श्री मकरंद पिंपुटकर
मनमंजुषेतून
☆ साक्षात्कार… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆
मी आणि बायको, आमच्या अनुक्रमे ५ आणि ३ वर्ष वयाच्या लेकरांना घेऊन, सामानाने गच्च भरलेली ट्रॉली ढकलत तेवढ्याच गच्च भरलेल्या मॉलमध्ये बिलिंग काऊंटरकडे मार्गक्रमण करत होतो, आणि ते मगाचचे आजोबा परत आमच्याशी बोलायला आले होते.
तशी आजच्या संध्याकाळची सुरुवात काही फारशी चांगली झाली नव्हती.
आज शुक्रवार होता. दिवसभर ऑफिसमध्ये काम करताना लोकांच्या डोळ्यासमोर संध्याकाळी सुरू होणाऱ्या वीकएंडची रम्य दृश्यं तरळत होती, मला मात्र सोमवारी एक अर्जंट प्रेझेन्टेशन होतं, घरी गेल्यावरही तेच काम घेऊन बसायला लागणार होतं हे जाणवत होतं. मुलांना मॉलमध्ये नेण्याचं प्रॉमिस केलं होतं, पण त्यांना काहीतरी थाप मारून टाळायचं, हेही ठरवलं होतं.
पण घरी पोचलो आणि कळलं की माझ्या सासूबाईंची प्रकृती थोडी बिघडली होती, nothing serious, पण त्या आणि माझे सासरे उद्या इथे आमच्या घरी येणार होत्या. त्यांना घेऊन हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टरांना दाखवणं, तपासण्या करून घेणं अशी कामं होती.
सासू सासरे येणार म्हणून आणि बाकीचीही वाणसामान आदि खरेदी होती, बायकोला एकटीला ते सगळं सामान आणणं जमलं नसतं. त्यामुळे न सुटके मला आल्यापावली परत बाहेर पडावं लागलं. या घटनेला दोन तास होऊन गेले होते, आणि आत्ता आम्ही खरेदी संपवून मॉलमधून निघण्याच्या मार्गावर होतो.
आमची खरेदी चालू असताना एक t shirt, बर्म्युडा घातलेले मॉडर्न आजोबा लेकरांना बघून आमच्याजवळ आले. त्यांची नातवंडं अमेरिकेत असतात, या दोघांना बघून त्यांना त्यांची आठवण आली, म्हणून ते आवर्जून या दोघांशी गप्पा मारायला आले.
आज आमच्या मुलांचा सौजन्य-सप्ताह चालू होता बहुतेक. या नव्या आजोबांशी त्या दोघांनी छान गप्पा मारल्या, त्यांच्याबरोबर हसले – खेळले, enjoy केलं. मुलांना टाटा करून आजोबा त्यांच्या खरेदीला निघून गेले.
आणि आत्ता आम्ही निघत असताना ते परत आले होते.
” यंग मॅन, हे सोनेरी दिवस पुन्हा येणार नाहीत,” ते माझ्याशी बोलत होते, ” मला कल्पना आहे की तुमच्या करीअरच्या दृष्टीने ही महत्त्वाची वर्षे आहेत, खूप कामं असतील, पण या लेकरांची ही वयं पुन्हा गवसणार नाहीत. मी पण कॉर्पोरेट कल्चरमध्ये काम केलं आहे, ती धावपळ – ती रॅट रेस काय असते हे मीही अनुभवलं आहे….. एकदा माझ्या मुलीला तिच्या बाहुल्यांसाठी डॉल हाऊस बनवायचं होतं. शाळेचा प्रोजेक्ट वगैरे नव्हता, तिलाच तिच्यासाठी हे करायचं होतं. मला नेहमीप्रमाणे काहीतरी deadline होतीच.
तिनं माझ्याकडे डॉल हाऊस करायला मदत करायचा हट्ट धरला. माझ्या कामाच्या व्यापात आणि घाई गडबडीत मी तिला ठाम नकार दिला, आत्ता काही अर्जंट नाहीये, नंतर करू, मी बिझी आहे वगैरे सांगितलं आणि जायला निघालो…. निघालो खरा, पण तिचा तो बिच्चारा चेहरा नजरेसमोरून हलेना. काहीतरी तुटलं आतमध्ये. आणि मी परत फिरलो…. तास दोन तासांचंच काम होतं, डॉल हाऊस पूर्ण झालं. त्याक्षणीचा तिचा तो उत्फुल्ल चेहरा आजही आठवतो. त्या दिवशी काय deadline होती, ते आठवतही नाही, पण ते डॉल हाऊस आता माझ्या मुलीच्या मुलीकडे अजूनही थाटात दिमाखात उभं आहे…. लक्षात ठेव, म्हातारपणी – निवृत्तीनंतर, ऑफिसचं अमुक काम करायचं राहिलं, तमुक काम करायचं राहिलं ही रुखरुख नसेल, पण लेकरांचं बालपण निसटून गेलं ही रुखरुख मात्र नक्की असेल.”
आजोबा निघून गेले, बायको माझ्याकडे सहेतुक पहात होती.
भगवान बुद्धांना पिंपळाच्या झाडाखाली साक्षात्कार झाला, मला गच्च भरलेल्या मॉलमध्ये, गच्च भरलेली ट्रॉली ढकलताना साक्षात्कार झाला. मी काय गमावून बसणार होतो हे ध्यानात आलं. तसं होऊ देता कामा नये हा पक्का निर्धार झाला. आणि मुलांचे हात हातात धरून त्याच निर्धाराने मी पुढे निघालो.
© श्री मकरंद पिंपुटकर
चिंचवड
मो ८६९८०५३२१५
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈