.
नृत्यामध्ये बरीच अवघड वेगवेगळी कॉम्बिनेशन्स असतात. जसे की डावा हात डोक्यावर असताना उजवा पाय लांब करणे, उजवा हात कडेला असताना डाव्या पायाचे मंडल करणे, भ्रमरी घेताना उजवा हात डोक्यावर ठेवूनडावा हात फिरवत उजवीकडून वळणे आणि त्याच वेळी गाण्या नुरूप चेहऱ्यावरचे हावभाव दाखवणे. अशा खूप अवघड अवघड गोष्टी ताईंनी अगदी कौशल्यपूर्ण रीतीने शिकविल्या. खरंतर दृष्टिहीन व्यक्ती ला समोर असलेले पाण्याचे भांडे घे हे सांगताना दुसऱ्याची खूप तारांबळ होते. पण इथे तर अच्छे मृत्य शिकवायचे होते.
नृत्याचे शिक्षण प्रशिक्षण जसजसे पुढे जात होते तसच या नवीन अडचणी समोर येत होत्या. ८-९ वर्षे शिकल्यानंतर अभिनयाचा भाग आल्यानंतर प्रश्न निर्माण झाला तो अभिनय शिकविण्या विषयी. पण पण तिथेही ताईंनी आपल्या बुद्धी कौशल्याचा वापर करून घेतला आणि लहान मुलांना गोष्टी सांगून जसे मनात भाव निर्माण केले जातात त्याचा उपयोग त्यांनी करून घेतला.
माझ्या अनेक अडचणी मध्ये मला येणारी अडचण म्हणजे आवाजाची .नृत्यात गिरकी घेतल्यानंतर माझे तोंड प्रेक्षकांच्या कडे आहे की बाजूला हे मला कळत नसे. पण या अडचणीवरही ही ताईंनी मात केली आणि आवाजाची दिशा ही नेहमी माझ्यासमोरच ठेवली की ज्याच्या आधाराने माझे दोन फिरून समोरच येत असे.
ताईंचे अथक परिश्रम, योग्य मार्गदर्शन, त्यांनी घेतलेले कष्ट, माझी मेहनत, रियाज आणि साधना याचा परिपाक असा झाला की मी नृत्यामध्ये गांधर्व महाविद्यालयाची नृत्य विशारद ही पदवी, कला वर्धिनी चा ५ वर्षा चा कोर्स, टिळक महाराष्ट्र विद्यापीठा ची नृत्यातली एम. ए. ही पदवी,यशस्वी रित्या संपादन केली.ज्यामुळे आज मी अनेक ठिकाणी,माझ्या एकटीचा स्टेज प्रोग्राम करू शकत आहे.
या माझ्या यशाचे कौतुक अनेक वर्तमान पत्रांनी आणि दूरदर्शन वरील अनेक वाहिन्यांनी, प्रसार माध्यमांनी भरभरून केले.
…. क्रमशः
© सुश्री शिल्पा मैंदर्गी
दूरभाष ०२३३ २२२५२७५
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈