श्री मकरंद पिंपुटकर

? मनमंजुषेतून ?

☆ विचारप्रक्रिया बदलताना ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

मी आज तुम्हाला तीन छोट्या कथा सांगणार आहे.

पहिली गोष्ट आहे चार चाकी गाडी चालवण्याच्या परवान्याची (लायसन्स) परीक्षा देणाऱ्या एका तरुणीची. 

परीक्षक तिला विचारतात, “मी आज तुम्हाला परत तोच प्रश्न विचारतो – समजा तुम्ही एका अरुंद गल्लीतून गाडी चालवत आहात, गल्लीच्या दोन्ही बाजूला लागूनच इमारती आहेत, गाडीव्यतिरीक्त एकच माणूस जाऊ शकेल एवढीच जेमतेम जागा शिल्लक आहे आणि समोर रस्त्याच्या एका कडेला तुमचा नवरा आहे आणि दुसऱ्या साईडला तुमचा भाऊ आहे, तर तुम्ही काय माराल ? What will you hit ?”

गेल्या दोन परीक्षांत याच परीक्षकांनी तिला हाच प्रश्न विचारला होता, दोन्ही वेळा तिने “नवरा” असं उत्तर दिलं होतं आणि तिला नापास केले गेले होते. आज तिनं पवित्रा बदलला आणि ती म्हणाली, “मी विचार बदलला आहे. मी भावावर गाडी घालेन. I will hit him.”

ती आशेने परीक्षकांकडे पहात होती आणि परीक्षकांनी बोलायला सुरुवात केली …

दुसरी कथा आहे एका कारकीर्द समुपदेशकाची – करीअर कौन्सेलरची. संघ व्यवस्थापन – टीम मॅनेजमेंट शिकवण्यासाठी, त्याने आलेल्या सर्व प्रशिक्षार्थींच्या एका हातात प्रत्येकी एक छान टम्म फुगवलेला फुगा दिला आणि दुसऱ्या हातात एक टोकदार टाचणी. 

समुपदेशक सांगत होते, सर्व प्रशिक्षार्थी कान देऊन ऐकत होते, “एक छोटीशी स्पर्धा आहे – दोन मिनिटांपर्यंत ज्याच्या हातातला फुगा फुगलेला राहील तो जिंकला. 

and your time starts now !”

समुपदेशकांनी एवढं म्हटलं मात्र, इतका वेळ पूर्ण शांत असलेला तो हॉल, वीरश्रीयुक्त आरोळ्यांनी दुमदुमून गेला. जो तो दुसऱ्याचा फुगा फोडण्याच्या आणि स्वतःचा वाचवण्याच्या प्रयत्नांत मश्गूल होऊन गेला. 

दोन मिनिटे संपली तेव्हा फक्त तिघा जणांच्या हातातले फुगे शाबूत होते, आता यातील कोणाचा पहिला क्रमांक येणार हे जाणण्यासाठी सर्व उत्सुक होते, आणि समुपदेशकांनी बोलायला सुरुवात केली …

तिसरी कथा आहे मानसशास्त्रात (psychology) पदवी अभ्यासक्रम शिकणाऱ्या धनश्रीची. सध्या, महाविद्यालयीन अभ्यासक्रमाव्यतिरिक्त, ती न्यायवैद्यक मानसशास्त्र (forensic psychology) या विषयाचा एक online course करत होती.

आजची त्यांची नेमून दिलेली कामगिरी assignment दिलचस्प होती – तुम्हाला एक खून करायला सांगितला तर तुम्ही तो कसा कराल याचं एका मिनिटात उत्तर द्यायचे होते. 

मग कोणी, ज्याचा खून करायचा आहे त्याला गाडीतून ढकलून दिले, किंवा त्याचा कडेलोट केला. काहींनी चालत्या रेल्वेसमोर कोणाला ढकललं, काहींनी गोळ्या घातल्या, काहींनी सुरा खुपसून कोथळा काढला. धनश्रीने झोपलेल्या माणसाच्या नाकावर क्लोरोफॉर्मचा बोळा दाबून त्याला बेशुद्ध केलं आणि मग त्याचा प्राण जाईपर्यंत त्याच्या नाकातोंडावर उशी दाबून धरली. 

कोणी सगळ्यात जास्त सराईतपणे खून केला हे जाणून घेण्यासाठी सगळे उत्सुक होते आणि कोर्स इंस्ट्रक्टरने बोलायला सुरुवात केली …

संयम राखत ड्रायव्हिंग परीक्षक सांगत होते, “मॅडम, थोडा कॉमन सेन्स वापरा हो. तुम्ही ब्रेक मारा, hit the breaks. नवऱ्याच्या आणि भावाच्या जीवावर का उठताय ?”

कारकीर्द समुपदेशक सांगत होते, “दोन मिनिटांपर्यंत फुगा फुगलेला राहील, तो जिंकला, असं सांगितलं होतं. दुसऱ्याचे फुगे फोडा असं कुठं म्हटलं होतं ? तुम्ही कोणीच एकमेकांचे फुगे फोडले नसतेत, तर सगळेच जिंकला असतात.”

फोरेन्सिक कोर्सच्या इंस्ट्रक्टरने सांगितलं, “कोणी कसा खून केला हे महत्त्वाचं नाही. प्रश्न हा आहे की तुम्ही कोणीच साधं विचारलंही नाही की मी हा खून का करू ? कोणी असं म्हटलं नाही की मी सैन्यात जाईन आणि शत्रूला मारेन.”  

सध्याच्या या स्पर्धात्मक युगात, आपण जिंकायचं म्हणजे समोरच्याला हरवायचं अशी आपली विचारप्रक्रिया झाली आहे. 

स्वतःच्या प्रगतीसाठी आपण आपल्या कुटुंबीयांचा – आप्तस्वकीयांचाही बळी घ्यायला किंवा द्यायला तयार आहोत, आपल्याच सहकाऱ्यांना पायदळी तुडवून आपला झेंडा उंच ठेवण्यात आपल्याला काहीच वावगं वाटत नाही, कोणतेही कारण न जाणता आपण समोरच्याला आयुष्यातून उठवायलाही तयार आहोत. 

आपली ही तामसी विचारप्रक्रिया बदलायला हवी, नाही का ? शेकडो वर्षांपूर्वीच ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्यासाठी प्रार्थना केली आहे – आपली दुष्ट बुद्धी नाहीशी होवो, आपले सत्कर्म वाढो, आणि आपण एकमेकांचे शुभचिंतक होवो.

हे असं झालं की मगच ज्ञानोबा माऊली सुखी होतील. 

पण त्यासाठी आपण आपली विचारप्रक्रिया बदलली पाहिजे.

 

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments