श्री श्रीरंग खटावकर
मनमंजुषेतून
☆ लिमलेटची गोळी आणि बरंच काही… ☆ श्रीरंग खटावकर ☆
बाजारात फिरताना अचानक एका दुकानात “ती” दिसली आणि मी एकदम ३५ वर्षांपूर्वीच्या काळात गेलो.
शाळेतली धावण्याची स्पर्धा, जीव तोडून धावलो, नंबरात नाहीच आलो, पण शर्यत संपल्यावर मराठे बाईंनी हातावर ठेवली, तीच ती लिमलेट ची गोळी.
शर्यतीत धावताना बक्षिसापेक्षा त्या गोळीची क्रेझ जास्त होती.
नारंगी केशरी रंगातली ती अर्धचंद्रकोर आकारातील गोळी बघूनच तोंडाला पाणी सुटायचं!
कदाचित त्या काळी फारशी व्हारायटीच नसल्याने त्या गोळीचं अप्रूप असायचं. ५ पैशाला पा….च गोळ्या मिळायच्या हे सांगितलं तर माझी मुलं सुद्धा विश्वास ठेवणार नाहीत.
असो!
काही विशिष्ट गोळ्याच मिळायच्या त्या काळी! त्यातली सगळ्यात आवडती सगळ्यांना परवडणारी हीच ती लिमलेटची गोळी, हिच्या थोड्या वरच्या पातळीवर होती ती छान प्लास्टिक च्या कागदात गुंडाळून येणारी रावळगाव गोळी, तिच्याच पातळीवर लाकडी काडी लावलेली स्ट्रॉबेरीच्या आकाराची आणि खाल्ल्यानंतर जिभेवर रंग रेंगाळणारी स्ट्रॉबेरीची गोळी. एखादा धाडसी मुलगा कधीतरी हुबेहूब सिगरेट सारखीच दिसणारी, टोकाशी निखारा असल्यागत लाल ठिपका असलेली सिगरेट ची गोळी ऐटीत तोंडात ठेऊन यायचा. उभट चौकोनी आकारात मिळणाऱ्या पेपेरमिंट च्या गोळ्या तर खायला कमी आणि रुखवतात तुळशी वृंदावन नाहीतर बंगल्यासाठी जास्त वापरल्या जायच्या. त्या नंतर कधीकाळी दिसायची ती आठवलेची काजू वडी, परफेक्ट चौकोनी आकारातली, वर सोनेरी कागदाचा रुपया असणारी!!
पूर्वी शाळेत वाढदिवसाला वाटली जाणारी एकमेव गोळी म्हणजे लिमलेटच!!
पण काही श्रीमंत मुलं मात्र आम्हाला जणू गुलबकावलीच्या फुला प्रमाणे असलेली, सहजसाध्य नसलेली, वेष्टनापासून चवीपर्यंत सर्वांगसुंदर अशी इकलेअर वाटायचे तेव्हा काय भारी वाटायचं, आणि तेवढया दिवसापुरता त्या मुलाचा भाव वधारायचा!!
आमच्या आईचा एक मामेभाऊ दर दिवाळीच्या आसपास भाऊबीजेला यायचा. आईला ओवाळणीत बंद पाकीट घालायचा. पण आम्हाला त्या चंदुमामा ची ओढ वेगळ्याच कारणासाठी असायची!
तो आम्हा भावंडांसाठी चक्क एक मोठं फाईव्ह स्टार चॉकलेट आणायचा!!
वर्षातून एकदाच मिळणाऱ्या त्या चॉकलेटची वर्षभर वाट पाहायचो आम्ही!!
कधीतरी बाबा खुश असले तर बाजारातून येताना चंदेरी किंवा सोनेरी वेष्टनात मोल्ड केलेले चॉकलेट आणत तो दिवस म्हणजे तर दिवाळीच!!
आमची एक मावशी परदेशात राहते तिनं पहिल्यांदाच आणलेल्या फॉरेन च्या चॉकलेटची चांदी तर कित्येक वर्षे माझ्या अभ्यासाच्या वहीत होती, आणि त्यावर फुशारकीही मिरवलेली आठवतेय.
हे सगळं आठवलं ते त्या लिमलेटच्या गोळी मुळे!
लिमलेटच्या, जिऱ्याच्या, जिऱ्यामीऱ्याच्या, सिगारेटच्या, पेपेरमिंटच्या, एक्स्ट्रा स्ट्रॉंगच्या आठवेलच्या काजू वड्या, इकलेअरच्या गोळ्यांनी आमचं बालविश्व व्यापून उरलं होतं.
त्याच तंद्रीत ते गोळ्याचं पाकीट घेतलं आणि घरी आलो, मुलांसमोर धरलं तर नाक मुरडत मुलगी म्हणाली “ईई ह्या काय गोळ्या आणल्यास बाबा, अनहायजीनिक असतात त्या”
आता त्यांना काय डोंबल सांगू की तुमच्या कॅडबरी सिल्क किंवा हल्ली घरोघरी दिसणाऱ्या फॉरेन चॉकलेट (म्हणजे खरंतर एअर पोर्ट च्या ड्युटी फ्री शॉप मध्ये मिळणाऱ्या) च्या जमान्यात आमच्या करता अजूनही लिमलेटची गोळी म्हणजेच फिस्ट आहे म्हणून……..
© श्रीरंग खटावकर
मो – +91 7039410869
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈