सुश्री शिल्पा मैंदर्गी
☆ मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 8 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी ☆
(पूर्ण अंध असूनही अतिशय उत्साही. साहित्य लेखन तिच्या सांगण्यावरून लिखीत स्वरूपात सौ.अंजली गोखले यांनी ई-अभिव्यक्ती साठी सादर केले आहे.)
माझ्या नृत्याच्या प्रवासातील अत्युच्च बिंदू आणि अविस्मरणीय क्षण म्हणजे अंदमानात स्वातंत्र्यवीर सावरकरांना ठेवलेल्या कोठडीमध्ये त्यांनीच लिहिलेल्या गीतावर आणि माझ्या गुरुं सोबत नृत्य करण्याचा आलेला दुर्मिळ योग. तो परम भाग्याचा क्षण आम्हाला लाभला आणि आमच्या जन्माचे सार्थक झाले.
2011 हे वर्ष स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या धाडशी उडीचे शतक वर्ष. या उच्चकोटीच्या साहसाला मानवंदना देण्यासाठी सावरकर प्रेमी नी स्वातंत्र्यवीर सावरकर अंदमान पदस्पर्श शताब्दी सोहळा, चार जुलै ते 12 जुलै 2011 या कालावधीत आयोजित केला होता. अंदमानच्या त्या तुरुंगात जाऊन सावरकरांच्या त्या कोठडीला नमन करण्याचे भाग्य ज्या निवडक भाग्यवंतांना लाभले त्यापैकी आम्ही तिघे म्हणजे मी, माझ्या गुरु सौ धनश्री आपटे आणि माझी मैत्रीण नेहा गुजराती या होतो.
मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की मला अंदमानला जायला मिळालं. त्यासाठी सावरकरांचे आशीर्वाद, माझ्या आई बाबांचा खंबीर पाठिंबा, धनश्री ताई यांची मेहनत, आणि माझी बहिण सौ वर्षा आणि तिचे यजमान श्री विनायक देशपांडे यांच्या मदतीचा लाभलेला हात.
सांगलीमध्ये बाबाराव स्मारक समिती आहे. त्यामध्ये अनेक सावरकर प्रेमी काम करतात. त्यापैकीच एक आहेत श्रीयुत बाळासाहेब देशपांडे. 2011 हे वर्ष स्वातंत्र्यवीरांच्या या धाडसी उडीचे शंभरावे वर्ष होते. केवळ देश प्रेमामुळे सावरकरांनी हे धाडस केले होते. आपली भारत माता पारतंत्र्यात अडकलेली त्यांना सहन होत नव्हतं. त्या एका ध्यासापोटी त्यांनी हा अतुलनीय पराक्रम केला. खरंतर त्यांच्या त्यामुळेच आपण सगळे भारतीय स्वातंत्र्याचा आनंद उपभोगतो आहोत. मोकळा श्वास घेतो आहोत. त्याची थोडीतरी जाणीव आपण ठेवली पाहिजे ना! त्यांना मानवंदना प्रत्यक्ष त्या ठिकाणी अंदमानला जाऊन द्यायची असं या लोकांनी ठरवलं होतं. स्वातंत्र्यवीरांची गाणी नृत्याविष्कार करून मानवंदना देण्याचे ठरवले होते. त्यामध्ये मी, धनश्री ताई आणि नेहा यांनी नृत्य बसवली होती.
जवळजवळ दोन अडीच महिने आम्ही नृत्य बसवत होतो. सावरकरांनी तुरुंगातील त्या कोठडीमध्ये, काट्यांनी खिळ्यांनी लिहिलेल्या कविता सादर करायच्या ठरवल्या होत्या.त्या गाण्यांना विकास जोशी यांनी चाली लावून, सांगलीच्या स्वरदा गोखले तिच्याकडून त्या कविता गाऊन घेतल्या आणि आपल्या धनश्री ताई यांच्या अथक परिश्रमाने आणि मार्गदर्शनाने नृत्य अविष्कार बसवला.
मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. आम्ही तिघींनी आमचे नृत्य सावरकरांच्या त्या कोठडीत केले जिथे त्यांना बंदिस्त ठेवले होते. ती 123 नंबर ची खोली आहे. एक विशेष म्हणजे लोकांना, पर्यटकांना पाहण्यासाठी ती खोली तशीच ठेवली आहे. आम्ही तिथे गेलो तो दिवस बरोबर सावरकरांनी जी धाडसी उडी घेतली तोच दिवस होता. त्यादिवशी सावरकरांचा फोटो तिथे ठेवला होता.संपूर्ण खोली फुलांनी सजवली होती. ज्या भिंतींना सावरकरांचा सहवास लाभला होता त्याच भिंतींना आम्ही सावरकरांची ती अमर गा णी, ते अमर काव्य त्यातून सादर करून दाखवलं. ती कोठडी छोटी म्हणजे फक्त दहा बाय दहाची होती. कशीबशी तीन-चार माणसं उभे राहू शकतील एवढीच. पण आम्हाला त्याच भिंतींना दाखवायचं होतं की त्यांच्यावर सावरकरांनी लिहिलेलं ते अमर अतुलनीय काव्य नृत्याच्या फुलांची ओंजळ त्याच ठिकाणी वहात आहोत.
धनश्री ताईंनी अतिशय चांगल्या तऱ्हेने सायं घंटा नावाचे काव्य नृत्या मध्ये सादर केले. ह्या कवितेचा आशय समजून घेण्यासारखा आहे. कै दे मध्ये असताना सावरकरांना हातांमध्ये को लू घालून अक्षरश: घाण्यावरील बैलाप्रमाणे जुंपून त्यांना तेल काढायला लागायचं. अतिशय कष्टाचं त्रासाचं काम होतं ते. त्यावेळचा तो बारी बाबा जेलर खूप क्रूरपणे वागायचा. कष्टाचे सगळी काम झाल्यावर संध्याकाळचे ते घंटा म्हणजे काम संपल्याची घंटा कधी असते यावर कैद्यांचे लक्ष असायचं. सायन घंटा वाजली म्हणजे हुश्य !तो दिवस संपला. ते काव्य ज्या खोलीत लिहिले गेले त्याच खोलीत धनश्री ताईंनी हे नृत्य सादर केलं. बारी बाबा करत असलेला छळ त्यांनी दाखवला. त्याचबरोबर सावरकरांच्या संवेदना उत्कृष्टपणे दाखवल्या.
मी आणि नेहा गुजराती आम्ही दोघांनी सावरकरांचं मातृभूमीचे मंगल काव्य अर्थात जयोस्तुते सादर केले. अतिशय बुद्धिमान अशा सावरकरांनी जे हे महाकाव्य लिहिलं आणि मंगेशकर बंधू-भगिनींनी जीव ओतून त्या उच्च भावना आपल्यापर्यंत पोहोचवल्या, आपल्या मनामध्ये भिनवल्या, त्या नृत्यामध्ये सादर करण्याचे परमभाग्य आम्हाला मिळालं.
जयस्तुते सादर करताना भारत माता मी झाले होते आणि नेहाने वाईट शक्ती साकारली होती. म्हणजे वाईट शक्ती आणि भारत मातेचे लढाई आम्ही उभी केली. तुम्हाला सांगते, “हे अधम रक्त रंजी ते” यावर नृत्य करताना माझ्या अंगामध्ये जोश संचारला होता. अंगावर रोमांच उभे राहिले होते. ती वाईट शक्ती लढाई मध्ये पायाशी पडली तेव्हा मला सुद्धा आनंद झाला. अशा तऱ्हेने जयोस्तुते या ठिकाणी सादर करायला मिळाले हे मी माझं भाग्य समजते.
…. क्रमशः
© सुश्री शिल्पा मैंदर्गी
दूरभाष ०२३३ २२२५२७५
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈