सुश्री मंजुषा सुनीत मुळे

☆ मनमंजुषेतून ☆ हत्ती आणि पाच आंधळे ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे☆ 

एखादा पुतळा रस्त्याच्या मधोमध उभारावा, तसा एक हत्ती एका रस्त्याच्या मधोमध उभा असतो. त्याच रस्त्याने चाललेले पाच आंधळे त्या हत्तीला धडकतात.  काय आहे हे ? प्रत्येक जण चाचपडून बघायला लागतो.. एकाच्या हाताला शेपटी लागते, त्याला वाटतं ती दोरी आहे. एकाच्या हाताला पाय लागतो, त्याला वाटतं ते झाड आहे.

एकाचा हात  दातावर आपटतो, त्याला वाटतं तो भाला असेल. एकाच्या हातात सोंड येते, आणि साप समजून तो झटकन सोडून देतो. एकाचा हात हत्तीच्या पोटावर पडतो. हात पोहोचेल तिथपर्यंत तो चाचपून पहातो, पण त्याला नक्की अंदाजच बांधता येत नाही. त्यांचे भांबावून चाचपडणे पाहून, तिथून चाललेला एक सद्गृहस्थ त्यांच्याजवळ जाऊन तो हत्ती असल्याचे त्यांना सांगतो आणि त्यांना प्रत्यक्ष हत्ती पाहिल्यासारखाच  आनंद होतो.

ही गोष्ट म्हणजे एक सुंदर रूपक-कथा असावी असे प्रकर्षाने वाटते. —— हत्ती म्हणजे अनाकलनीय असणारे परब्रह्म. आणि पाच आंधळे म्हणजे माणसाची पाच ज्ञानेंद्रिये —- डोळे, नाक, कान, जीभ, त्वचा —-रूप, गंध,  नाद,  रस, स्पर्श —- यासारख्या सृष्टीतल्या महत्वाच्या अस्तित्व-गुणांची  जाणीव जाणवून देणारी पाच साधने. या प्रत्येक ज्ञानेंद्रियाचे कार्यक्षेत्र वेगवेगळे, ज्ञानग्रहणक्षमतेमध्येही विविधता आणि स्वतःची अशी एक मर्यादाही —ज्यावरून माणसाच्या शरीरक्षमतेचीही एक मर्यादा ठरते. पण तरीही इतर सर्व योनींपेक्षा मनुष्य-योनी श्रेष्ठ का मानली जाते? चौऱ्याऐंशी लक्ष  योनी पार केल्यानंतर मानवजन्म मिळतो असे म्हणतात  आणि त्याचे वैशिष्ट्य हेच असते की,  या जन्मात,  या ज्ञानेंद्रियांमार्फत मानव या चराचर सृष्टीचे, इतर प्राण्यांपेक्षा खूपच जास्त ज्ञान मिळवू शकतो.  इतकेच नाही तर परब्रह्माचे,  म्हणजेच अंशरूपाने प्रत्येक सजीवात असणाऱ्या त्या सर्वोच्च प्राणशक्तीचेही ज्ञान मिळवू शकतो.  त्यात कायमचे विलीन होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करू शकतो.  त्यासाठी या ज्ञानेंद्रियांचा एकत्रित उपयोग करण्याची क्षमता त्याला मिळालेली असते.  “ मानवी मन “ हे सहावे अतिशय प्रभावी पण अदृश्य असे माध्यम आहे,  त्याला या कामासाठी जुंपणे,  हे मात्र माणसाला प्रयत्नपूर्वकच साधावे लागते. अर्थात परब्रह्म हे हत्तीसारखे सहजपणे आकलन होण्यासारखे नसतेच— एका मानवजन्मात तर नाहीच नाही  पण या ज्ञानेंद्रियांच्या मदतीने त्याच्या एका अंशाचा तरी अनुभव एका जन्मात घेता यावा, यासाठी मात्र माणूस सतर्कपणे प्रयत्न करु शकतो. उत्तम ऐकणे,  उत्तम बघणे-वाचणे, उत्तम आणि विचारपूर्वक योग्य बोलणे,  अस्पृश्य विचारांना चुकूनही स्पर्श न करणे,  दुष्ट- अनैतिक विचारांचा वासही नाकाला न लागू देणे —-अशासारख्या सदगोष्टी जाणीवपूर्वक करण्याचे ठरवले, तर माणसाचे मन त्याच्या बुद्धीच्या मदतीने, या इंद्रियांच्या वेगवेगळ्या कामांचा एकत्रित उपयोग करून त्या शाश्वत सत्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याचा प्रयत्न नक्कीच करायला लागू शकते. मग त्या एकमेव शाश्वत सत्याची — परब्रह्माची विशालता — सर्वव्यापकता समजण्यासाठी काय करावे याची दिशा तरी या जन्मात नक्की सापडू शकेल. शेपटी – पाय- दात – सोंड – पोट  हे  एकाच हत्तीचे अवयव आहेत,  हे जसे गोष्टीतल्या आंधळ्यांना समजते  आणि हत्ती नेमका कसा दिसतो  हे त्यांच्या बंद डोळ्यांआड असलेले वास्तव ते त्यांच्या परीने अनुभवतात,  तद्वतच,  या चराचर सृष्टीतली प्रत्येक सजीव,  चेतनामय गोष्ट त्या सर्वव्यापक परमचैतन्याचाच एक अंश आहे,  इतके तरी मानवजन्म मिळालेल्या प्रत्येकाने, या ज्ञानेंद्रियांच्या सहाय्याने जाणून घेण्याचा प्रयत्न करायलाच हवा आणि हो,  हत्तीची ओळख पटवून देण्यासाठी एक सद्गृहस्थ पुरेसा असला, तरी त्या परमचैतन्याची ओळख पटवून देण्यासाठी मात्र सद्गुरू -कृपा लाभणे अनिवार्यच असते.

ही गोष्ट सांगण्यामागे हाच हेतू असावा असे मला वाटते.

 

©  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments