सुश्री मंजुषा सुनीत मुळे
मनमंजुषेतून
☆ “इच्छामरण…” – भाग-१ ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
अतिशय उद्विग्न मनानेच मी खोलीतून बाहेर पडले. नेहेमीच लक्ष वेधून घेणा-या बाहेरील बागेकडे आज मात्र माझे अजिबात लक्ष गेले नाही. माझे मनच मुळी था-यावर नव्हते. जन्म-मृत्यूच्या सीमारेषेवर, तळ्यात की मळ्यात हे न कळण्याच्या टप्प्यावर येऊन थबकलेली माझी आई आत खोलीत निपचित पडली होती. एरवी खुट्ट झाले तरी जागी होणारी आई, आज व्हेंटिलेटरच्या धकधक आवाजातही अगदी शांत झोपली होती. आणि हे पाहून माझ्या मनाला एक अनामिक हुरहूर लागली होती. चालू असलेला कृत्रिम श्वासोच्छवास सोडला तर तिची इतर गात्रे अगदी म्लान, जीवच उरला नसल्यासारखी होऊन गेली होती. आणि ते पाहून आम्ही सर्वजण हरवल्यासारखे, हतबल होऊन, एकमेकांकडे पहात बसण्याखेरीज काहीच करू शकत नव्हतो. अगदी काही क्षणांसाठी व्हेंटिलेटर काढला तरी श्वासासाठी होणारी आईची असह्य तडफड आम्हाला अत्यंत बेचैन करत होती. आणि कालपासून दोन-तीन वेळा हा प्रयोग झाल्यावर मग डॉक्टरांनीच आमच्यासमोर तो मन हेलावून टाकणारा विचार मांडला होता. व्हेंटिलेटर काढून टाकून,आईचा शेवटचा नैसर्गिक श्वास कोणता असेल ते पहात बसण्याचा…. तिच्या मरणाची वाट पहात बसण्यासारखेच होते हे.
याच विचाराने उद्विग्न होऊन मी खोलीबाहेर आले होते. जरा वेळाने नकळतच या उद्विग्नतेची जागा विचारांनी घेतली. आईची दिवसेंदिवस खालावणारी प्रकृती, त्यावर अगदी प्रामाणिकपणे केले जाणारे पण अजिबात उपयोगी पडत नसलेले अद्ययावत, दीर्घ उपचार, एकामागोमाग एक शिथिल होत गेलेले जवळजवळ सगळेच अवयव, आणि आता हा शेवटचा उपचार – कृत्रिम श्वासोच्छवास. हा सगळा प्रवास अशा शेवटच्या पायरीवर येऊन एखाद्या कोड्यासारखा थांबला होता. ते कोडे सोडविणा-या एका चुटकीचीच जणू वाट पहात, आणि ही चुटकी वाजवण्याचे अत्यंत क्लेशदायी, मनात अपराधीपणाची भावना कायमसाठी रुजवू शकणारे काम डॉक्टरांनी अगदी निर्विकारपणे आमच्यावर सोपवले होते. काय निर्णय घेणार होतो आम्ही? आपल्या जन्मदात्या आईचे आयुष्य जाणीवपूर्वक संपवून टाकण्याचा असा क्रूर निर्णय घेऊ शकणार होतो का आम्ही? काहीच सुचत नव्हते.
विचार करता करता नाण्याची दुसरी बाजू लख्ख दिसायला लागली. इतर सर्व अवयव निकामी झाले तरी श्वास चालू असेपर्यंत आईचे अंतर्मन नक्कीच जागे असणार. मग अतिशय कष्टाने, स्वावलंबनाने आणि उमेदीने घडवलेले, सजवलेले आपले मनस्वी आयुष्य, असे विकलांगी, परावलंबी, जाणीव-नेणिवेवर हिंदकाळतांना पाहून तिच्या स्वाभिमानी मनाला किती अतोनात यातना होत असतील, या विचाराने मी एकदम अस्वस्थ झाले आणि जराशी सावरून बसले. तिच्या शारिरीक यातना अगदी तज्ञ डॉक्टरही दूर करू शकत नाहीत हे जरी खरे असले, तरी तिच्या मनाला होणा-या असह्य यातना तर आम्हीच थांबवू शकलो असतो ना… व्हेंटिलेटर काढून टाकून? हा विचार मनात आला आणि मी केवढ्यांदा तरी दचकले.
…. पण मग वीस दिवसांपूर्वी, जेव्हा ती थोडे बोलू शकत होती, तेव्हाचे तिचे काकुळतीचे बोलणे आठवले. अगदी सहन करण्यापलिकडच्या त्या वेदनांमधून आम्ही तिला सोडवावे, असे ती अगदी आपणहून, मनापासून सारखं सांगत होती. ‘ आजपर्यंत तिने कधीच कोणाकडे काही मागितलेले नाही. तर आता तिचे हे पहिले आणि शेवटचेच मागणे आम्ही मान्य करावे. गांगरून न जाता नीट चौफेर विचार करावा व नाही म्हणू नये. दुखण्याच्या मरणयातनांपेक्षा प्रत्यक्ष मरणंच सुसह्य आहे तेव्हा आता आम्ही तिला जाणिवपूर्वक मरू द्यावं.’… असे आमच्यापैकी प्रत्येकाला ती सांगत होती. तेव्हा ऐकायलाही नकोशा वाटणा-या या बोलण्यावर, आता मात्र विचार करावा असे वाटू लागले. आज तिच्या स्पर्शातूनही तिची ही मरणेच्छा माझ्या मनाला स्पर्शून जात होती. माझ्याही नकळत मी मनाशी काही निश्चय केला आणि मन घट्ट करून सर्वांसमोर अशा इच्छामरणाचा विषय काढण्याचे ठरविले.
‘आईला या यातनांमधून सोडव देवा ’ या प्रार्थनेचा ‘ तिला आता मरण दे ’ असा थेट अर्थ लावायला साहजिकच सगळे घाबरत होते, पण हळूहळू सगळेच बोलते झाले. इच्छामरण काही अटींवर मान्य करावे, इथपासून ते इच्छामरणास अजिबात मान्यता नको, या टोकापर्यंत मतं मांडता मांडता, आपण आपल्या आईबद्दल बोलतो आहोत हा विचारही जरा वेळ नकळतच बाजूला झाला.
एका भावाचे असे म्हणणे होते की … ‘‘इच्छामरण’ ही संकल्पना मरणासन्न, जराजर्जर माणसाच्या संदर्भात खरोखरच विचार करण्यासारखी आहे. ज्यांची अवस्था ‘ मरण येईना म्हणून जिते हे, जगण्याला ना अर्थ दुजा ’ अशी आहे, त्यांना त्यांच्या मरणप्राय यातनांसह जबरदस्तीने जगवत ठेवणे हे खरे तर विचार करण्याजोगे पाप आहे. वाट्टेल तितके प्रयत्न करूनही हा माणूस त्याच्या दुखण्यातून पूर्ववत् बरा होऊ शकत नाही, इतकेच नव्हे तर कमीतकमी स्वावलंबनही यापुढे शक्य नाही, याची डॉक्टर वारंवार खात्रीपूर्वक सूचना देत असतील आणि ती व्यक्तीही स्वत:ला या यातनांतून सोडवावे अशी अगदी मनापासून, कळकळीची विनंती करत असेल, तर अशावेळी आणखी काही तज्ञ डॉक्टरांचे त्याच्या तब्येतीविषयी, बरे होण्याच्या शक्यतेविषयी मत घेऊन, त्यानुसार त्या आजारी व्यक्तीच्या विनंतीला त्याच्या नातलगांनी, स्वत:च्या मनाविरुध्द पण त्रयस्थ प्रामाणिकपणे विचार करायला खरोखरच काही हरकत नाही. काही धर्मांमध्ये वयोवृद्ध पण अगदी धडधाकट माणसेसुध्दा, संथारा व्रतासारख्या व्रताद्वारा अगदी जाणीवपूर्वक, विचारपूर्वक, संयमाने व शांतपणे, अधिकृतपणे आपले आयुष्य धर्मसंमत मार्गाने संपवू शकतात.’
‘ स्वातंत्रवीर सावरकरांसारख्या अतिशय निधड्या छातीच्या ध्येयवेड्या माणसानेही … ‘ प्रायोपवेशन ‘ करून स्वतःहून आपले आयुष्य संपवले होते– नाही का ? आत्ता खरं तर मला संत ज्ञानेश्वर आणि इतर काही संतही आठवताहेत, ज्यांनी आपले जीवनकार्य संपले हे जाणून जिवंत समाधी घेण्याचा मार्ग स्वीकारला होता, आणि अतिशय शांत आणि स्थिर मनाने ते हा इहलोक सोडून गेले होते. अर्थात हे सगळे संत आपल्यापेक्षा, आपल्याला विचारही करता येणार नाही आणि अजिबात गाठताच येणार नाही अशा फारच उच्च आध्यात्मिक पातळीवर पोहोचलेले होते हे मान्यच करायला हवे. ‘देहाबद्दल वाटणाऱ्या अहंकाराशी लढून, त्याचा पूर्ण नि:पात करून, कार्यकारण उपाधीवर विजय मिळवून जो आत्मरूप झाला आहे, त्याला मिळणारी एक फार महान पदवी म्हणजे संतत्व‘ असे म्हटले जाते. असामान्य आणि ईश्वरासदृश असणाऱ्या अशा दुर्मिळ आणि अपवादात्मक देवमाणसांशी आपल्यासारख्या सामान्य माणसांनी मनातल्या मनातही तुलना करणे हे खरं तर पापच आहे. तेव्हा या इच्छामरणाच्या संदर्भात त्यांचा विचारही आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या मनात येणे अतिशय चुकीचे आहे. आत्ता इथे, आपल्या या अशा समस्येसंदर्भात त्यांची आठवण यावी हेही खरोखरच पाप आहे. फार मोठी चूक करत होतो मी–आणि त्यासाठी त्या सगळ्या थोर पुरुषश्रेष्ठांची अगदी मनापासून क्षमा मागतो मी ताई …. ‘
क्रमशः भाग पहिला
प्रस्तुती : सुश्री मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈