सौ. अमृता देशपांडे
☆ मनमंजुषेतून ☆ गोवा मुक्तीचे लढवय्ये कै. दत्तात्रय देशपांडे – भाग 1 ☆ सौ. अमृता देशपांडे ☆
15 ऑगस्ट 1947c … इंग्रजांच्या विरुद्ध स्वातंत्र्य लढ्यात अगणित बलिदाने देऊन भारत स्वतंत्र झाला. मोकळ्या हवेत श्वास घेऊ लागला.
त्यावेळी गोवा ह्या छोट्याशा प्रदेशावर पोर्तुगीजांचे राज्य होते. भारत स्वतंत्र झाला तरी सीमेलगतचा गोवा प्रदेश अजून परकीयांच्या त्रासात पिचत पडला होता. सालाझार या पोर्तुगीज अधिका-याने. हैदोस घातला होता. स्वातंत्र्य पूर्व काळी भारतीयांवर जे अत्याचार चालले होते, तेच गोमंतकीयांवर पोर्तुगीजांकडून चालू होते. अशा वेळी भारतीय संग्रामाच्या वारे गोव्याकडे आले नसतं, तरंच नवल.
1946, डाॅ. राम मनोहर लोहियांच्या सत्याग्रहापासून गोव्यात स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले.
अॅड. विश्वनाथ लवंदे, श्री प्रभाकर सिनारी यांच्या बरोबर श्री दत्तात्रय देशपांडे हे गोवा स्वातंत्र्य संग्रामात स्थापन केलेल्या आझाद गोमंत दलाचे founder member.
श्री. देशपांडे हे निपाणी जवळील रामपूर गावचे. बालपण सुखवस्तू परिस्थितीत गेलं तरी मालमत्तेच्या, जमिनीच्या वादावरून हे कुटुंब त्रासात पडलं. रामपूर हे इतकं खेडं होतं की शाळेचीही सोय नव्हती. त्यांना तीन तीन मैल चालत जावं लागे. आपल्या बुद्धिची चमक त्यांनी दाखवली आणि ते मॅट्रीक उत्कृष्ट रित्या पास झाले. विद्यार्थी जीवनापासून त्यांचे वाचन अफाट होते. ते एकपाठी होते. लेखनाचीही आवड होती.
जेव्हा SSC च्या पुढचे शिक्षण शक्य नाही असे समजले तेव्हा त्यांनी मिलिटरीत जाण्याचा विचार केला. घरच्यांची परवानगी न घेताच ते बेळगावला गेले आणि सैन्यात भरती झाले सुद्धा. सिकंदराबाद, जबलपूर येथे त्यांना पाठविण्यात आले. इराक व इराण ला सुद्धा ते गेले होते. तिथे सरकार विरोधी कारवाया केल्याने त्यांना कोर्टाला सामोरे जावे लागले. नंतर त्यांना कोलकाता येथे पाठवले. तिथेच त्यांनी मिलिटरी सोडली व 1944 मध्ये सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेत प्रवेश केला. जवाहरलाल नेहरू यांच्या व्यक्तीमत्वाने प्रभावित होऊन ते Forward Block मध्ये गेले. तेव्हा ब्रिटिश सरकार विरुद्ध लढ्याच्या हालचाली जोरात सुरू होत्या. ब्रिटिश पोलीस त्यांना पकडण्याच्या तयारीत होते. त्याचवेळी तिथून निघून देशपांडे गोव्यात दाखल झाले. 1945 साली वास्को मध्ये त्यांनी शिक्षकी पेशा स्वीकारला. 1946 साली गोवा मुक्तीसाठी लढा सुरू झाला. हजारोंच्या संख्येने लोक ह्यात सामील झाले होते. 1947 साली अशाच कारवायांच्या संदर्भात देशपांडे ना अटक करण्यात आली. व कोर्टात हजर रहावे लागले. त्यांनी तिथे सडेतोडपणे व परखडपणे सांगितलं की, गोवा हा भारताचाच भाग असून त्याच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष करणे हा गुन्हा ठरत नाही. आणि जर गुन्हा सिद्ध झाला तर कुठलीही शिक्षा भोगण्यास मी तयार आहे. कोर्टात त्यांनी सादर केलेले स्टेटमेंट त्यांच्या तल्लख बुध्दीमत्तेचं, साहसी वृत्तीचं आणि कडव्या देशभक्तीचं प्रतीक आहे. या त्यांच्या स्फोटक व जाज्वल्यपूर्ण स्टेटमेंटमुळे त्यांना 28 वर्षे काळ्यापाण्याची शिक्षा ठोठावली गेली.
क्रमशः….
© सौ अमृता देशपांडे
पर्वरी- गोवा
9822176170
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈