श्री श्रीरंग खटावकर
मनमंजुषेतून
☆ रंगलेली (?) मैफिल ☆ श्रीरंग खटावकर ☆
काही दिवसांपूर्वी एका मैफिलीला गेलो होतो. शास्त्रीय संगीताच्या मैफिलीच्या वातावरणात एक प्रकारचा भारदस्तपणा उगाचच येतो. अभिजन, महाजनांची गर्दी, त्यात आमच्यासारखे काही नुसतेच सामान्यजन !
मंद सुगंध थिएटर भर पसरलेला, आधीच कार्यक्रम सुरू व्हायला उशीर झालेला….
एकदाचा पडदा उघडतो. दोन तानपुरे, डावीकडे तबला, उजवीकडे पेटी, मधोमध एक किडकिडीत व्यक्ती बसलेली. पडदा उघडल्यावर त्या व्यक्तीने हातानेच साथीदारांना खूण केली, तानपुरे छेडले जाऊ लागले, पण बुवांचे काहीतरी बिनसले, एक तानपुरा स्वतःकडे घेतला, खुंट्या पिळू लागले, हस्तिदंती मणी खालीवर करू लागले, जवारी नीट करू लागले. इथे आमच्यासारख्या अनेकांची चुळबुळ सुरू झाली.
मला नेहमी हा प्रश्न पडतो, की हे लोक पडदा उघडायचा आधी हे सगळं का करत नाहीत?… बरं पंधरा मिनिटं झटापट केल्यावर सगळं सुरळीत झालं ( असं वाटलं ) आणि तंबोरा मागे दिला. तेवढ्यात तबला वादकानी त्याची हातोडी काढली, गठ्ठे वर खाली करू लागला, मधेच टण टण करू लागला. त्याचं झालं मग बुवांनी गाणं सुरू केलं. ” पायल बाजे मोरे झान्झर प्यारे ” ….. त्यांची पायल वाजायला सुरुवात होत नाही तेवढयात बुवांनी माईकवाल्याशी काहीतरी खाणाखुणा सुरू केल्या. त्यांना मॉनिटरमधून हवा तसा फीडबॅक मिळत नव्हता वाटतं. मग परत ती पायल सुरू झाली. आता पेटीवाला खुणेनेच माईकवाल्याला सांगू लागला की तबल्याचा फीडबॅक कमी कर पेटीचा वाढव.
अरे काय चाललंय काय यार? पडदा बंद असताना पण हे आवाज येत होते की, मग तेव्हा काय याची रंगीत तालीम केली काय?
बरं एवढं सगळं होऊन परत बुवांचा काही मूड नव्हता. त्यांची पायल एकदमच पुचाट वाजत होती. मी हळूच मित्राशी तसं कुजबुजलो तर बाजूचा म्हणाला, त्यांचं तसंच असतं नेहमी ! मी कपाळावर हात मारला.
का ? का असे लोक अंत बघतात रसिकांचा काय माहीत? बरं आजूबाजूला बघितलं तर सगळेच आपसात गप्पा गोष्टी करत होते. मग आम्हीही खुसपुसत सुरू झालो,
” काय रे काल कुठे उलथला होतास रे?”
“ नान्यानी पार्टी दिली ना, VP झाला म्हणे ! “
” काय म्हणतोस ? नान्या आणि VP? अजून नीट शेम्बुड पुसता येत नाही ! ”
” अरे त्याचा बॉस त्याच्याहून शेम्बडा रे ! केला ह्याला VP “
…. मग मन्या, विकी, सुऱ्या, सगळ्यांच्या यथेच्छ उखाळ्या पाखाळ्या झाल्या.
मधेच गाणारे बुवा यायायाया, यायायाया करत एखादी जीवघेणी तान घेत होते ( म्हणजे आमचा जीव जात होता ) लोक टाळ्या वाजवत होते, ते लवकर संपावे म्हणून. पण उलट बुवांना अजूनच चेव येत होता.
तबला पेटीवाल्याची तर नुसती तारांबळ उडाली होती बुवांना पकडायला.
…. आणि इकडे आम्ही मस्त टवाळक्या करत आमची मैफिल रंगवत होतो.
अर्थात तुम्ही म्हणाल ‘ तू कोण रे टीकोजी राव लागून गेलास त्यांच्यावर टीका करायला?’
… अरे यार आम्ही तानसेन मुळीच नाही पण कानसेन नक्कीच आहोत हो !
मला खरं सांगा अशा अनेक मैफिली तुम्हीही रंगवल्या असतील ना?
ह्या मैफिली गाण्याच्याच असल्या पाहिजेत असे नाही. एखादा रटाळ सेमिनार, विशेषतः पोस्ट लंच सेशन !
अहाहा ! ते मस्त जेवण, आणि जेवण झाल्यावर ते त्या हॉलचं गारेगार वातावरण, त्या व्याख्यात्याचे मेस्मरायझिंग (डोक्यावरून जाणारे शब्द) बोलणं. काय गाढ झोप लागते म्हणून सांगू ! अगदी दोन जायफळं घालून प्यालेल्या दुधानी पण येणार नाही अशी पेंग येते. किती टाळू म्हंटली तरी टाळता येत नाही. त्यात जर आपली खुर्ची मागची असेल तर विचारूच नका. झोपेच्या, पेंगेच्या लाटांवर लाटा येऊन थडकत असतात डोळ्यावर ! हो की नै ? ….
…. किंवा एखादा व्यक्ती गंभीरपणे, “अमुक एक करा .. बघा वैराग्याच्या खांबांवर मनाचा हिंदोळा कसा झुलायला लागेल ” असं काहीबाही बोलत असतो, तेवढ्यात बाजूच्या खुर्चीतून पॉsssss असा भयानक आवाज आणि पाठोपाठ दर्प येतो, आणि एकदम फसकन हसायला येतं. ते हसूही आवरता आवरत नाही. आणि तो आवाज काढणाराही विचित्र नजरेने आपल्याला दटावतो, तेवढ्यापुरतं गप्प बसतो. पण पुढच्याच क्षणाला परत फस्स्स करून सुरू!
एक माझी मैत्रीण तर नेहमी ते क्रोशा का काय म्हणतात त्याची ती हुकवाली सुई आणि दोऱ्याचे बंडल प्रत्येक मैफिलीला घेऊन जाते, आणि अशी रटाळ मैफिल असली, की क्रोशाची तोरणं, ताटाभोवतालची फुलं, टेबलावर टाकायला काहीतरी असं एकतरी पूर्ण करते. पूर्वी नाही का आज्या कीर्तनात वाती वगैरे वळायच्या तसंच !
पण खरं सांगतो अश्या मैफिलीत, सेमिनार, व्याख्याने यात यामुळे माणसांची खूप कामं होतात हो.
आणि मला सांगा त्यात आपल्याला मरणाचे येणारे हसू, न टाळता येणारी झोप, सुचलेले किस्से, मारलेल्या गप्पा यांच्या मैफिलीला खरंच तोड नसते. .. शिंची अशी झोप कधी घरी लागत नाही.
काय बरोबर ना?
काय हो झोपलात की काय ? का क्रोशाची तोरणं विणताय ? नाही ना?
मग वाजवा की टाळ्या ….. संपली आमची मैफिल !!!!
© श्रीरंग खटावकर
मो – +91 7039410869
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈