श्री सुनील देशपांडे
मनमंजुषेतून
☆ “सामान्यांचे कंबरडे…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆
जगात सगळ्यात ताकदवान कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे सामान्यांचे कंबरडे. हे नेहमी मोडण्यासाठीच असतं. पेट्रोल डिझेलची भाववाढ झाली की सामान्यांचे कंबरडे मोडते.
सिलेंडर चे भाव वाढले की सामान्यांचे कंबरडे मोडते. दर वर्षी केंद्रात आणि राज्यात अशी दोनवेळा अंदाजपत्रके म्हणजेच बजेट येतात. त्या दोन्ही वेळेला विरोधी पक्षांच्या मते सामान्यांचे कंबरडे मोडलेले असते. तसं पाहायला गेलं तर मी एक सर्वसामान्य माणूस आहे. पण कंबरडे हा अवयव कुठे आहे हे मला अजून समजलं नाही. कंबर आणि त्याच्या जवळपास कुठेतरी तो असला पाहिजे कारण त्याचं नाव कंबर या नावावरून तयार झालेलं आहे असा आपला माझा सर्वसामान्य माणसाचा बाळबोध अंदाज. तर हा कंबरडे नावाचा सर्वशक्तिमान अवयव मी सर्वसामान्य असून सुद्धा मला काही अजून सापडला नाही. बहुधा तो शरीराच्या आत कोठेतरी दडला असावा. कारण माझी कंबर दुखते हे माझ्या आई ग ! उई ग ! वरून सगळ्यांनाच समजतं. परंतु कंबरडं मोडतं म्हणजे काय होतं हे काही अजून मला समजलं नाही. ते मोडत असून सुद्धा पुन्हा ते कसं जोडलं जातं तेही समजत नाही. कारण एकदा मोडल्यानंतर पुन्हा मोडण्यासाठी मध्यंतरीच्या काळात ते जोडलं जाणं आवश्यक आहे. कारण न जोडता ते पुन्हा मोडणार कसं ? त्यामुळे हा कंबरडं नावाचा अवयव कुठे असतो, तो सतत मोडून सुद्धा कसा जोडला जातो, या साऱ्या चमत्काराची फोड कुणी करत असेल तर मला हवी आहे. बघा तुम्हाला जमतय का – हे कबरडं कुठे आहे आणि ते कसं मोडलं आणि जोडलं जातंय हे शोधून काढायला ?
मला कळवा हं तुम्हाला समजलं तर…
© श्री सुनील देशपांडे
मो – 9657709640
email : [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈