श्री सुनील काळे
मनमंजुषेतून
☆ ‘ग्रीन टाय…’ – भाग – २ ☆ श्री सुनील काळे ☆
(आयझॅक खूप गमतीशीर पण विनोदी माणूस होता)… इथून पुढे.
मी सुसाईड करणार असल्याचे सांगितल्यावर त्याने माझे प्रथम खूप मनापासून अभिनंदन केले… आणि मला म्हणाला, “ इतक्या प्रचंड संघर्षाने चित्रकलेचे प्रशिक्षण घेतलेस, पाचगणी परिसरातील असंख्य चित्रे रेखाटलीस, चित्रप्रदर्शने केलीस, पण जागेअभावी तुला खूप त्रास झाला त्याचा मी साक्षीदार आहे. चित्रे पावसात भिजली, तुझे खूप नुकसान झाले याचीही मला जाणीव आहे. तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे माझ्याकडे नाहीत, तुला यश का मिळाले नाही ? हे मी सांगू शकत नाही. तू खूप कष्ट घेतले आहेस त्यामुळे तू आत्महत्या करू नकोस असेही मी तुला सांगणार नाही. पण मी एक तुला विनंती करतो की तुझी जी कला हातामध्ये जिवंत आहे ही तुझ्याबरोबरच संपणार…
…. तर काही दिवस तू बिलिमोरिया स्कूलमध्ये मुलांना चित्रकला शिकव, तेथे कोणीही कलाशिक्षक नाही. त्या मुलांना एलिमेंटरी व इंटरमिजिएट या चित्रकला विषयाच्या परीक्षा द्यायच्या आहेत, आणि त्यांना गुरुची (कलाशिक्षकाची ) फार आवश्यकता आहे. जर तू सुसाईड करून मरून गेलास तर तुझी कलाही तुझ्याबरोबर मरणार… जर तू ही कला कोणाला शिकवली नाहीस तर या चर्चमधला येशु तुला कधीही माफ करणार नाही … फक्त एक महिना तू या मुलांना शिकव व नंतर निवांतपणे आत्महत्या कर. तुला मी अडवणार नाही …. “
“पण मी चित्रकला कधी शिकवली नाही, ही शाळा इंग्रजी माध्यमाची आहे. माझे अे. टी. डी किंवा ए .एम झालेले नाही. ते शाळेतील लोक मला कसे स्वीकारतील ? हे मला जमणार नाही …. मी कमर्शियल आर्ट शिकलेलो आहे.. शिक्षण क्षेत्राशी माझा कधी संबंध आला नाही,” अशी विनंती मी त्याला केली.
आयझॅक जिद्दी होता. त्याने त्याच्या गळ्यातील ग्रीन रंगाची टाय काढली आणि माझ्या गळ्यात घातली. आणि म्हणाला, “ मिस्टर आर्टीस्ट सुनील काळे.. नाऊ यु आर लुकिंग व्हेरी स्मार्ट आर्टटीचर… तुला मी वचन देतो की तुला कसलाही त्रास होणार नाही, कसलाही इंटरव्यू घेतला जाणार नाही, कसल्याही अटी टाकल्या जाणार नाहीत. सकाळचा नाष्टा , दोन्ही वेळचे जेवण, संध्याकाळचा चहा आणि राहण्यासाठी तुला एक खोली मिळेल. माणसाला जगायला आणखी काय लागते ? अन्न ,वस्त्र निवारा व जॉब …
तुला जर या सगळ्या गोष्टी मिळत असतील तर हे चॅलेंज तू का स्वीकारू नये ? एक महिन्याचा तर फक्त प्रश्न आहे . शिवाय तू जी आत्महत्या करणार आहेस त्याला मी विरोधही करत नाही. मग प्रश्न येतो कुठे ? या जगातून जाण्यापूर्वी अनुभवलेले, शिकलेले सर्वोत्तम ज्ञान तू त्या मुलांना दे एवढीच माझी मागणी आहे .”
थोडा शांतपणे विचार केल्यानंतर मलाही त्याचे म्हणणे पटले. आपले सर्वोत्तम ज्ञान मुलांना द्यायचे मगच मरायचे…असे मी ठरवले.
दुसऱ्या दिवशी बिलिमोरिया स्कूलमध्ये सकाळी हजर झालो .
प्राचार्य सायमन सरांनी मला अपॉइंटमेंट लेटर दिले आणि एका छोट्या मुलांच्या वर्गात शिकवण्यासाठी पाठवले. वर्गात प्रवेश केल्यानंतर मला पाहून ती छोटी मुले फार आनंदित झाली. त्यांना खूप वर्षांनी आर्ट टीचर मिळाल्यामुळे उत्साह आला होता. ती सगळी मुले आणि मुली माझ्याभोवती जमा झाली. त्यांची स्वतःची चित्रे, चित्रकलेच्या वह्या, क्रेयॉन कलरचे बॉक्स दाखवू लागली. मुलांचा उत्साह पाहून मीही खुष झालो आणि त्यांना चित्रकला शिकवू लागलो, जणू मी माझ्या स्वतःच्या छोट्या मुलीला शिकवत आहे असा भास मला होत होता…
शिकवता शिकवता दोन तास कसे संपले हे मलाही कळले नाही. सायली पिसाळ, आकाश दुबे, उत्सव पटेल, ताहीर अली, अशी अनेक नावे आजही मला आठवत आहेत. नंतर दुसरा वर्ग ,नवीन तास, नव्या ओळखी, नवी उत्सुकता असलेली मुले, त्यांच्या निरागस भावना मला हेलावून गेल्या. नव्याने ओळखीची होत असलेली छोटी मुले व मुली शाळा सुटल्यानंतरही माझ्या खोलीभोवती घिरट्या घालत राहिली त्यांना त्यांची नवीन चित्रे दाखवायचा खूप उत्साह असायचा. मग मीही त्यांना क्राफ्ट, अरोगामी. चित्रांचे वेगवेगळे विषय उत्साहाने शिकवू लागलो. मीही नियमित त्यांची व्यक्तिचित्रे, स्केचिंग करु लागलो. शशी सारस्वत, संजय अपार सर, दुबे मॅडम, छाया व संजय उपाध्याय, मोहीते सर, नॅथलीन मिस, सुनील जोशी सर, असे नवीन मित्रही या बिलिमोरिया शाळेत भेटले. अशा रीतीने एक महिना, दुसरा महिना, तिसरा महिना कसा संपला हे कळलेच नाही…
शाळेचे एक नवे वेगळे विश्व मी अनुभवत होतो …
हे माझ्यासाठी फार वेगळे जगणे होते. शाळेत मी जरी रोज नवीन शर्ट घालत असलो तरी माझी टाय मात्र एकच होती…
…. आयझॅकने दिलेली ग्रीन टाय.
अशा रीतीने एक वर्ष संपले आणि मी सेंट पीटर्स या ब्रिटिश स्कूलमध्ये गेलो आणि माझी पत्नी स्वाती बिलिमोरिया स्कूलमध्ये जॉईंट झाली.
सेंट पीटर्स मध्ये चित्रकला विषयाला खूप प्रोत्साहन मिळत होते. मुलं देखील नवनवीन गोष्टी शिकत होती त्याचबरोबर माझी चित्रकला ही नव्याने बहरून येत होती. या नव्या शाळेच्या परिसरातील अनेक निसर्ग चित्रे मी नव्याने रेखाटू लागलो. त्या काळात माझे चित्रकलेचे प्रदर्शन नेहरू सेंटर, नंतर ओबेराय टॉवर हॉटेल व 2002 मध्ये जहांगीर आर्ट गॅलरी येथे झाले. याठिकाणी अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला .
माझी आर्थिक स्थितीही सुधारली 2003 साली मी नवीन रो हाऊस घेतले. नवा स्टुडिओ बांधला .
सेंट पीटर्स येथे ड्रेस कोड असल्यामुळे भरपूर कपडे घेतले. त्यावेळी माझ्याकडे रंगीबेरंगी ८० टाय झाल्या होत्या. आजही त्या आठवण म्हणून माझ्याकडे आहेत . पण एक टाय मात्र मी प्रेमाने जिव्हाळ्याने कायमची जपून ठेवलेली आहे …..
…. ती म्हणजे आयझॅक सरांची ग्रीन टाय.
मी कधीही दुःखी आणि निराशेच्या गर्तेमध्ये असलो की मला आयझॅकची आठवण येते. आता आयझॅक अमेरिकेत असतो. त्याने आता लग्नही केलेले आहे .फेसबुकवर अधून मधून भेटत असतो. मी कितीही श्रीमंत झालो, माझी परिस्थिती सुधारली ,बिघडली तरी एक गोष्ट मी त्याला कधीही परत करणार नाही ती म्हणजे ग्रीन टाय …. कारण ती टाय मला स्वतःला कधीकधी आयझॅक बनवते. माझ्याकडे कितीतरी कलाकार मित्र येत असतात . काही नवीन शिकणारी असतात, काही निराश झालेले असतात , काही उमेद हरवलेले कलाशिक्षक असतात, अनेक गोष्टींच्या तक्रारी करत असतात, त्यांना मार्ग सापडत नसतो … अशावेळी मी काळे सरांच्या ऐवजी आयझॅक होतो .. नव्हे आयझॅक सर संचारतो माझ्यात…
ज्या ज्या वेळी अशी निराशेने ग्रासलेली , व्यथित, दुःखी माणसे मला भेटतात त्यावेळी आपण प्रत्येकाने आयझॅक झाले पाहीजे असे माझे आंतरमन मला नेहमी सांगत असते, कारण त्याची ग्रीन टाय सतत मला आठवण करून देते.
जीवन हे आत्महत्या करून संपवण्यासाठी नसते तर आपल्यातील सर्वोत्तम देण्यासाठी, सर्वोत्तम जगण्यासाठी ,सर्वोत्तम शिकण्यासाठी, सर्वोत्तम पाहण्यासाठी, सर्वोत्तम शिकवण्यासाठी , सर्वोत्तम ऐकण्यासाठी असते.
….. असे अनेक आयझॅक मला वेळोवेळी भेटत गेले. आणि माझे आयुष्य समृद्ध करत गेले. एकवीस वर्ष झाली आता या घटनेला, आत्महत्या करायचे तर मी कधीच विसरून गेलो आहे. असे अनेक आयझॅक आपल्याला वेगवेगळ्या नावाने, वेगवेगळ्या रुपात भेटत असतात. कधी भेटले नसले तर तुम्हालाही असा आयझॅक भेटावा व एक ग्रीन टाय मिळावी किंवा…
…. तुम्हीच कोणाचे तरी आयझॅक व्हावे आणि त्या निराश माणसाला एक ग्रीन टायसारखी वस्तू द्यावी म्हणजे निराशेचा अंधार कायमचा दूर व्हावा….
म्हणून खूप खूप शुभेच्छा !
तर अशी आहे माझी ‘ग्रीन टाय’ ची आठवण….. मला सतत प्रेरणा देणारी……..
– समाप्त –
© श्री सुनील काळे
संपर्क – 32, निसर्ग बंगला, मेणवली रोड, स्वप्नपूर्ती मंगल कार्यालयाजवळ, मु .पो. भोगाव, ता. वाई, जि.सातारा – ४१२८०३.
मोब. 9423966486, 9518527566